रशियाने झेपोरिझिया अणुभट्टीवर हल्ला केल्याचा युक्रेनचा दावा, चेर्नोंबिलपेक्षा मोठा स्फोट होण्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशिया आणि यूक्रेनमध्ये युद्धाचा नववा दिवस आहे. आता परिस्थिती अजून बिघडत चालली आहे. रशिया यूक्रेनवर हल्ला करून त्यांची शहरं उद्ध्वस्त करत आहे. या दरम्यान, यूक्रेनच्या झेपोरिझिया ओब्लास्ट प्रांतातील एनरहोदर शहरावर रशियाने हल्ला आहे. या प्रांतात युरोपमधील सर्वात मोठी अणुभट्टी असून या हल्ल्यानंतर तिथून धुराचे लोट येत असल्याचा दावा यूक्रेनने केला आहे.

असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाने यूक्रेनच्या एनरहोदर शहरावर हल्ला केला. यूक्रेनमध्ये झेपोरिझिया ओब्लास्टच्या वायव्य दिशेला एनरहोदर शहर आणि नगरपालिका आहे. त्यांच्यातील अंतर फार थोडं आहे. एनरहोदर शहरावर हल्ला झाल्यानंतर झेपोरिझिया अणुभट्टीतून धुराचे लोट दिसू लागले आहेत, असा दावा यूक्रेनच्या सरकारी अधिकाऱ्याने केली आहे.

रशियाने एनरहोदर शहरावर मोर्टार डागले आहेत. त्यामुळे अणुभट्टीतील काही भागांमध्ये सध्या आग लागली आहे. रशियन सैनिकांनी बचावकार्यासाठी गेलेल्या पथकावर गोळीबार केल्याचा दावाही केला जात आहे.

यूक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी रशियन सैन्याला अणुभट्टीवरील हल्ले थांबवण्याचं आवाहन केलं आहे. जर या भट्टीचा स्फोट झाला तर तो चेर्नोंबिल अणुभट्टीपेक्षा 10 पट अधिक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे रशियनांनी त्वरित हल्ले थांबवावेत असं आवाहन कुलेबा यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलं आहे.

झेपोरिझिया या अणुभट्टीत 6 संयंत्र आहेत. संपूर्ण युरोप खंडातील ही सर्वात मोठी अणुभट्टी असून ही जगातली नववी सगळ्यात मोठी अणुभट्टी मानली जाते.