
>> ऋता कळमणकर
साप म्हटलं की, आपल्या मनात भीती, उत्सुकता, गूढता या सर्व भावनांची गर्दी होते. सिनेमात पाहिलेले मणिधारी साप वगैरे आठवायला लागतात. साप आणि अंधविश्वासाचं तसं मोठं नातं आहे. असो.
जगभरात सापाच्या 2500-3000 प्रजाती आहेत. साप हे विषारी आणि बिनविषारी अशा दोन प्रकारांत प्रामुख्याने विभागले जातात. वरीलपैकी 500 जाती साधारण विषारी आहेत. जे विषारी असतात, त्यांच्या तोंडात विषाची पिशवी व तिला जोडून पोकळ दात असतात. साप चावल्यानंतर हे विष शरीरात प्रवेश करते. हिंदुस्थानात सापाच्या साधारण 300 जाती आहेत. त्यातील 50-52 जाती विषारी आहेत. न्यूझीलंड, आइसलँड व अंटार्क्टिका वगळता साप सर्वत्र दिसून येतात. बेडूक, सरडे, पाली, उंदीर, पक्षी हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. अतिशय कमी अन्नावर साप बराच काळ तग धरू शकतो. शीत रक्ताचा प्राणी आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाही. याच्या जबडय़ाचा आकार याच्या डोक्यापेक्षा मोठा असल्यामुळे तो शिकार सहज गिळू शकतो. साप एका वर्षात 2 ते 3 वेळा कात टाकतो. सापाच्या कातडीपासून पर्सेस, बेल्ट यांना विदेशात मोठी मागणी असल्याकारणाने त्याची तस्करी होते.
हिंदुस्थानात नाग या विषारी सर्पांमुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. याचे प्रमाण हिंदुस्थानात जास्त आहे. तो उंदीर, पाली खात असल्यामुळे मानवी वस्तीजवळ, शेतात मोठय़ा प्रमाणात दिसतो. त्यामुळे या सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे.
केनिया येथील अबर्डसच्या जंगलात आफ्रिकन ब्लॅक मांम्बा हा अतिशय विषारी साप पाहण्याचा योग आला. तसेच कोस्टारिकाच्या अरेनाल वोल्कॅनो एरियामध्ये अतिशय विषारी असणारा बुश मास्टर, rattत स्नेक, पिवळ्याधमक रंगाचा व हिरवागार लाल ठिपकेवाला eye lash pitviper हे सर्प तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पाहिले व फोटोग्राफी केली. जंगलातील नैसर्गिक वातावरणात हे सर्प व त्याचबरोबर बोआ parrot vine स्नेक हेही विविध जातीचे साप पाहिले. हे सर्प पाहणे व त्यांची फोटोग्राफी करणे हा अतिशय नावीन्यपूर्ण अनुभव होता. फोटोग्राफी करताना सर्पतज्ञ उपयुक्त माहिती पुरवीत होते. कोस्टारिकाच्या जंगलात विविधरंगी सापाचा, बेडकांचा खजिना आहे. हे सर्व फोटो 200-500 mm टेलेफेटोलेन्स वापरून काढले आहेत.























































