सामना अग्रलेख – जनहो, आशीर्वाद द्या!

3941

शिवसेना गुलाम असेल तर ती महाराष्ट्र स्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या विचारांची. ‘‘आपले सरकार येणार’’ असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा ते हिंदुत्ववादी विचारांचे, शिवसेना-भाजप युतीचे! स्वबळावर बहुमत कुणा एकाने मिळवावे व राज्य करावे असे महाराष्ट्राचे मानस नाही. विचाराने एकत्र यावे व राज्य करावे असा महाराष्ट्राचा जनादेश आहे. आम्ही तो जनादेश स्वीकारला आहे. ‘मराठी’ जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा. आम्ही त्यांना साष्टांग दंडवत घालत आहोत!

महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामाने परमोच्च बिंदू गाठला. प्रचाराच्या रणधुमाळीनंतर शिवरायांचा महाराष्ट्र नव्या विधानसभेसाठी आज मतदान करणार आहे. गेल्या पंधरा दिवसांत आरोप-प्रत्यारोपांचा जो धुरळा उडाला तो शनिवारी सूर्यास्तानंतर खाली बसला. 24 तारखेला निकाल लागून शिवसेना-भाजप युतीचा सूर्य उगवेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्या तोफांतून नक्की काय निघाले व लोकांपर्यंत काय पोहोचले याचा निकाल आज जनता ‘ईव्हीएम’मध्ये बंद करेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेच आहे, गुरुवारी ‘ईव्हीएम’मधून कमळच निघेल. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. राज्यात शिवसेना-भाजपची युती आहे व शस्त्रपूजेची परंपरा महाराष्ट्रात आहे. ज्या रामाच्या नावाने मतांचा गोवर्धन उचलायचा आहे, त्या रामाच्या हाती धनुष्यबाण आहे. त्यामुळे शस्त्रपूजेसाठी कमळ लागणारच आहे! या निवडणुकीच्या निमित्ताने राज्य ढवळून निघाले हे खरे, पण या ढवळण्यातून लोकांच्या हाती काय लागेल? समुद्रमंथनातून अमृत निघाले, कोणी म्हणतात मोती निघाले. तसे या ढवळण्यातून काही लोकहिताचे अमृतकण निघणार असतील तरच हे ढवळून निघणे सार्थकी लागेल. निवडणूक काळातील घोषणांचा पाऊस म्हणजे थापाथापीचा एक खुला बाजारच होऊन बसतो. बाजारात सध्या आर्थिक मंदीचा मार आहे, पण घोषणांच्या बाजारात अशी काही तेजी आहे की, अधूनमधून उसळणाऱ्या धनिकांच्या शेअर बाजारानेही मागे हटावे. शेवटी या घोषणांच्या बाजारातून कुणाचे काय घ्यायचे ते मराठी जनतेनेच ठरवायचे. शिवसेना शिवरायांचा भगवा आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन रणात उतरली आहे. महाराष्ट्राला शिवसेना नवीन नाही. किंबहुना, महाराष्ट्राच्या स्थापनेबरोबर शिवसेनेनेही जन्म घेतला व एका प्रखर विचाराचे पंख विस्तारून ती सतत गरुडझेप घेत राहिली. शिवसेनेला मोडून टाकण्याचे, मुळासकट उखडून टाकण्याचे प्रयत्न आणि वल्गना आतापर्यंत काय कमी झाल्या? पण ते कुणालाच जमले नाही.

