ठसा, नीलकांत ढोले

महेश उपदेव

विदर्भातील ज्येष्ठ गझलकार, ज्येष्ठ गझलसम्राट सुरेश भट यांचे शिष्य नीलकांत ढोले यांचे नुकतेच निधन झाले.

मी हिशेब करता करता, थंडगार झालो!
आपल्याच आयुष्यात कर्जदार झालो!
जे इथे घेऊनी आलो, घ्यायचे राहूनी गेले!
काय जे होते मनी ते, व्हायचे राहून गेले!

अशा त्यांच्या अनेक गझला आजही वाचकांच्या मनात आहेत. असा कसदार गझलकार परत होणे नाही. ते आपल्या लाडक्या गझलेला मागे सोडून गेले, पण त्यांच्या गझलेतील अनुभवांचे विभ्रम वाचकांना कायम रिझवत राहतील. कारण त्यांची गझल होतीच तशी नक्षीदार.
त्यांनी ‘अग्निबन’, ‘कळा काळजाच्या’, ‘वेदनांची वेधशाळा’, असे कवितासंग्रह दिले. ‘वेदनांची वेधशाळा’ हा त्यांचा गझलसंग्रह व ‘सोहळे ऋतूंचे’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह वाचकप्रिय ठरले.

नीलकांत ढोले यांच्या ‘अग्निबन’ या संग्रहाला ‘सोव्हिएट लॅण्ड नेहरू अवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याला कविवर्य वामन इंगळे यांची प्रस्तावना लाभली होती. ‘कळा काळजाच्या’ या संग्रहास गझलसम्राट स्व. सुरेश भट आणि प्राचार्य राम शेवाळकर यांनी प्रदीर्घ प्रस्तावनेसह अभिप्राय देऊन भरपूर कौतुक केले होते.

सुरेश भटांना ते गुरू मानत. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनाने नीलकांत ढोले यांची गझल बहरत गेली. त्यांचा काव्यपिंड मूलतः गेय आणि वृत्तबद्ध कवितांवर पोसला गेल्यामुळे लयबद्ध रचना निर्मितीकडे त्यांचा कल अधिक असणे हे स्वाभाविकच होते. ‘अग्निबन’ या संग्रहात त्यांच्या बऱयाच रचना मुक्तछंदामध्ये आहेत.
अनेक वृत्तपत्रांमधे त्यांनी लेखन केले आहे. नागपूर आकाशवाणी, दूरदर्शनवरही त्यांचे काव्य प्रसारित झाले आहे. 1986 साली नागपूर दूरदर्शनवर राम शेवाळकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वैदर्भीय कवी संमेलनात त्यांच्या गझलेला प्रसिद्धी मिळाली.

विदर्भ साहित्य संमेलने, जनसाहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, जागतिक मराठी संमेलन, बहुजनवादी साहित्य संमेलन, गझल सागर प्रतिष्ठान, मुंबईद्वारे आयोजित गझल संमेलने, नागपूर उत्सवांतर्गत कवी संमेलन, आकाशवाणी, दूरदर्शन कार्यक्रमांत त्यांचा सहभाग होता.

नीलकांत ढोले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप, दलित साहित्य अकादमी सन्मान तसेच जागतिक मराठी संमेलनांतर्गत कवी संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. ‘जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो’ ही त्यांची कविता रसिकप्रिय ठरली.

‘आपुल्याच अपराधाचा साक्षीदार झालो’ ही त्यांची छंदमयतेचा लळा लावणारी गझल पहिल्यांदा सुरेश भटांनी ऐकली आणि भट एका लेखात म्हणतात, त्याप्रमाणे ती गझल त्यांना ‘चढलीच’. लेखकाचा शोध घेतला तेव्हा कळले ती नीलकांत ढोले यांनी लिहिलीय. भट-ढोले मैत्री पर्वाची ही पहिली सुरुवात होती. त्यानंतर तर भटांनी अनेक ठिकाणी त्यांची ही गझल स्वतःच्या चालीत सादर केली. तेव्हापासून नीलकांत ढोले यांची गझल त्यांच्या मोरपंखी प्रतिमांमधून रसिक मनात अगदी आता आतापर्यंत ठिबकत राहिली अन् आज ती कायमची शांत झाली. ढोलेंना निसर्गाचे अलवार सौंदर्य, प्रेमभावनेची हळुवार अभिरुची जशी खुणवायची तितक्याच तीव्रतेने ते सामाजिक अन्यायाविरोधातही प्रखर शब्दांत प्रकट व्हायचे. कविता म्हणजे केवळ सौंदर्यपूजन नव्हे. कविता म्हणजे मानवी जीवनावर स्वार्थी शोषकांनी लादलेल्या कुरूपतेवरील प्रहार होय, हे त्यांचे स्पष्ट मत होते. समाजातील अन्याय बघणे असहय़ झाले की, त्यांची शब्दरूपी तलवार चमकायची. ते लिहायचे-
सोहळेच स्वातंत्र्याचे आम्हाला मंजूर नाही
या उदास वैफल्याची का उगा फिरविता द्वाही!
का न्याय रडे एकांती? अन्यास नाचतो नंगा
स्वार्थांध झुंडशाहीचा बेबंद माजला दंगा…

ढोलेंचा हा काव्य प्रवास असा बहुरंगी होता. ‘अग्निबन’, ‘कळा काळजाच्या’, ‘वेदनांची वेधशाळा’ हे कवितासंग्रह, ‘वेदनांची वेधशाळा’ हा गझलसंग्रह. ‘सोहळे ऋतूंचे’ हा ललित लेखसंग्रह अशी एकामागून देखणे शब्दसौंदर्य त्यांनी मराठी रसिकांना अर्पण केले. सुरेश भटांना ते गुरू मानत, त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनाने नीलकांत ढोले यांची गझल बहरत गेली. अनेक वृत्तपत्रांमधे त्यांनी लेखन केले. नागपूर आकाशवाणी, दूरदर्शनवरही त्यांचे काव्य प्रसारित झाले. त्यांच्या गझलेतील गतिसूचक प्रतिमा विलोभनीय होत्या. विविधतेच्या हव्यासापेक्षा त्यांनी कायमच आत्मबळाच्या साक्षात्काराला महत्त्व दिले. अशा ज्येष्ठ गझलकाराला सलाम.