आजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे?

164

निम्मा पावसाळा संपला, पण पाऊसच पडत नसल्यामुळे मराठवाडय़ासह निम्म्या महाराष्ट्रात भीषण परिस्थिती ओढवली आहे. पेरण्यांचा पत्ता नाही. प्यायला पाणी नाही. कर्ज फिटत नाही. आत्महत्या थांबत नाहीत. विमा कंपन्याही गळा घोटतात. दुष्काळही पाठ सोडायला तयार नाही. शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे?

बेभरवशाच्या पावसाने महाराष्ट्राचे ग्रामीण जनजीवन उध्वस्त केले आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांपैकी दोन महिने संपत आले तरी निम्म्याहून अधिक महाराष्ट्र अजूनही कोरडाठाक आहे. मुंबई आणि कोकणात धो धो कोसळणाऱ्या पावसाने महाराष्ट्राच्या अन्य भागांकडे मात्र पाठ फिरवली आहे. काही तुरळक तालुके सोडले तर संपूर्ण मराठवाड्यात पाऊस आणि पावसाळ्याचा कुठेही मागमूस दिसत नाही. जून गेला, जुलै संपत आला तरी पेरण्या करण्याइतकाही पाऊस न झाल्यामुळे गाव-खेड्यांमध्ये सन्नाटा पसरला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्हे आणि खान्देशातही जवळपास अशीच परिस्थिती आहे. कोरडा दुष्काळ हा या तिन्ही भागांच्या आता पाचवीलाच पुजला आहे. सततचे अवर्षण, आटलेल्या विहिरी, नदीनाल्यांचे वाळवंट, कोरडीठाक पडलेली शेतशिवारे, आटलेली धरणे आणि धरण क्षेत्रातील मैलोन्मैल दिसणाऱया भेगाळ जमिनी हे तेच ते दुष्काळाचे भयंकर आणि भेसूर चित्र मराठवाडय़ाने आणखी किती वर्षे बघावे? हिंगोली जिल्ह्यातील एका गावातून आलेली बातमी तर भयंकर आहे. सलग तीन वर्षांपासून भीषण दुष्काळाला तेंड देणाऱ्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा या गावच्या गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अख्खे गावच विकत घेण्याची मागणी केली आहे. गावातील एक हजार शेतकऱ्यांपैकी जेमतेम 35 शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. बाकी शेतकरी मात्र वंचित राहिले. त्यामुळे

संतापलेल्या गावकऱ्यांनी

गाव विक्रीला काढल्याचे पोस्टर ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर चिकटवले आहे. ग्रामस्थांनी बुधवारी गावसभा घेतली. पीक विमा द्या, सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा गाव विक्रीस काढा, अशी मागणी या सभेत गावकऱ्यांनी केली आणि इच्छामरणाची परवानगीही मागितली. याच मागणीसाठी गावातील शाळा आणि ग्रामपंचायत गावकऱ्यांनी बंद केली आहे. दुष्काळ आणि बेरोजगारी याला वैतागून ताकतोडा येथील ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले. सततचा दुष्काळ आणि प्रशासनातील अनास्था यामुळे ग्रामीण जनता किती मेटाकुटीस आली आहे याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. गावागावांतील शेतकरी आज डोळ्यात पाणी आणून आकाशाकडे आशाळभूतपणे बघत आहेत. मात्र निसर्गाचा कोप असा की पावसाचा टिपूस तर पडत नाहीच पण वरून उन्हाळ्य़ाप्रमाणे रणरणत्या उन्हाचे चटके मात्र बसत आहेत. पावसाळ्य़ाच्या प्रारंभी जो काही थोडाफार पाऊस झाला आणि ज्या जमिनी भिजल्या त्याही आता प्रचंड तापमानामुळे पुन्हा कोरड्या पडल्या आहेत. वास्तविक जुलैच्या मध्यानंतर उडिद, मुगासारखी खरिपाची पिके शेतांमध्ये डोलू लागतात. जिकडे पाहावे तिकडे हिरवीगार शेते दिसू लागतात, पण पावसाच्या दगाबाजीमुळे अजूनही प्रत्येक गावात पेरण्यांसाठी नांगरून ठेवलेली काळी ढेकळेच दिसत आहेत. पावसाळ्यातील हिरवाई हरवली आहे आणि सर्वत्र दुष्काळाची काळी छाया पसरली आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे रब्बीची पेरणी झाली नव्हती. त्यापाठोपाठ यावर्षीच्या पावसाने खरिपाच्या पेरण्या रोखून धरल्यामुळे शेतकऱ्यांचे

लागोपाठ दोन हंगाम

बरबाद झाले आहेत. सलग दोन हंगाम हातातून गेल्यानंतर होणाऱ्या नुकसानीचा अंदाज शहरी जनतेला आणि नोकरदार वर्गाला कदाचित येणार नाही. शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मात्र या मरणकळाच असतात. मान्सूनच्या पहिल्या सरी यावर्षी आधी मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात कोसळल्या. त्यामुळे उत्साहाच्या भरात काही शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्या केल्या. त्या शेतकऱ्यांची व्यथा तर आणखी मोठी आहे. पेरलेले बियाणे उगवले खरे, पण नंतर पाऊसच गायब झाल्यामुळे या पिकांनी आता माना टाकल्या आहेत. उन्हाच्या चटक्यांनी डोळ्य़ादेखत जळत असलेली रोपे बघून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सततची नापिकी आणि नुकसान यामुळे उसणवार करून केलेली पेरणी करपताना पाहणं शेतकऱ्यांसाठी अत्यंत यातनादायक असतं. आता दुबार पेरणीसाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. भर पावसाळ्यातही ग्रामीण महाराष्ट्रात सुमारे पाच हजार टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील धरणांमध्ये खडखडाट आहे. गुरांच्या छावण्यांतून गावात परतलेली गुरे पुन्हा छावण्यांकडे निघाली आहेत. निम्मा पावसाळा संपला, पण पाऊसच पडत नसल्यामुळे मराठवाडय़ासह निम्म्या महाराष्ट्रात भीषण परिस्थिती ओढवली आहे. पेरण्यांचा पत्ता नाही. प्यायला पाणी नाही. कर्ज फिटत नाही. आत्महत्या थांबत नाहीत. विमा कंपन्याही गळा घोटतात. दुष्काळही पाठ सोडायला तयार नाही. शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे?

आपली प्रतिक्रिया द्या