लेख – ‘पांढरी काठी’ – प्रवास सुकर करणारी जीवनसाथी!

>> दि. मा. प्रभुदेसाई

आपल्या नेहमीच्या ओळखीच्या जागेत रुमालाने डोळे बांधून ज्यावेळी आपण मडके फोडण्याचा किंवा आंधळी कोशिंबिरीचा खेळ खेळतो त्यावेळी आपली कशी फजिती होते हे पाहिल्यावर अंध व्यक्ती अडचणींच्या अनेक खाचखळग्यांनी भरलेला प्रवास कसे करत असतील? असा प्रश्नही पडतो आणि कौतुकही वाटते. त्यांचा हा प्रवास सुकर करणारी त्यांची जीवनसाथी, जीवनरेषा असते त्यांच्या हातातील पांढरी, पांढरी-लाल काठी. तिची सुरक्षितता जपणे हे आपल्या सर्वांचे एक सामाजिक कर्तव्य आहे. उद्याच्या जागतिक ‘पांढरी काठी दिना’निमित्त…

खरे म्हणजे ‘काठी’ म्हटले की, ती कुणाला तरी मारण्यासाठी किंवा धुतलेले कपडे वरच्या दोरीवर किंवा दांडीवर वाळत घालण्यासाठीच असते हे आपल्या मनात पक्के ठसलेले असते. आणखी एक महत्त्वाची काठी म्हणजे ‘डोलकाठी’. अथांग सागरात केवळ वाऱयाच्या माध्यमाने विहार करणाऱया जहाजांचा प्रवास या डोलकाठीवर अवलंबून असतो! आणखी एक महत्त्वाची, अर्धगोलाकार वाकडय़ा मुठीची काठी म्हणजे वार्धक्याचे प्रतीक असलेली, जी वृद्ध चालताना आधारासाठी वापरतात. तिचा आणखीही एका कारणासाठी उपयोग होतो. ‘पुलं’नी एके ठिकाणी लिहिले आहे की, हे वृद्ध सकाळी ‘प्रभात फेरी’ला निघाले की, रस्त्याच्या बाजूला असलेल्या बंगल्यांच्या आवारातील फुलझाडांच्या फांद्या काठीच्या वाकडय़ा मुठीने बाहेर रस्त्यावर ओढून घेतात व फुले काढतात. कुठेही कायदेभंग नाही. सर्कसमधील रिंग मास्तरांच्या हातात असलेली एवढीशी काठी भलतीच ताकदवान असते. वाघ, सिंहासारख्या हिंस्र पशूंनाही आपल्या सांगण्याप्रमाणे कसरती करायला लावण्याएवढा धाक त्या इवल्याशा काठीत असतो.

अशा या काही काठय़ा त्या त्या संबंधितांच्या आयुष्याशी एवढय़ा एकरूप झालेल्या असतात की, त्यांची प्रतीकेच ठरतात. ती काठी दिसली की, ती व्यक्ती आठवणारच!

चित्रकारांनी, विशेषतः व्यंगचित्रकारांनी आपल्या व्यंगचित्रात अशा या प्रतीकांचा चांगला उपयोग केलेला आढळतो.

त्याप्रमाणे सध्या पांढरी व पांढरी-लाल काठी म्हणजे अनुक्रमे अंध व अंध आणि बधिर असे समीकरण झाले आहे. जीवनाच्या अथांग सागरात प्रवास करताना ही हातातील काठी अंधांना डोलकाठीइतकीच महत्त्वाची असते.

1921 ः इतिहासावरून असे दिसते की, 1921 साली ‘ब्रिस्टॉल’ येथील एक छायाचित्रकार जेम विंग्ज यांना एका अपघातात अंधत्व आले. म्हणून त्यांनी गडद रंगाची काठी वापरायला सुरुवात केली, पण ती वाहनांना व इतर पादचाऱयांना ओळखता येईना.
1930 ः ‘पिओरा एलिनाईझ’ यांनी पांढऱया काठीचा कायदा प्रथम जगात प्रचलित केला. हिंदुस्थानात यायला तिला 1971 साल उजाडले.
1931 ः फ्रान्समधील ‘गिल्ली हर्बर्टमाँट’ यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर पांढऱया काठीचे प्रात्यक्षिक सादर केले.
1944 ः दुसऱया महायुद्धानंतर 1944 साली डॉ. रिचर्ड व्हुवर यांनी अंधांना सोयीची पडेल अशी काठी वापरात आणली. तिला ‘व्हुवर केन’ असे नाव दिले. ती कशी वापरायची याचे शिक्षण त्यांनी अंधांना दिले. म्हणून त्यांना ‘फादर ऑफ व्हुवर केन’ किंवा ‘लाँग केन’ असे म्हणतात. पुढे त्यांनीच अंधांना आणखी सोयीची व वजनाने हलकी अशी घडीची काठी तयार केली. 1971 साली त्यांनी हिंदुस्थानात डेहराडून येथे एक काठी केंद्र सुरू केले. आता अशा काठय़ांचे उत्पादन मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू इत्यादी ठिकाणीही केले जाते. मुंबईत वरळी येथे अंधांसाठी काम करणारी ‘नॅब’ ही संस्था आहे. 1931 मध्ये हर्बर्टमाँट यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर पांढऱया काठीचे प्रात्यक्षिक करून दाखविल्यानंतर अमेरिकेचा लायन्स क्लब अध्यक्ष जॉर्ज बोन हॅम यांनी फ्रान्सला 5000 काठय़ा सैनिकांसाठी पाठवून दिल्या.

