
युक्रेनवर भयंकर हल्ले करणाऱया रशियाने शुक्रवारी झापुरीझझिया अणुऊर्जा प्रकल्पावर बॉम्ब डागले आणि ताबा मिळविला. या हल्ल्यामुळे प्रकल्पात आग भडकली असून, अणुस्फोटाच्या भीतीने अवघ्या जगाचा थरकाप उडाला आहे. दरम्यान, या प्रकल्पाचा स्फोट झाला तर संपूर्ण युरोप नष्ट होईल, अशी भीती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे.
युक्रेनमधील झापुरीझझिया अणुऊर्जा प्रकल्प हा युरोपातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून युक्रेनला 30 ते 40 टक्के अणुऊर्जा पुरवठा होतो. अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण प्रकल्पाला रशियन फौजांनी टार्गेट केले. बॉम्ब हल्ले करीत रशियन सैनिक या अणुऊर्जा प्रकल्पात घुसले. त्यामुळे आगीच्या ज्वाला भडकल्या. सध्यातरी येथे रेडिएशन होत नाही. या प्रकल्पात सहा न्यूक्लिअर रिऍक्टर आहेत. मात्र, आग तत्काळ नियंत्रणात आली नाही तर मोठा अनर्थ होण्याची भीती आहे.
…तर चेर्नोबिलपेक्षा 10 पट मोठा स्फोट
रशियन फौजांनी झापुरीझझिया अणुऊर्जा प्रकल्पावर चहुबाजूंनी गोळीबार केला. आग विझविण्यासाठी युक्रेनच्या कर्मचाऱयांना प्रकल्पात येऊ द्यावे. जर स्फोट झाला तर चेर्नोबिलपेक्षा 10 पट मोठा असेल, असे युक्रेन सरकारने म्हटले आहे.
रशियाकडून अणू दहशतवाद
रशियाशिवाय कोणत्याही देशाने कधीही अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केलेला नाही. दहशतवादी देशाने आता अणु दहशतवाद सुरू केला आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्याशी फोनवर संपर्क साधून अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली.
रशियाने युद्धविराम केला पाहिजे
अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी चिंता व्यक्त केली असून, रशियाने हल्ले थांबवावे. युद्धविराम केला पाहिजे, असे सांगितले. प्रकल्पामध्ये आपत्कालीन पथकाला येण्यास परवानगी दिली पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीने बैठक घेण्यात येईल, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने हा हल्ला गंभीर असल्याचे म्हटले आहे.




























































