सामना अग्रलेख – तिसऱ्या लाटेचा धोका!

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशाचे आणि महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले. उद्योगधंदे, व्यापार ठप्प झाला. कोट्यवधी लोकांचा रोजगार बुडाला. त्यातच आता तिसऱ्या लाटेचे संकट उंबरठ्यावर धडका मारत आहे. हे संकट दारात येण्यापूर्वीच रोखावे लागेल. ‘टास्क फोर्स’ने दिलेल्या तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याचे गांभीर्य ओळखून जनतेने वेळीच सावध व्हावे आणि कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तेच सर्वांच्या हिताचे आहे. कारण निर्बंध आणि लॉक डाऊन आता देशाला आणि महाराष्ट्रालाही परवडणारे नाही.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने हाहाकार उडविल्यानंतर आता सारे काही स्थिरस्थावर होईल आणि अर्थचक्राचे रुतून बसलेले गाडे पुन्हा धावू लागेल, असे चित्र गेल्या काही दिवसांत निर्माण झाले. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे, असे वाटत असतानाच आता कोरोनाची तिसरी लाट येत्या दोन ते चार आठवड्यात धडकण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नेमलेल्या ‘कोविड-19 टास्क फोर्स’ने तिसऱया लाटेचा हा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या तज्ञ मंडळींनी हा अंदाज वर्तविताना विषाणूला रोखण्यासाठी ठरविलेल्या प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे कसे आवश्यक आहे, यावर अधिक भर दिला. टास्क फोर्सने दिलेला हा सावधानतेचा इशारा आणि तिसऱया लाटेला रोखण्यासाठी केलेल्या सूचना रास्तच आहेत. कोरोनाच्या दुसऱया लाटेने जो कहर माजविला, त्याचा कटू अनुभव महाराष्ट्रानेच नव्हे तर अवघ्या देशाने घेतला. हा कहर गेल्या आठ-दहा दिवसांत टप्प्याटप्प्याने कमी होताना दिसतो आहे. कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या आणि बळींची संख्या दिवसागणिक घटते आहे. सरकारने उचललेली कठोर पावले,

प्रशासनाची अविश्रांत मेहनत

आणि राज्याच्या कानाकोपऱयातील जनतेने केलेले सहकार्य यामुळेच कोरोनाच्या दुसऱया लाटेतील साखळी बऱयापैकी तोडण्यात आपल्याला यश आले. परिस्थितीत झपाटय़ाने होणारी सुधारणा पाहून सरकारने टप्प्याटप्प्याने व नियोजनबद्धपणे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली. गोरगरीबांच्या घरातील चुली पेटण्यासाठी, मध्यमवर्गीयांचे कामधंदे सुरक्षित ठेवण्यासाठी, व्यापारउदीम सुरळीत करण्यासाठी आणि एकूणच अर्थचक्राला आस्ते कदम का होईना, पण गती देण्यासाठी हळूहळू निर्बंध हटविणे आवश्यकच होते. हे निर्बंध हटविताना कोविड प्रतिबंधक नियमांचे कसोशीने पालन करण्याचे आवाहन सरकारने केले होते. मात्र, निर्बंध हटविल्यापासून शहरांतील रस्ते, बाजारपेठांमध्ये जी गर्दी उसळताना दिसते आहे, ती कोविड प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करणारी आहे. दोन व्यक्तींमध्ये अंतर न राखणे आणि नाकावरचा मास्क हनुवटीवर आणून गर्दीत मुक्तपणे संचार करणे म्हणजे कोरोनाला खुले आमंत्रण देण्यासारखेच आहे. महाराष्ट्र सरकारच्या कोविडरोधक टास्क फोर्सने नेमके त्यावरच बोट ठेवले आहे. गेल्या तीन-चार दिवसांतील अनियंत्रित गर्दी, गरज नसताना घराबाहेर पडणे आणि कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे हे चिंताजनकच आहे. दिवसभर लोकांची अशीच ये-जा आणि गर्दी सुरू राहिली तर कोरोनाची तिसरी लाट दोन ते चार आठवडय़ांतच

मुंबईसह महाराष्ट्रात

धडकू शकते, असा इशारा आता टास्क फोर्सने दिला आहे. त्याचे गांभीर्य जनतेनेही समजून घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 लाख इतकी नोंदवली गेली. दुसऱया लाटेत ही संख्या दुपटीने वाढून 40 लाख झाली आणि आता तिसरी लाट धडकलीच तर सक्रिय रुग्णांची संख्या 80 लाखांवर जाऊ शकते, अशी भीती टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. पहिल्या दोन लाटांचा अनुभव पाहता टास्क फोर्सने व्यक्त केलेली भीती निराधार म्हणता येणार नाही. ब्रिटनमध्येदेखील दुसऱया लाटेनंतर चार आठवडय़ांतच तिसरी लाट धडकली होती आणि तिथे पुन्हा कडक निर्बंध लादावे लागले होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेत देशाचे आणि महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले. उद्योगधंदे, व्यापार ठप्प झाला. कोटय़वधी लोकांचा रोजगार बुडाला. त्यातच आता तिसऱया लाटेचे संकट उंबरठय़ावर धडका मारत आहे. हे संकट दारात येण्यापूर्वीच रोखावे लागेल. ‘टास्क फोर्स’ने दिलेल्या तिसऱया लाटेच्या इशाऱयाचे गांभीर्य ओळखून जनतेने वेळीच सावध व्हावे आणि कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तेच सर्वांच्या हिताचे आहे. कारण निर्बंध आणि लॉक डाऊन आता देशाला आणि महाराष्ट्रालाही परवडणारे नाही.

आपली प्रतिक्रिया द्या