सामना अग्रलेख – दादा, कुछ तो गडबड है!

6071

अजित पवार यांना हुंदका फुटला हे खरेच. राजीनाम्याआधी चार दिवसांपासून ते विधानसभा अध्यक्षांच्या संपर्कात होते व त्यांनी राजीनामा देण्याची वेळ नक्की केली होती. जर त्यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला असेल तर त्या संघर्षाच्या दिवशी ते पवारांबरोबर कुठेच दिसले नाहीत. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ते पाहिल्यावर वाटते, ‘‘दादा, कुछ तो गडबड है!’’

निवडणुका वगैरे आल्या की, राजकारणात वावटळी उठत असतात. श्री. शरद पवार यांनी महाराष्ट्रात अशीच एक वावटळ उठवून दिली. वावटळीचे रूपांतर वादळात होईल, असे वाटत असतानाच पुतणेसाहेब अजित पवार हे आधी अचानक अदृश्य झाले, आमदारकीचा राजीनामा दिला व दुसऱ्या दिवशी प्रकट होऊन त्यांनी आपल्या अदृश्य होण्यामागची कहाणी पत्रकारांना सांगितली. हे सर्व सांगताना अजित पवारांचा कंठ दाटून आला. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला व त्या अश्रूंचे शिंपण वावटळीवर पडल्याने वावटळ खाली बसली व त्यातून वादळ वगैरे काही निर्माण झाले नाही. ‘नाट्य’ निर्माण झाले ते राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटप प्रकरणात. या नाट्याचे दिग्दर्शन केले सक्त वसुली संचालनालय म्हणजे ‘ईडी’ने. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख ‘ईडी’ने करताच पवार यांनी ‘ईडी’ कार्यालयाच्या दिशेने कूच करण्याचे ठरवले. त्यासाठी युद्धाचे नगारे वाजवले, शंख फुंकले, रणभेदी आरोळ्या व धुरळ्याने आसमंत गढूळ झाला. ‘महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही’ अशा मराठीजनांस प्रिय असलेल्या संवादफेकीने शरद पवार यांनी माहौल मस्त तयार केला. महाराष्ट्रातून असंख्य वतनदार खाशा फौजा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यांना मुंबईच्या वेशीवरच पोलिसांनी रोखले. शुक्रवारी दुपारी दोन वाजता ‘ईडी’रूपी अफझलखानाचा कोथळा काढायचाच असे ठरले. पण ‘ईडी’नेच कोथळा वाचविण्यासाठी बारामतीकरांना

खलिता पाठवून ‘तह’

केला व त्या सर्व प्रकरणावर पडदा पाडला. हे सगळे ‘नाटय़’ सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत घडले. नाटकाचा रंग चढत असतानाच पहिल्या अंकाचा पडदा पडला व दुसऱया अंकाचा ताबा अजित पवार यांनी घेतला. पहिले भव्य असे रोमांचित करणारे शरदनाटय़ होते व त्याची संहिता पुढे सरकत असतानाच अजित पवारांनी त्यांच्या रहस्यमय आणि ‘ट्रजेडी’ असलेल्या नाटकाचा भाग मध्येच घुसवून शरद पवारांचा रंगलेला नाटय़ आविष्कार खाली पाडला. अजित पवार यांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला व अज्ञातवासात गेले. अजित पवार यांनी मोठय़ा साहेबांना धोबीपछाड दिला, अजित पवार भाजपात प्रवेश करीत आहेत, लवकरच अजित पवार आपल्या नव्या पक्षाची घोषणा करीत आहेत इथपासून मुलायमसिंग यादव यांच्याप्रमाणे पवारांच्या कुटुंबास गृहकलहाची वाळवी लागली, इथपर्यंत वावडय़ा उठवून मीडियाने पवार-नाटय़ाचा तिसरा अंकही चालू केला. या सर्व अंकांवर आता पडदा पडला असून गायब झालेले अजित पवार प्रकट झाले व डोळय़ांत अश्रू आणून त्यांनी राजीनाम्यामागची पटकथा सांगितली. राजकारण हे अत्यंत गलिच्छ पातळीवर उतरले असून ‘‘नको ते राजकारण, त्यापेक्षा शेती करावी’’, अशी अजित पवारांची इच्छा असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली व दुसऱया दिवशी छोटय़ा पवारांनी तेच ‘स्क्रिप्ट’ पुढे नेले. राज्य सहकारी बँकेसंदर्भातील घोटाळय़ाबाबत अजित पवार यांनी त्यांची भूमिका मांडली व अजित पवारांचे नाव नसते तर ही ‘केस’ पुढे सरकलीच नसती, असे एक विधान त्यांनी केले. हे सर्व मान्य केले तरी या सर्व प्रकरणात भाजपचा हात नसून

मुंबईच्या उच्च न्यायालयानेच

लाथ घातली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. साखर कारखाने बंद पडत होते व त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नियमानुसार कर्ज वाटप केले, असे बँकेच्या संचालक मंडळाचे सांगणे आहे, पण त्यांचा हा कावा आधी हायकोर्टाने व नंतर सुप्रीम कोर्टानेही मान्य केलेला नाही, हे महत्त्वाचे. या सर्व प्रकरणात शरद पवार यांचे नाव कसे आले, हा संशोधनाचा विषय आहे. पवारांनी कसलेल्या राजकारण्याप्रमाणे या सर्व प्रकरणाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करून घेतला. दुपारनंतर हे नाटय़ रंगत असताना व सर्व वृत्तवाहिन्यांचे पडदे शरद पवारांच्या ‘पॉवर प्ले’ने रंगले असतानाच अजित पवारांनी राजीनामा पाठवला व हा रंग फिका केला. अजित पवारांनी हे सर्व त्याच दिवशी अचूक वेळ साधून का केले? काकांचे एक वीररस नाटय़ राज्यात रंगात असताना मध्येच विंगेत घुसून पडदा खाली पाडून स्वतःचे दुसरे नाटय़ त्याच रंगमंचावर घडविण्याची त्यांना इतकी घाई का झाली होती? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. अजित पवार यांना हुंदका फुटला हे खरेच. आम्हीही माणसंच आहोत व आम्हालाही भावना असल्याचे वचन त्यांनी सांगितले. शरद पवारांचे नाव आले म्हणून व्यथित होऊन राजीनामा दिला असेल तर ही व्यथा त्यांनी इतरांना का नाही सांगितली? दुसरे असे की, राजीनाम्याआधी चार दिवसांपासून ते विधानसभा अध्यक्षांच्या संपर्कात होते व त्यांनी राजीनामा देण्याची वेळ नक्की केली होती. जर त्यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला असेल तर त्या संघर्षाच्या दिवशी ते पवारांबरोबर कुठेच दिसले नाहीत. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ते पाहिल्यावर वाटते, ‘‘दादा, कुछ तो गडबड है!’’

आपली प्रतिक्रिया द्या