पॉर्नच्या माध्यमातून करणार सायबर हल्ला, युरोपियनांवर रशियाची नवीन खेळी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

यूक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने एक नवीन खेळी केल्याचा दावा करण्यात येत आहे. फोन, लॅपटॉप इत्यादी उपकरणं निकामी करण्यासाठी अश्लील साहित्याचा वापर रशिया करणार आहे.

संडे मिरर या वृत्तपत्राने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, यूक्रेनसोबतचं युद्ध पाहता पाश्चिमात्य देशांनी लावलेल्या प्रतिबंधाला रशिया प्रत्युत्तर देईल. मात्र, हे प्रत्युत्तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळेल. रशियाच्या एफएसबी आणि जीआरयू या गुप्तचर यंत्रणा मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले करतील.

त्यासाठी एखादा अश्लील व्हिडीओ तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर दिसेल. तो क्लिक केल्यानंतर त्याच्यासोबत एक मालवेअर तुमच्या डिव्हाईसमध्ये डाऊनलोड होईल. जे तुमच्या फाईल्स करप्ट करेल. कदाचित तुमच्या खासगी डेटावरही त्याचा परिणाम होऊ शकेल.

या हल्ल्यापासून वाचण्यासाठी योग्य तो अँटिव्हायरस प्रोग्रॅम किंवा अॅप्लिकेशन तुमच्या संबंधित डिव्हाईसमध्ये डाऊनलोड करून वापरावा. तसंच तुमचा खासगी डेटा हा अशा कॉम्प्युटरमध्ये ठेवावा, ज्याला इंटरनेट जोडलेलं नसेल, असा सल्ला देण्यात आला आहे.

या वृत्तानंतर, सायबर तज्ज्ञांनी अनेक पाश्चिमात्य देशांना अर्थव्यवस्थेवर सायबर हल्ला होऊ शकेल, असा गंभीर इशारा दिला आहे. या देशांमध्ये इंटरनेट सुविधेवर या मालवेअरचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गुगल, इन्स्टाग्रामसह अनेक मेसेजिंग अॅप्स बंद पडतील. एटीएम सुविधेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.