
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण अजूनही सुरुच आहे. रुपयाच्या घसरणीबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतेच वक्तव्य केले होते. रुपयाची घसरण होत नसून डॉलर मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विधानावर विरोधकांकडून सडकून टीका होत आहे. बुधवारी रुपया त्याच्या निचांकी स्तरावर पोहचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 61 पैशांनी घसरुन 83.01 रुपये प्रचि डॉलरला बंद झाला. हा रुपयाचा आतापर्यंत निचांकी स्तर आहे.
पहिल्यांदाच रुपयाचे अवमूल्यन होत तो 83 रुपयांपर्यंत पोहचला आहे. याआधी मंगळवारीही रुपयामध्ये घसरण झाली होती. मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 82.36 रुपये प्रतिडॉलरला बंद झाला होता. बुधवारच्या दुपारच्या सत्रात रुपयाच्या दरात किरकोळ सुधारणा झाली. मात्र, संध्याकाळी त्यात पुन्हा घरसण सुरू झाली. बाजार बंद होताना रुपयामध्ये आतापर्यंतच्या निचांकी स्तरावर घसरण होत तो 83 रुपयांवर पोहचला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत होत असल्याने सर्वच देशांच्या चलनावर याचा परिणाम होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून डॉलर 17.38 टक्के मजबूत झाला आहे. गेल्या 20 वर्षात डॉलरची हा सर्वोत्तम कामगिरी आहे. येनच्या तुलनेत डॉलर 22 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. तर युरोच्या तुलनेत तो 13 टक्क्यांनी वधारला आहे. त्याचा परिणाम रुपयावरही होत असून रुपयाचे अवमूल्यन होत आहे.




























































