सामना अग्रलेख – आता तरी धोका ओळखा!

पावसाने यंदा महाराष्ट्रासह देशात कहर केला. तापमान वाढीमुळे पर्यावरणाला जी हानी पोहोचत आहे त्याचीच ही प्रतिक्रियाआहे. ‘सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एन्व्हायर्नमेंटया संस्थेच्या हवामानतज्ञांनीही त्याला दुजोरा दिला आहे. गेल्याच महिन्यात अलास्कामधील एक महाकाय हिमनग पूर्णपणे वितळून नष्ट झाला आणि तापमानवाढीचा पहिला बळी ठरला. अलास्कामध्ये हिमनग वितळला आणि आपल्या देशात लहरी अतिवृष्टी झाली. झपाट्याने होणारी तापमानवाढ आणि त्यामुळे निसर्गचक्रात होत असलेला बदल हा धोका आतातरी ओळखा, असाच इशारा यंदाच्या अतिवृष्टीने जाता जाता दिला आहे.

महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली असली तरी उत्तरेकडील राज्यात त्याचे थैमान अद्यापि सुरू आहे. विशेषतः उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर, दरभंगा, पूर्व चंपारण्य, गया, भागलपूर आदी जिल्हय़ांना पुराचा तडाखा बसला आहे. त्यात आतापर्यंत सुमारे 28 तर उत्तर प्रदेशात 70 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेती, घरेदारे उद्ध्वस्त झाली आहेत. पाटण्याच्या राजेंद्रनगर आणि परिसरात तर मागील पाच दिवसांपासून पुराचे पाणी ओसरलेलेच नाही. पाच फूट उंचीएवढे पाणी सर्वत्र साचले आहे अशीच स्थिती थोड्याफार फरकाने इतर जिल्हय़ांचीही आहे. सरकारने पूरपीडितांना नुकसानभरपाई वगैरे देण्याच्या घोषणा केल्या आहेत. मात्र झालेल्या नुकसानाची भरपाई कशी होणार हा प्रश्न आहेच. या वर्षी देशभरातच बहुतेक ठिकाणी पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुंबई आणि परिसरातही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यात सलग अतिवृष्टी झाली. विशेष म्हणजे एक-दोन दिवसांत संपूर्ण महिन्याचा पाऊस अशा पद्धतीने ही पर्जन्यवृष्टी झाली. गेल्या आठवड्यात पुणेकरांना भयंकर ढगफुटीचा तडाखा बसला. त्याआधी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्हय़ांना भीषण महापुराने वेढले. जवळजवळ एक आठवडा हे तिन्ही जिल्हे पाण्याखाली होते. कोकण, रायगड, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या भागालाही

अतिवृष्टीचा तडाखा

बसला आहे. दुर्दैवाने फक्त मराठवाडाच वरुणराजाच्या या ‘कृपा’वृष्टीपासून वंचित राहिला. तेथे आजही बऱ्याच भागांत पाण्याची कमतरता आहे. महाराष्ट्रासारखेच चित्र कमी-अधिक प्रमाणात अन्य राज्यांमध्येही आहे. वास्तविक, हवामान खात्याने देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे सरासरीच्या 96 टक्के पाऊस होईल असा अंदाज पावसाळय़ाच्या सुरुवातीला वर्तवला होता. ‘स्कायमेट’सारख्या संस्थेचे म्हणणेदेखील सरासरीच्या 93 टक्केच पाऊस पडेल असे होते, मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत सरासरीच्या 10 टक्के जास्त पाऊस देशभरात कोसळला आहे. आपले हवामान खाते एरवी ‘अंदाज पंचे’ म्हणून ओळखले जात असले तरी यंदा काही वेळेस या खात्याचा अंदाज बऱ्यापैकी तंतोतंत ठरला. मात्र पावसाने एकदम सरासरीपेक्षा 10 टक्के जास्त ‘कृपा’ कशी दाखवली हा प्रश्न उरतोच. हवामानाच्या अंदाजात 5 टक्के इकडे-तिकडे गृहीत धरले तरी थेट दहा टक्के वाढ पर्यावरणतज्ञांनाही कोड्यात टाकणारी आहे. अर्थात हे कोडेही आता उलगडले आहे. हवामानतज्ञांनी ही अतिवृष्टी जागतिक तापमानवाढीचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. खरे तर ही तज्ञमंडळी आता जे सांगत आहेत त्यात नवीन असे काहीच नाही. मात्र ते वारंवार सांगत असलेल्या धोक्याची प्रचीती यावर्षी पावसाने आपल्याला दिली आहे. हे आपण आता तरी लक्षात घेणार का, हा खरा प्रश्न आहे. कारण या वर्षी पाऊस

सरासरीपेक्षा जास्त

असला तरी तो असाधारण, अनियमित आणि बेभरवशासारखा पडला आहे. म्हणजे जून तसा कोरडाच गेला, जुलैमध्ये सरासरीच्या 105 टक्के, ऑगस्टमध्ये 115 टक्के आणि सप्टेंबरमध्ये तर सरासरीच्या थेट 152 टक्के पाऊस कोसळला. मुंबईमध्ये पाच वेळेस अतिवृष्टी झाली. पुण्यात ढगफुटी झाली. नाशिक आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरण 100 टक्के भरले आणि दोन वेळेस त्यातून पाणी सोडण्याची वेळ आली. मात्र त्याचवेळी मराठवाड्यातील इतर धरणे, बंधारे मात्र पावसाअभावी कोरडीच राहिली. पावसाच्या लहरीने यंदा महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याच भागात कहर केला. जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाला जी हानी पोहोचत आहे त्याचीच ही निसर्गाची ‘प्रतिक्रिया’ आहे. ‘सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एन्व्हायर्नमेंट’ या संस्थेच्या हवामानतज्ञांनीही त्याला दुजोरा दिला आहे. गेल्याच महिन्यात अलास्कामधील एक महाकाय हिमनग पूर्णपणे वितळून नष्ट झाला आणि तापमानवाढीचा पहिला बळी ठरला. अलास्कामध्ये हिमनग वितळला आणि आपल्या देशात लहरी अतिवृष्टी झाली. झपाट्याने होणारी तापमानवाढ आणि त्यामुळे निसर्गचक्रात होत असलेला बदल, चढउतार, लहरीपणा हा धोका आतातरी ओळखा, असाच इशारा यंदाच्या अतिवृष्टीने जाता जाता दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या