दहिसरच्या रुस्तमजी ट्रुपर्स शाळेची भरमसाट फीवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

दहिसर येथील रुस्तमजी टपर्स शाळेने भरमसाट फी वाढ केल्याचे उघड झाले आहे. या शाळेतील अनियमितता आणि मनमानी कारभाराविरोधात पालकांनी युवासेनेकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत युवासेनेने पालिका शिक्षणाधिकाऱयांकडे शाळेची चौकशी करण्याची मागणी केली. या मागणीनुसार शाळेची चौकशी केली असता शाळेने भरमसाट फीवाढ केल्याचे उघड झाले आहे.

शाळेने इयत्ता पहिलीच्या फीमध्ये पालक शिक्षक संघटनेच्या संमतीने दहा टक्के वाढ केली आहे. ही वाढ पहिलीपासून लागू होणे अपेक्षित होते, मात्र शाळेने सीनियर केजीच्या फीमध्येही दहा टक्के वाढ केली आहे. तसेच दुसरी ते पाचवीसाठी जी फीवाढ केली आहे ती आधीच्या इयत्तेच्या फीवर केली आहे. हे पूर्णतः नियमबाह्य असल्याचा आरोप युवासेना कार्यकारिणी सदस्य तसेच पालिका शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी केला आहे. या फीवाढीप्रकरणी पालिका शिक्षण विभागाच्या शाळा अधीक्षक व विभाग निरीक्षकांनी रुस्तमजी शाळेची चौकशी करून पालिका शिक्षणाधिकाऱयांकडे अहवाल सादर केला असून या अहवालात फीवाढीसंदर्भात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अधिक माहितीसाठी शाळेच्या संस्थाचालकांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

युवासेना पालकांच्या पाठीशी

अवाजवी फीवाढ करून रुस्तमजी शाळेने पालकांची फसवणूक केली आहे. पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत मोघम माहिती देऊन फीवाढ मान्य करून घ्यायची व प्रत्यक्षात अवाच्या सवा फीवाढ करायची असे प्रकार अनेक शाळांमध्ये सुरू आहेत. पण शिक्षण विभाग या शाळांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप युवासेनेने केला असून फीवाढ सोसणाऱया पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी युवासेना पालकांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे दुर्गे यांनी स्पष्ट केले.

शाळेने दिलेल्या माहितीनुसार 2016-17 मध्ये इयत्ता पहिलीची फी 32,760 रुपये, 2017-18 मध्ये 36 हजार 50 इतकी होती आणि आता 2018-19 या वर्षासाठी तब्बल 50 हजार 400 रुपये फी वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ मागील वर्षीच्या फीच्या तुलनेत 40 टक्के आहे