सामना अग्रलेख – शेतकरी आणि कष्टकरी; आधार द्यावा लागेल!

5021

कोरोनामुळे `लॉक डाऊन’ आणि `लॉक डाऊन’मुळे अर्थव्यवस्था तसेच शेतीव्यवस्था `डाऊन’ असे गंभीर चित्र सध्या हिंदुस्थानसह सर्वच विकसनशील देशांमध्ये दिसत आहे. कोरोनाने विकसित देशांमध्येही हाहाकार माजवला आहे आणि विकसनशील देशांनाही पुन्हा खंबीरपणे उभे राहण्याचे आव्हान दिले आहे. शेतकरी आणि कष्टकरी हे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य खांब आहेत. सरकार, प्रशासन, उद्योग, कामगार आणि जनता अशा सर्वांनी एकत्र येऊन त्यांना आधार द्यावा लागेल.

`कोरोना’मुळे देशभरात `लॉक डाऊन’ होऊन आता दोन आठवडे उलटले आहेत. या काळात जीवनावश्यक वस्तू आणि औषधे वगळता अन्य सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचे आर्थिक आणि इतर दुष्परिणाम अर्थकारण, तसेच समाजकारणावर झाले आहेत. जगातील 180 पेक्षा जास्त देशांमध्ये थोड्या फार फरकाने हीच स्थिती आहे. आपल्या देशातील परिस्थिती वेगळी नाही. नोकरदारांपासून कष्टकऱ्यांपर्यंत, उद्योग-व्यवसाय आणि व्यापाऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच कोरोनाचा तडाखा सहन करावा लागत आहे. आपल्याकडे शेतकरी एरव्हीही अस्मानी आणि सुलतानीच्या तडाख्याने हवालदिल असतो. त्यात आता कोरोना आपत्तीची भर पडली आहे. कधी दुष्काळाचा फेरा, तर कधी महापुराचा फटका. कधी लांबलेला पाऊस, तर कधी अवकाळी पाऊस. आपल्याकडे शेती व शेतकरी यांच्यासाठी हा लहरी निसर्ग नेहमीचाच झाला आहे. गेल्याच महिन्यात राज्यातील बऱ्याच भागांत गारपीट आणि अवकाळी पावसाने उभे पीक आडवे केले, त्यातूनही जे वाचले ते आता कोरोनामुळे शेतकऱ्याला स्वत:च फेकून द्यावे लागत आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर बहरलेल्या फूल शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. याशिवाय धान, केळी, टॉमेटो आदी पिकेदेखील टाकावी लागली आहेत. जामखेड तालुक्यातील योगीनाथ जायभाय या तरुण शेतकऱ्यावर 10 टन रंगीत ढोबळी मिरची बांधावर टाकून देण्याची वेळ आली. कांद्याचे लिलाव 2-3 दिवसांआड आहेत. हा कांदा उत्पादकांना एक दिलासाच म्हणावा लागेल. कोरोनामुळे झालेल्या `लॉक डाऊन’मध्ये भाजीपाला, तसेच फळफळावळ यांच्या विक्रीवर बंदी नाही तरी एकूणच स्थिती

बिकट

असल्याने भाजीपाला, फळे, फुले यांची आवकजावक थंडावली आहे. लिलाव मंदावले आहेत. त्यामुळे शेतमालाला उठाव नाही. अर्थात, राज्य सरकार याही स्थितीत शेतमालाची वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्याची पराकाष्ठा करीत आहे. शेतकऱ्यांचा आगामी खरीप हंगाम वाया जाऊ नये यासाठी राज्यात काही ठिकाणी कृषी सेवा केंद्रे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. `लॉक डाऊन’चा आणखी दुष्परिणाम जगभरातील असंघटित मजुरांवरही झाला आहे. हिंदुस्थानचा विचार केला तर देशातील सुमारे 40 कोटी कष्टकरी आणि कामकऱयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारण हातावर पोट असणाऱया या लोकांचा रोजगारच हिरावला गेला आहे. पुढील तीन-चार महिने ही भयंकर स्थिती असू शकते, असा इशारा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनेच दिला आहे. आपल्या देशात तर 90 टक्के कामगार असंघटित आहेत. त्यामुळे हा संपूर्ण वर्गच

उपासमारीच्या खाईत

ढकलला जाण्याची भीती आहे. संपूर्ण जगात ही गंभीर समस्या उभी राहणार आहे. त्यावर मात करण्यासाठी सगळ्यांना एकत्रित काम करावे लागेल. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक गाय रायडर यांनी असे म्हटले आहे की, हे संकट दूर करण्यासाठी उद्योग आणि कामगार यांना परस्पर सहकार्याची गरज भासेल. कारण फक्त असंघटितच नाही तर जगातील सुमारे 10 कोटी `पूर्णवेळ’ कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरही बेरोजगारीची टांगती तलवार असणार आहे. ती दूर करतानाच शेती आणि असंघटित कामगारांना उभे करण्याचे काम करावे लागणार आहे. कोरोनामुळे `लॉक डाऊन’ आणि `लॉक डाऊन’मुळे अर्थव्यवस्था तसेच शेतीव्यवस्था `डाऊन’ असे गंभीर चित्र सध्या हिंदुस्थानसह सर्वच विकसनशील देशांमध्ये दिसत आहे. कोरोनाने विकसित देशांमध्येही हाहाकार माजवला आहे आणि विकसनशील देशांनाही पुन्हा खंबीरपणे उभे राहण्याचे आव्हान दिले आहे. शेतकरी आणि कष्टकरी हे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य खांब आहेत. सरकार, प्रशासन, उद्योग, कामगार आणि जनता अशा सर्वांनी एकत्र येऊन त्यांना आधार द्यावा लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या