
रशियाचे मंत्री येवगेनी जिनिचेव यांचा एका कॅमेरामनला वाचवण्याच्या नादात मृत्यू झाला. आर्क्टिक भागात सुरू असलेल्या सराव शिबिरादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. जिनिचेव हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांचे एकेकाळचे अंगरक्षक होते. क्रेमलिनमधल्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने येवगेनी यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. एका कॅमेरामनला वाचवण्याच्या नादात त्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पार्थिव मॉस्को येथे आणण्यात येत असल्याचे राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
55 वर्षांच्या येवगेनी यांच्या निधनाचे वृत्त सर्वात आधी RT न्यूज या वृत्तवाहिनीने दिले होते. कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. आपात्कालीन परिस्थितीमध्ये बचावासाठी काय करावे यासाठीचा सराव आर्क्टिक भागात सुरू होता. बुधवारी या सराव शिबिरादरम्यान ही दुर्घटना घडली. कॅमेरामनचा जीव वाचवत असताना येवगेनी गंभीररित्या जखमी झाले होते. रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
येवगेनी सराव शिबीर पाहात एका कड्याच्या टोकाला उभे होते. सराव शिबिराचे चित्रीकरण करत असताना एक कॅमेरामन या कड्यावरून घसरून खाली पडला. तो पाण्यात पडून त्याचा जीव जाऊ नये म्हणून येवगेनी यांनी उडी मारली. दुर्दैवाने त्यांची झेप चुकली आणि ते दगडावर आपटले. त्यांच्या डोक्याला या अपघातात गंभीर स्वरुपाची इजा झाली होती. या जखमांमुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
येवगेनी यांचा 1966 साली लेनिनग्राड इथे जन्म झाला होता. 1987 साली ते रशियाच्या गुप्तहेर यंत्रणेत म्हणजेच KGBमध्ये अधिकारी बनले होते. 1991 साली ते रशियाच्या सुरक्षा सेवेत दाखल झाले. तिथे त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषविली होती. पुतिन यांचे ते अंगरक्षकही होते, आणि त्यांनी पुतिन यांच्यासोबत बरेच विदेश दौरे केले होते. रशियाच्या सुरक्षा सेवेचे उपसंचालक पद भूषविल्यानंतर येवगेनी हे 2018 रशियाचे मंत्री बनले होते.





























































