सामना अग्रलेख – कर्नाक पुलास छ. प्रतापसिंह महाराजांचे नाव देणे योग्य ठरले असते

गेल्या दहा वर्षांत देशाला अनेक जखमा झाल्या. नोटाबंदी, लॉक डाऊन, पुलवामा, पहलगाम, पठाणकोट, उरी वगैरे. या सर्व काळ्या खुणाच आहेत. या काळ्या खुणा इंग्रज गव्हर्नर कर्नाकने केलेल्या नाहीत. त्यामुळे इतिहास चिवडताना भान राखायला हवे. कर्नाक पुलाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी इतिहासातील काळ्या खुणांचा संदर्भ दिला म्हणून इतकेच सांगायचे की, ऑपरेशन सिंदूरविषयी आम्हाला गर्व आणि आदर आहेच. भारतीय सैन्याचे शौर्य आणि पराक्रम यास आमची मानवंदना आहे, पण ‘कर्नाक’ पुलास छत्रपती प्रतापसिंह महाराजांचेच नाव देणे आवश्यक होते. किंबहुना तेच योग्य ठरले असते, पण भावनिक राजकारणापुढे सध्या कुणाचे काय चालते काय?

पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवादी आरोपी अद्यापि जेरबंद होऊ शकले नाहीत, पण त्यानिमित्ताने जे ‘ऑपरेशन सिंदूर’ भारतीय लष्कराने केले त्याचे राजकारण करणे सत्ताधाऱ्यांनी अद्यापि थांबवलेले नाही. अशा राजकारणावरच मोदी व त्यांच्या पक्षाचे सत्ताकारण सदैव सुरू असते. जे मोदी करतात ते अर्थात फडणवीसही करणारच. दक्षिण मुंबईतील ‘कर्नाक उड्डाणपुला’चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले हे बरे झाले. बऱ्याच काळापासून या पुलाचे काम रखडले होते व त्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. कर्नाक पूल म्हणून हा पूल परिचित होता. हा कर्नाक पूल 154 वर्षे जुना होता. ब्रिटिशांनी हा पूल बांधला व मुंबई पालिकेने पुढे त्या पुलाची देखभाल केली. शेवटी जीर्ण झालेला हा पूल पाडला व नव्याने उभारला. त्याचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी इतिहासाचा दाखला देत सांगितले, ‘‘काळी खूण पुसली.’’ ही काळी खूण कोणती? याचा खुलासा मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे. ‘दक्षिण मुंबईतील उड्डाणपुलाला तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर कर्नाकचे नाव देण्यात आले होते, परंतु इतिहासात नोंद असणारे दाखले पाहता, विशेषतः प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या साताऱ्याच्या इतिहासात उल्लेख आहे की, गव्हर्नर कर्नाकच्या काळात छत्रपती प्रतापसिंह महाराज, मुधोजीराजे यांच्यावर अन्याय करण्यात आला. भारतीयांवर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे लादण्यात आले. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील अशा

काळ्या खुणा

पुसण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. त्यामुळे कर्नाक उड्डाणपुलाचे नामांतर ‘सिंदूर’ असे करीत आहोत,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. गव्हर्नर कर्नाकने त्याच्या काळात सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह महाराज व नागपूरचे मुधोजीराजे यांच्यावर अन्याय केला. त्यांची राज्ये बरखास्त केली. प्रतापसिंह महाराजांचे वकील रंगो बापूजी हे लंडनला जाऊन सातारच्या गादीविरोधात झालेल्या अन्यायावर झगडत राहिले. प्रतापसिंह महाराजांनी ब्रिटिशांना तडकवून सांगितले होते की, ‘‘मी शरणागती पत्करणार नाही. ही छत्रपती शिवरायांची गादी आहे. कुणा दुकानदाराची गादी नाही. मी तुमच्या पुढे मान तुकवणार नाही.’’ अशा स्वाभिमानी राजावर कर्नाकने अन्याय केला अशी इतिहासात नोंद आहे. मग कर्नाक पुलाला छत्रपती प्रतापसिंह महाराजांचेच नाव देऊन इतिहासातील काळी खूण पुसायला हवी होती. नव्याने बांधलेल्या कर्नाक पुलास छत्रपती प्रतापसिंह महाराज किंवा मुधोजीराजे यांचे नाव देणे सयुक्तिक ठरले असते. कर्नाकवर सूड घेतला असेही झाले असते, पण फडणवीस यांनी पुलास ‘सिंदूर’ नाव देऊन पहलगामच्या हल्ल्याचे भावनिक राजकारण केले. पहलगाम हल्ला किंवा सिंदूरचे राजकारण करू नका असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट बजावले आहे, पण इतिहासातील काळ्या खुणा पुसण्यासाठी

‘सिंदूर’चाच राजकीय वापर

केला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आधी पहलगाम झाले. त्यात अतिरेक्यांनी 26 महिलांच्या कपाळावरचे सिंदूर उजाडून टाकले. ज्यांनी हे असे अधम कृत्य केले ते अतिरेकी भारतीय सुरक्षा दलांना अद्याप सापडू शकलेले नाहीत. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ अर्धेअधुरेच राहिले आहे. दुसरे असे की, ‘जे ऑपरेशन सिंदूर’ भारतीय सैन्याने पाकिस्तानचे पंबरडे मोडण्यासाठी सुरू केले ते प्रे. ट्रम्प यांच्या दबावामुळे थांबवावे लागले. प्रे. ट्रम्प यांनी आतापर्यंत किमान 25 वेळा जाहीरपणे सांगितले की, ‘‘ऑपरेशन सिंदूर मी थांबवले.’’ भारतीय सैनाने पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध सुरू केलेले युद्ध प्रे. ट्रम्प थांबवतात व त्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे राजकारण भाजप करतो हे बरे नाही. पुन्हा ज्यांनी भयंकर अतिरेकी हल्ला केला ते अतिरेकी अद्यापि मोकाट असताना ‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय घेणे हा अपराध आहे. गेल्या दहा वर्षांत देशाला अनेक जखमा झाल्या. नोटाबंदी, लॉक डाऊन, पुलवामा, पहलगाम, पठाणकोट, उरी वगैरे. या सर्व काळ्या खुणाच आहेत. या काळ्या खुणा इंग्रज गव्हर्नर कर्नाकने केलेल्या नाहीत. त्यामुळे इतिहास चिवडताना भान राखायला हवे. कर्नाक पुलाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी इतिहासातील काळ्या खुणांचा संदर्भ दिला म्हणून इतकेच सांगायचे की, ऑपरेशन सिंदूरविषयी आम्हाला गर्व आणि आदर आहेच. भारतीय सैन्याचे शौर्य आणि पराक्रम यास आमची मानवंदना आहे, पण ‘कर्नाक’ पुलास छत्रपती प्रतापसिंह महाराजांचेच नाव देणे आवश्यक होते. किंबहुना तेच योग्य ठरले असते, पण भावनिक राजकारणापुढे सध्या कुणाचे काय चालते काय?