1964 ः 6-10-1964 ला अमेरिकेचे अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये `Cane Safety Day’ (पांढरी काठी सुरक्षा कायदा) संमत करून घेतला व तेव्हापासून 15 ऑक्टोबर हा सर्व जगात ‘पांढरी काठी सुरक्षा दिन’ म्हणून साजरा करावा असे आदेश दिले. 1-6-1968 रोजी ‘युनो’नेही त्याला मान्यता दिली.

आता अनेक प्रकारच्या धातूच्या काठय़ाही मिळतात. लाँग केन, सिंबॉल केन, गाईड केन, किडीकेन. अशा अनेक प्रकारच्या काठय़ा असल्या तरी प्रामुख्याने ‘लाँग केन’च वापरली जाते. ‘किडी केन’ लहान मुलांसाठी आहे. इंग्लंडमध्ये वय वर्षे 10 पर्यंत मुलांना काठी वापरायची बंदी होती, पण पुढे याच वयात लहान मुले कोणतीही नवीन गोष्ट लवकर आत्मसात करतात हे लक्षात आल्यावर ही बंदी उठली. आता मुले चालायला लागल्यापासूनच त्यांना या काठीचा वापर व उपयोग करण्यास शिकवितात. आता ‘जोसेफ कटर’ व ‘लिली विल्सन’ हे अंध अर्भकांच्या हालचालींचा अभ्यास करत आहेत. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अशी काठी तयार केली आहे, जी सहा फूट अंतरावरील अडथळे, आजूबाजूला कोण आहे ते सांगते. आता संगणकीय प्रणालीवर चालणारी अल्ट्रासॉनिक, सेन्सर, मायक्रो कंट्रोल, बझर, व्हायबेटर, दिशा, आवाजावरून सूचना देणारी, डोंगरदऱयांत सहलीला गेलेल्या अंधांना वाटेतील दगडधोंडे, खाचखळगे यांची सूचना देणारी अशा अनेक काठय़ा तयार करण्यात आल्या आहेत.
अजूनपर्यंत अर्जेंटिनात पूर्ण अंधांसाठी पांढरी, तर कमी दृष्टी असणाऱयांसाठी हिरवी काठी प्रचलित होती. आता मात्र सर्व जगात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पांढरी काठी म्हणजे अंध आणि पांढरी व लाल काठी म्हणजे अंध व बधिर व्यक्ती असेच सर्वत्र मानले जाते.

अशा प्रकारे अंधांना उपयोगी पडणाऱया अनेक काठय़ा आज उपलब्ध आहेत, पण आज मुंबईच्या रस्त्यावरील खाचखळग्यांतून, वाहनांच्या कोंडीतून, फेरीवाल्यांच्या झुंडीतून सुखरूपपणे मार्गक्रमण करण्यास मदत करणारी अशी एखादी काठी आम्हा डोळसांना उपलब्ध करून द्यावी अशी आम्हा अनेक डोळसांची मागणी आहे, असो.
आपल्या नेहमीच्या ओळखीच्या जागेत रुमालाने डोळे बांधून ज्यावेळी आपण मडके फोडण्याचा किंवा आंधळी कोशिंबिरीचा खेळ खेळतो त्यावेळी आपली कशी फजिती होते हे पाहिल्यावर अंध व्यक्ती अडचणींच्या अनेक खाचखळग्यांनी भरलेला प्रवास कसे करत असतील? असा प्रश्नही पडतो आणि कौतुकही वाटते. त्यांचा हा प्रवास सुकर करणारी त्यांची जीवनसाथी, जीवनरेषा असते त्यांच्या हातातील पांढरी, पांढरी-लाल काठी. तिची सुरक्षितता जपणे हे आपल्या सर्वांचे एक सामाजिक कर्तव्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या