लडाख – LAC वर 1962 नंतर पहिल्यांदाच सर्वात गंभीर स्थिती, परराष्ट्र मंत्र्यांची स्पष्टोक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील अद्यापही तणावाची स्थिती आहे. या भागात दोन्ही देशांनी अभूतपूर्व सैन्य ताकद आणि हत्यार तैनात केले आहेत. दोन्ही देशात राजकीय आणि सैन्य स्तरावर चर्चा सुरू आहे, मात्र चीन मागे हटण्यास तयार नाही. 1962 नंतर एलएसीवर पहिल्यांदाच एवढी गंभीर स्थिती बनली आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले. ‘द इंडिया वे : स्ट्रैटजिज फार एन अंसर्टेन वर्ल्ड’ या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ‘रेडिफ डॉट कॉम’शी ते बोलत होते.

ते म्हणाले, जसे की आपण जाणता की चीनसोबत राजकीय आणि सैन्य स्तरावर चर्चा सुरू आहे. तसेच हा वाद सोडवण्यास वेळ लागेल असे संकेतही यावेळी त्यांनी दिले. मे महिन्यापासून हा वाद सुरू असून दोन्ही सैन्यात झटापट देखील झाली होती. यात हिंदुस्थानचे 20 हुन अधिक जवान शहीद झाले होते आणि चीनचे 40 हुन अधिक सैनिक ठार झाले होते.

हिंदुस्थान आणि चीनच्या संबंधाबाबत बोलताना ते म्हणाले की, दोन्ही देशांनी एकत्र काम केल्यास हे शतक आशिया खंडाचे असेल. यामुळे दोन्ही देशांचे संबंध महत्वाचे आहेत. मात्र यात अनेक पेच असून प्रामाणिक संवादाची गरज आहे, असेही एस. जयशंकर म्हणाले.

दरम्यान, लडाख भागात झालेल्या झटापटीबाबत बोलताना ते म्हणाले की, 1962 नंतर पहिल्यांदाच येथे गंभीर परिस्थिती आहे. 45 वर्षात पहिल्यांदाच येथे जवान शहीद झाले. एलएसीवर दोन्ही देशांकडून पहिल्यांदाच अभूतपूर्व सैन्य तैनात करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच हिंदुस्थान आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर आवश्यक ते सर्व काही करेल, असेही एस. जयशंकर यावेळी म्हणाले.