
जगातली अनेक मोठी शहरे कोरोनाशी लढताना हतबल झाली. न्यूयॉर्कसारखे सदा जिवंत शहर आता थोडे हालचाल करू लागले आहे. अशा स्थितीत धारावीने कोरोनाशी लढून दाखवले. धारावीत व्हायरसच्या छाताडावर पाय रोवून महापालिकेने जगात विजयपताका फडकवली. धारावीतील विजयाचा उत्सव साजरा व्हायला हवा. ‘सरकार काय करते?’ असे विचारणार्या विरोधकांनाही उत्सवात सन्मानाने बोलवा व मानाचे फेटे बांधा! धारावी अस्वच्छ, अस्पृश्य, टाकाऊ म्हणून हिणवले गेले. त्याच धारावीमुळे केंद्राने मुंबई महापालिकेची पाठ थोपटली! धन्यवाद! त्रिवार धन्यवाद!! थँक यू धारावी!!!
धारावीच्या बाबतीत कोरोना संक्रमण रोखण्याचे अवघड काम मुंबई महानगरपालिकेने करून दाखवले. धारावीत कोरोना संक्रमण नियंत्रणात आणता येते, मग इतरत्र का नाही, हा प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीचा उल्लेख नेहमी होतो. धारावीतील अठरापगड लोकसंख्या इतक्या दाटीवाटीची आहे की, तेथे एखाद्या रोगाचा किंवा विषाणूचा प्रसार झाला तर रोखणे कठीण आहे. अशा धारावीत कोरोनाचे संक्रमण सुरू झाले व वाढू लागले तेव्हा राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले. धारावीला आकार व उकार नाही. चामड्यापासून भंगारापर्यंत अनेक व्यवसाय येथे चालतात. खुराडे म्हणावे अशा घरात माणसे कोंबून राहतात. त्यात हा कोरोना घुसला व धारावी हा कोरोनाचा सगळय़ात भयंकर हॉटस्पॉट बनला. त्याच धारावीने कोरोना युद्ध जिंकले असून व्हायरस पराभूत झाला. त्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुंबई महानगरपालिकेला भरभरून शाबासकी दिली आहे. जगभरातील कोरोना युद्धात धारावीने विजयी पताका फडकवली. हे जसे मुंबई महानगरपालिकेचे यश तसे धारावीतील जनतेचेही यश आहे. ही लढाई जिकिरीची होती, पण जिद्दीच्या बळावर जिंकली असेच म्हणावे लागेल. धारावीच्या झोपडपट्टीत कोरोना रुग्णवाढीचा वेग 4.3 टक्के होता. तो जूनमध्ये 1.02 टक्क्यावर आला. दिवसाला सरासरी रुग्ण 43 असे प्रमाण होते. ते आता 19 वर आले. एप्रिलमध्ये धारावीत कोरोना रुग्णवाढीचा वेग 12 टक्के होता. रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 18 दिवसांचा होता, पण
कोरोनाविरुद्ध प्रशासनाने
असे युद्ध पुकारले की, रुग्ण दुपटीचा कालावधी मे महिन्यात 43 दिवस आणि जूनमध्ये 78 दिवसांवर आणला. मुंबई महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल यांनी ही जोखीम स्वीकारली व यशस्वी केली. धारावीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे कठीण काम होते. पालिकेने महत्त्वाचे काय केले की, रुग्ण कोरोनाग्रस्त झालाय की नाही याची वाट पाहत बसण्यापेक्षा कोरोना व्हायरसचा पाठलाग करणे सुरू केले. माणसे नाहीत, तर विषाणूची घुसखोरी शोधून आक्रमण केले. लॉक डाऊनचे नियम कडक केले व धारावीच्या जनतेने ते पाळले. त्याच काळात किरण दिघावकर यांच्यासारख्या अधिकार्याने ‘स्क्रीनिंग आणि टेस्टिंग’वर जोर दिला. कोणताही गोंधळ व भीतीचे वातावरण निर्माण होऊ दिले नाही. पालिकेचे आयुक्त चहल हे बेडरपणे अनेकदा धारावीत जाऊन अधिकारी व कर्मचार्यांना धीर देत होते. पोलीस आयुक्त परमबीरसिंग हे धारावीत स्वतः फिरत होते. लॉक डाऊन काळात घरीच बंदिवान झालेल्या श्रमिकांना घरपोच अन्न, धान्य, जेवण पुरवण्याचे काम या काळात प्रशासनाने केले. धारावीत आजपर्यंत साधारण 6 लाख लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरला पाठविण्यात आले. अशा ज्या केंद्रात व इस्पितळात मनुष्यबळ कमी होते तेथे महापालिकेने ‘पब्लिक-प्रायव्हेट’ भागीदारीचा मार्ग स्वीकारला. पालिकेने खासगी डॉक्टर्स व कर्मचार्यांना पी.पी.ई. किट, थर्मल स्कॅनर, मास्क आणि हातमोजे, पल्स ऑक्सिमीटर्स पुरवून
घरोघरी तपासण्या
सुरू केल्या. खासगी डॉक्टरांना त्यांचे क्लिनिक उघडे ठेवण्यास सांगितले. या खासगी डॉक्टरांचे क्लिनिक सतत सॅनिटाइज्ड म्हणजे निर्जंतुक करण्यात आले. अत्यंत योजनाबद्ध रीतीने ‘कन्टेन्मेंट रणनीती’ अमलात आणून महापालिकेने धारावीतील कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले. अद्याप युद्ध संपलेले नाही. कोरोनाचा शेवटचा रुग्ण असेपर्यंत हे युद्ध संपणार नाही. पण धारावीचे काय होणार, हे सगळ्यात मोठे प्रश्नचिन्ह होते, ते आता धूसर झाले आहे. महाराष्ट्रात नव्या रुग्णांचा वेग वाढतो आहे. पुणे, सोलापूरसारखी शहरे कोरोनाच्या विळख्यात अडकून पडली आहेत. ठाणे मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली कोरोनाने बेजार झाले आहेत. मुंबईतील भांडुप, मुलुंड, अंधेरी ते दहिसरपर्यंत पुन्हा कडक लॉक डाऊन करावे लागत आहे. मलबार हिलसारख्या उच्चभ्रू वस्त्यांत कोरोनामुळे अनेक गगनचुंबी इमारती ‘सील’ करण्यात आल्या आहेत. जगातली अनेक मोठी शहरे कोरोनाशी लढताना हतबल झाली. न्यूयॉर्कसारखे सदा जिवंत शहर आता थोडे हालचाल करू लागले आहे. अशा स्थितीत धारावीने कोरोनाशी लढून दाखवले. धारावीत व्हायरसच्या छाताडावर पाय रोवून महापालिकेने जगात विजयपताका फडकवली. धारावीतील विजयाचा उत्सव साजरा व्हायला हवा. ‘सरकार काय करते?’ असे विचारणार्या विरोधकांनाही उत्सवात सन्मानाने बोलवा व मानाचे फेटे बांधा! धारावी अस्वच्छ, अस्पृश्य, टाकाऊ म्हणून हिणवले गेले. त्याच धारावीमुळे केंद्राने मुंबई महापालिकेची पाठ थोपटली! धन्यवाद! त्रिवार धन्यवाद!! थँक यू धारावी!!!



























































