सामना अग्रलेख – मादुरो यांचे अपहरण!

व्हेनेझुएलातील अफाट तेलसाठ्यांवर डोळा ठेवूनच प्रे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष मादुरो यांचे अपहरण घडवले, हे उघड आहे. मात्र मतदान यंत्रात हेराफेरी करून वोटचोरीच्या माध्यमातून मादुरो सत्तेवर आले, म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी अमेरिकेने त्यांना अटक केली, असाही एक तर्क दिला जात आहे. खरे-खोटे व्हेनेझुएलाच्या जनतेलाच ठाऊक. मात्र, अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर तेथील जनता का पेटून उठली नाही, हादेखील सवाल आहेच! तथापि, कुठल्याही सार्वभौम देशावर हल्ला करून आपल्याला हवे ते सत्ताधीश नेमण्याची अमेरिकेची ही दादागिरी जगाने का सहन करावी? अमेरिकेने आज व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांचे अपहरण केले; उद्या कुठल्याही देशाच्या नको असलेल्या प्रमुखाला अमेरिका असेच उचलू लागला, तर काय होईल?

अमेरिकेचे सनकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिवसेंदिवस बदनाम होत चालले आहेत. विक्षिप्त वर्तन, बेताल बडबड आणि उटपटांग कारवाया यामुळे प्रे. ट्रम्प यांची जागतिक प्रतिमा तर काळवंडत आहे, पण खुद्द अमेरिकेतही त्यांच्याविरुद्ध असंतोष वाढतो आहे. मात्र एखादा मस्तवाल हुकूमशहा जसा आपल्याच मस्तीत एकानंतर एक चुका करत जातो, त्याच दिशेने प्रे. ट्रम्प यांची सारी वाकडी पावले पडत आहेत. व्हेनेझुएलावर अचानक हल्ला करून तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नीला प्रे. ट्रम्प यांच्या कमांडोंनी सरळ उचलून अमेरिकेत आणले. एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला अशा रीतीने अटक करून घेऊन जाण्याचा परवाना अमेरिकेला कोणी दिला? शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अमेरिकेची दीडशे विमाने अचानक व्हेनेझुएलात घुसतात. तेथील एअर डिफेन्स सिस्टिम निकामी करण्यासाठी आधी राजधानी कराकस शहराचा वीजपुरवठा बंद केला जातो. अमेरिकेची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन कुठलाही प्रतिकार न होता आठ महत्त्वाच्या ठिकाणांवर भयंकर हल्ले चढवतात. अमेरिकेच्या डेल्टा पर्ह्सचे कमांडो राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचतात आणि लोखंडाच्या एका सुरक्षित भुयारी खोलीत प्रवेश करत असतानाच मादुरो यांची गचांडी पकडून त्यांना अटक करतात. हातकड्या घालून

त्यांना अमेरिकेत आणले जाते.

‘अॅब्सॉल्युट रिसॉल्व्ह’ असे नाव दिलेले हे थरारक ऑपरेशन अमेरिकन सैन्य अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण करते. अमेरिकेने अचानक केलेल्या या कारवाईमुळे जगभरात खळबळ उडाली. जगभरातील पंतप्रधान, राष्ट्रपती हैराण झाले. मात्र रशिया व चीन हे दोन देश वगळता एकाही देशाने अमेरिकेच्या या कारवाईचा साधा निषेधही नोंदवला नाही. हिंदुस्थानने चिंता व्यक्त करणारे एक पत्रक तेवढे काढले; पण यात कुठेही अमेरिकेचा साधा उल्लेखही केला नाही. पाकिस्तानला कडेवर घेऊन सतत हिंदुस्थानला दूषणे देणाऱया प्रे. ट्रम्प यांना आपले 56 इंची राज्यकर्ते सडेतोड उत्तर का देत नसावेत, असा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. ‘मी पंतप्रधान मोदींवर नाराज आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच मोदी मला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत व मला खूश करण्यासाठीच त्यांनी रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे,’ असे आचरट विधान ट्रम्प यांनी अलीकडेच केले. प्रे. ट्रम्प यांचे हे विधान म्हणजे केवळ मोदींचा नव्हे, तर समस्त हिंदुस्थानचा अपमान आहे. तरीही राज्यकर्ते हा अपमान मुकाट्याने का गिळत आहेत व त्यामागे काही रहस्य तर दडले नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. व्हेनेझुएलावरील सैन्य कारवाईसाठी अमेरिकेने जी कारणे दिली ती निव्वळ हास्यास्पद आहेत. ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचे आरोप अमेरिकेने मादुरो यांच्यावर ठेवले आहेत. व्हेनेझुएलातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येत असतील तर ‘सुपरपॉवर’च्या सीमा भलत्याच तकलादू आहेत, असे म्हणावे लागेल. मुळात हे कारण नाहीच. व्हेनेझुएलात सत्ता बदल करणे, तेथील प्रचंड तेलसाठे आणि खनिज संपत्तीची लूट करणे हाच अमेरिकेचा मुख्य हेतू आहे. इराकमध्येही अमेरिकेनेच असेच खोटे आरोप लावून सद्दाम हुसेन यांना फासावर लटकवले व तेथील तेल विहिरींवर कब्जा केला. एखाद्या सार्वभौम देशावर मनमानी पद्धतीने हल्ले चढवून ते देश बेचिराख करण्याचे अमेरिकेचे उद्योग अनेक दशकांपासून सुरू आहेत. मात्र महासत्ता असलेल्या

अमेरिकेशी वाकडे

कशाला घ्यायचे, या भूमिकेतून आंतरराष्ट्रीय समुदायाने कायमच या दडपशाहीविरुद्ध मौन बाळगले. सगळे जग आपल्याला घाबरते, त्यामुळे आपण कुठल्याही देशावर कसाही वरवंटा फिरवला तर आपल्याला कोण विचारणार, हा अमेरिकेचा समज अधिक बळावत गेला तो या मौनामुळेच. अमेरिकेने बळाच्या जोरावर व्हेनेझुएलावर हल्ला करून त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला पळवून नेले. उद्या हीच परिस्थिती अन्य कुठल्याही देशावर येऊ शकते, याचे भान जागतिक समुदायाला असू नये, हे आश्चर्यकारक आहे. व्हेनेझुएलातील अफाट तेलसाठ्यांवर डोळा ठेवूनच प्रे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष मादुरो यांचे अपहरण घडवले, हे उघड आहे. मात्र मतदान यंत्रात हेराफेरी करून वोटचोरीच्या माध्यमातून मादुरो सत्तेवर आले, म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी अमेरिकेने त्यांना अटक केली, असाही एक तर्क दिला जात आहे. खरेखोटे व्हेनेझुएलाच्या जनतेलाच ठाऊक. मात्र, अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर तेथील जनता का पेटून उठली नाही, हादेखील सवाल आहेच! तथापि, कुठल्याही सार्वभौम देशावर हल्ला करून आपल्याला हवे ते सत्ताधीश नेमण्याची अमेरिकेची ही दादागिरी जगाने का सहन करावी? अमेरिकेने आज व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांचे अपहरण केले; उद्या कुठल्याही देशाच्या नको असलेल्या प्रमुखाला अमेरिका असेच उचलू लागला, तर काय होईल? प्रे. ट्रम्प यांनी मध्यंतरी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी बरीच खटपट केली. जगभरात अशांतता निर्माण करणाऱया या महाशयांना नेमके कोणते इनाम द्यावे, याचा विचार आता संयुक्त राष्ट्रसंघानेच करायला हवा!