सामना अग्रलेख – अपघातांचे दुष्टचक्र

केंद्र सरकार एकीकडे पायाभूत सुविधा, रस्तेनिर्मिती यांच्या गप्पा करीत असते. विक्रमी रस्तेनिर्मिती कशी झाली, होत आहे याचे दाखले देत असते, पण दुसरीकडे देशभरातील रस्ते अपघातांमध्ये खंड पडलेला नाही. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अपघातांचे दुर्दैवी दुष्टचक्र सुरू आहे. हे दुष्टचक्र पूर्णपणे थांबवता येणार नाही हे खरे, पण त्याचा वेग निश्चितपणे कमी करता येईल. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. सरकार, प्रशासन आणि समाज अशा तिघांचीही ती जबाबदारी आहे.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे भयंकर सत्र सुरू आहे. रविवारची मध्यरात्र जळगाव जिल्ह्यातील वऱहाडींसाठी काळरात्र ठरली. विवाहाचा स्वागत समारंभ आटोपून ही वऱहाडी मंडळी क्रुझरने घरी परतत होती. त्यावेळी भरधाव येणाऱया डंपरने क्रुझरला जोरदार धडक दिली. ती एवढी भयंकर होती की, त्यात क्रुझरचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यातील 17 पैकी 10 जण जागीच ठार झाले. नंतर आणखी दोघांचा मृत्यू झाला. तिकडे सांगली जिल्हय़ातील आटपाडी तालुक्यात अंत्यसंस्कारांसाठी जाणाऱयांवर मृत्यूने घाला घातला. पारनेरवाडीचे सहाजण नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. मात्र वाहनचालकाचा ताबा सुटल्याने त्यांची कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत कोसळली. त्यात सहापैकी पाचजण ठार झाले. एकजण काच फोडून बाहेर आल्याने बचावला. आठ दिवसांपूर्वी नाशिक जिल्हय़ातही अशाच पद्धतीने एका विचित्र दुर्घटनेत रिक्षासह एस.टी. बस विहिरीत कोसळली होती. त्या अपघातात 20-22 जणांना जलसमाधी मिळाली होती. अपघातग्रस्त रिक्षातील प्रवासी देवळा परिसरात सोयरीक जुळवण्यासाठी आले होते आणि परत निघाले होते. मात्र वाटेत भरधाव एसटीने त्यांच्या रिक्षाला धडक दिली आणि ही दोन्ही वाहने जवळच्या खोल विहिरीत कोसळली. काळाचा घाला कुठलाही फरक करीत नाही असाच या तीन वेगवेगळय़ा अपघातांचा अर्थ. सोयरीक जुळवायला गेलेले असोत, विवाह आटोपून परतणारे वऱहाडी असोत की अंत्यविधीला निघालेले शोकाकुल नातलग असोत, अपघात आणि निष्ठूर मृत्यू काहीच भेद करीत नाही.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात रस्ते अपघात आणि दुर्दैवी मृत्यूंचे असेच दुष्टचक्र सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दरवर्षी रस्ते अपघातांचे प्रमाण किमान 10 टक्के घटायला हवे. त्यानुसार हे प्रमाण जरूर कमी होत आहे, मात्र तरीही रस्ते अपघातांची संख्या, त्यातील बळींचे आकडे मनाचा थरकाप उडविणारेच आहेत. फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 या 12 महिन्यांत राज्यात 32 हजार 876 रस्ते अपघात झाले. त्यात 12 हजार 565 जणांचा मृत्यू झाला. यात सर्वात वरचा क्रमांक मुंबईचा आहे. मुंबईत 405 जण रस्ते अपघातात मरण पावले. अर्थात अपघात जास्त झाले तरी मृत्यू कमी झाले हा मुंबईसाठी दिलासाच म्हणावा लागेल. मुंबईसारख्या लोकसंख्येचा स्फोट झालेल्या शहरात अपघाती मृत्यू कमी झाले असले तरी संभाजीनगर आणि पुण्यातील अपघाती बळींचे आकडे चिंता वाढवणारेच आहेत. या दोन्ही शहरांतील बळींची संख्या अनुक्रमे 873 आणि 855 अशी आहे. पुणे हे सर्वाधिक दुचाकी वाहने आणि त्यांची बेशिस्त यासाठी बदनामच झाले आहे. हेल्मेट सक्तीवरूनही गेल्या वर्षी पुण्यात बरेच वादंग उठले होते. अशा पुण्यात रस्ते अपघातांचे आणि त्यातील बळींचे प्रमाण जास्तच असणार हे स्पष्ट आहे, पण संभाजीनगर जिल्हय़ात ही संख्या त्याहीपेक्षा अधिक असावी हे धक्कादायक आहे.

केंद्र सरकार एकीकडे पायाभूत सुविधा, रस्तेनिर्मिती यांच्या गप्पा करीत असते. विक्रमी रस्तेनिर्मिती कशी झाली, होत आहे याचे दाखले देत असते, पण दुसरीकडे देशभरातील रस्ते अपघातांमध्ये खंड पडलेला नाही. महाराष्ट्रात दररोज 37 जण रस्ते अपघातात प्राण गमावत आहेत. एकाच ठिकाणी सातत्याने अपघात होणाऱया ‘ब्लॅक स्पॉटस्’ची संख्यादेखील वेगाने वाढत आहे. 2016 मध्ये राज्यात 742 ब्लॅक स्पॉट होते. आता त्यांची संख्या 1500 पेक्षा अधिक झाली आहे. याचाच अर्थ रस्ते अपघात नियंत्रित करण्याच्या नियोजनात काही त्रुटी आहेत. अर्थात वाहन चालकांची बेदरकारी, बेशिस्त, वाहतूक नियमांचे उल्लंघन, रस्त्यांवरील खड्डे आणि इतर मानवी चुकादेखील रस्ते अपघातांसाठी जबाबदार आहेतच. जगात सर्वाधिक रस्ते अपघात हिंदुस्थानात होतात. हिंदुस्थानात सर्वाधिक अपघात होणाऱया राज्यांत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा आहे. त्या महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अपघातांचे दुर्दैवी दुष्टचक्र सुरू आहे. हे दुष्टचक्र पूर्णपणे थांबवता येणार नाही हे खरे, पण त्याचा वेग निश्चितपणे कमी करता येईल. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. सरकार, प्रशासन आणि समाज अशा तिघांचीही ती जबाबदारी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या