शिवसेनेच्या विचारांची मुळे 

इतकी खोल गेली आहेत की, हातामध्ये वरचं काहीतरी येईल, पण खालचं काही लागायचे नाही. कारण त्यांना जे  खतपाणी घातले आहे ते शिवसैनिकांच्या घामाचं आणि रक्ताचं आहे. उखडून टाकण्याच्या वल्गना किंवा गुप्त कारवाया ज्यांनी केल्या तेच उखडले गेले. शिवसेना आहे तेथेच आहे. कुणी सत्तेच्या बळावर तर कुणी पैसा, दहशतवादाच्या तालावर शिवसेनेस आडवे जाण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांना उताणे करून शिवसेनेने पन्नाशी पार केली. आज जे पक्ष रिंगणात पहेलवानी करण्यासाठी उतरले आहेत त्यांच्यापेक्षा शिवसेना वयाने, कामाने आणि हिमतीने मोठी आहे. छातीला माती लावून आणि डोक्यास त्यागाचं कफन बांधून शिवसेना लढतच आहे. ही लढाई संपलेली नाही. पाच वर्षे सत्तेत राहूनही शिवसेना जनतेच्या प्रश्नांवर लढत राहिली, परखडपणे बोलत राहिली. ‘‘काय हो, शिवसेना सत्तेतही राहते आणि सोयीनुसार विरोधकांच्या भूमिकेतही शिरते, हे कसे?’’ असे प्रश्न विचारणाऱ्यांना आम्ही इतकेच सांगतो की, शिवसेना सत्तेत असेल किंवा नसेल, तिची पहिली बांधिलकी फक्त जनतेशी आहे. उगाच तोंडच्या वाफा दवडायच्या आणि दंडावरील बेटकुळ्या फुगवून दाखवायच्या ही स्टंटबाजी शिवसेनेला जमली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेने फक्त आवाजच उठवला नाही, तर महाराष्ट्रात रान उठवून एक जाग निर्माण केली व शेवटी सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. शेतकरी आणि कष्टकरी हाच शिवसेनेचा पाया आहे. मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली ती त्याच कष्टकऱ्यांच्या रक्तसिंचनातून. मुंबई हे फक्त पैसे ओरबाडण्याचे केंद्र तेव्हाही होते व आजही आहे. कधी मोगल, कधी आदिलशहा, कधी निजाम तर कधी जंटलमन ब्रिटिश देशाला लुटत राहिले. लुटण्याची आणि ओरबाडण्याची प्रवृत्ती तीच. फक्त चेहऱ्यावरचे मुखवटे बदलत राहिले याचा अनुभव महाराष्ट्राची राजधानी नेहमीच घेत आली आहे. तरीही मुंबईवर वचक आहे तो शिवसेनेचा! संपूर्ण महाराष्ट्राला आजही

मुंबई आपली वाटते ती 

शिवसेना येथे मजबुतीने पाय रोवून उभी असल्यामुळेच. शिवसेनेने राजकारणाइतकाच समाजसेवेचा वारसा सांभाळला. आमच्या वचननाम्याशी आम्ही बांधील आहोत. 10 रुपयांत येथील गोरगरीबांना जेवणाची थाळी देण्याची योजना आम्ही राबवणारच. 1 रुपयात 200 आरोग्य चाचण्यांची योजनाही पुढे नेणार. आतापर्यंतचे राज्यकर्ते आपल्याच खिशाचे आरोग्य सांभाळायचे, आम्ही जनतेचे आरोग्य सांभाळण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा करण्याची आमची भूमिका गरीबांच्या अर्थशास्त्राला धरून आहे. सत्ता ही जादूची छडी आहे, हातचलाखी नव्हे. ही जादूची छडी जनता ज्याची त्याला देत असते, पण जनतेसाठी राज्य चालविण्यासाठी एक निर्धार करावा लागतो. शिवसेना-भाजप युतीला मागची पाच वर्षे राज्य करता आले. महाराष्ट्र या काळात मागे गेला नाही, तो पुढेच गेला आहे. गरिबी, बेकारी आणि वाढती महागाई हटविण्याचे कार्यक्रम पन्नास वर्षांपासून सुरूच आहेत, पण त्यातही पंचेचाळीस वर्षे केवळ आश्वासने आणि पोकळ घोषणा करून जनतेला झुलविणारे कोण होते? लोकांसाठी काहीतरी करावे हे आता या विरोधकांना सुचू लागले आहे. मग सत्ता हाती असताना काय केले? भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचाच उद्योग त्यांनी केला. आपण सत्तेचा अमरपट्टा बांधून आलो आहोत, या राज्याचे आपणच तारणहार आहोत, त्राता आहोत या समजुतीने ते फक्त घोषणाबाजी करीत राहिले व आता ‘‘मागच्या पाच वर्षांत ‘युती’ सरकारने काय केले?’’ असा जाब विचारीत आहेत. शिवसेना सत्तेची गुलाम कधीच झाली नाही. शिवसेना गुलाम असेल तर ती महाराष्ट्र स्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या विचारांची. ‘‘आपले सरकार येणार’’ असे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा ते हिंदुत्ववादी विचारांचे, शिवसेना-भाजप युतीचे! स्वबळावर बहुमत कुणा एकाने मिळवावे व राज्य करावे असे महाराष्ट्राचे मानस नाही. विचाराने एकत्र यावे व राज्य करावे असा महाराष्ट्राचा जनादेश आहे. आम्ही तो जनादेश स्वीकारला आहे. ‘मराठी’ जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा. आम्ही त्यांना साष्टांग दंडवत घालत आहोत!

आपली प्रतिक्रिया द्या