सामना अग्रलेख – हेही दिवस जातील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवरायांनी जेथे सोन्याच्या नांगराने शेती करून कष्टकऱ्यांना आधार दिला, त्या महाराष्ट्रात कष्टकऱ्यांचीच विजय पताका कधीकाळी फडकत होती, पण ते दिवस आता इतिहासजमा झाले. कष्टकऱ्यांची मुंबई मूठभर धनिकांच्या घशात जात आहे व ही मुंबई काळ्या कारनाम्याने जिंकण्याचा रावणी आनंद साजरा करणारेच आपल्या समोर महाराष्ट्राचे शत्रू म्हणून उभे ठाकले आहेत. या शत्रूस गाडून महाराष्ट्रावर विजयाची गुढी उभारण्याचा निश्चय करण्याचा आजचा ‘पाडवा’ आहे. आम्ही सर्व एक आहोत. आमच्यात आत्मविश्वास आहे. त्याच आत्मविश्वासाच्या बळावर महाराष्ट्राच्या आसमंतावर पसरलेले काळे ढग दूर करून नवे भगवे आकाश निर्माण करण्याचा निश्चय आज करू या. हेही दिवस जातील हा विश्वास सार्थ ठरवूनच आजची गुढी उभारू!

मराठी माणसांचे, महाराष्ट्राचे नववर्ष म्हणून आज गुढीपाडव्याचे मंगलमय तोरण उभारायला हवे. विजय, वैभव आणि वसंत ऋतूचे स्वागत करण्याचा आजचा दिवस प्रेरणादायी, आनंदमयी असावा हीच अपेक्षा साधारण मराठी माणसे ठेवतात. आमच्या महाराष्ट्रात मराठी अस्मितेची, स्वाभिमानाची, न्याय्य हक्कांची गुढी उभारण्याचा अधिकार आम्हाला ब्रह्मदेवानेच दिला. आजचा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्याची आठवण म्हणून पाळला जातो. विश्व ब्रह्मदेवाने निर्माण केले, पण महाराष्ट्र मात्र छत्रपती शिवरायांनी निर्माण केला. हिंदवी स्वराज्याची गुढी याच आमच्या राजाने उभारली. पुढे त्यांच्याच विचाराने महाराष्ट्रात विजयाच्या, संघर्षाच्या असंख्य गुढ्या-तोरणे फडकवून शिवरायांचे नाव राखले गेले. मराठी माणूस हा कायम भारताचा संरक्षक व आधार म्हणून राहिला. आजच्या गुढीपाडव्याचे वैशिष्ट्य असे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. मराठी माणसाला महाराष्ट्रात स्वाभिमानाने जगता आलेच पाहिजे या विचाराची गुढी उभारली ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी.

अगर सिवाजी न होते
तो सुनत सबकी होती
कासी की कला जाती
मथुरा की मसीद होती

असे कवी भूषणने छत्रपतींच्या शौर्याबाबत लिहून ठेवले आहे. तेच पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या बाबतीत म्हणता येईल. शिवसेनाप्रमुख नसते तर अयोध्येवर विजय पताका आजच्या सत्ताधारी हवशा-नवशांना फडकवता आली असती काय? हिंदूंमध्ये जे लढण्याचे, त्यागाचे आणि एकत्र येण्याचे

चैतन्य बाळासाहेबांनी निर्माण केले

ते कुणाला शक्य झाले असते काय? मराठी माणूस म्हणून त्याचा मुंबई, महाराष्ट्रावर पहिला हक्क राहीलच राहील, असे ठणकावून सांगण्याची हिंमत एका तरी महाराष्ट्रीय नेत्यात होती काय? मराठी माणसाच्या छातीत ही आत्मविश्वासाची ताकद देण्याचे काम बाळासाहेबांनी केले नसते तर आजचा पाय रोवून उभा असलेला मराठी माणूस दिसला नसता. गुढीपाडव्याच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टींचे स्मरण करायलाच हवे. विश्व ब्रह्मदेवाचे, पण मुंबईसह महाराष्ट्र मराठी माणसाने लढून, झगडून मिळवला म्हणून त्यावर विजय पताका मराठी जनांचीच फडकायला हवी हे नक्की. प्रत्येक गुढीपाडवा हा नव्या आशेचा संदेश देतो. राजा शालिवाहनाने शत्रूंवर विजय मिळवला तो हा दिवस. शत्रूंवर विजय मिळवणे हे अनेकदा अवघड वाटत असले तरी अथक संघर्षानंतर विजयाची पताका फडकतेच. देशात व महाराष्ट्रातही सध्या ज्या विजयाच्या आरोळ्या ठोकून ‘पाडवा’ साजरा करण्याचा उत्साह दिसत आहे तो प्रकार म्हणजे सत्ता आणि पैशांचा माज आहे. दुसऱ्या पक्षांतील जिंकून आलेली माणसे सरळ विकत घ्यायची आणि आपापल्या विजयाच्या पताका फडकवायच्या, विजयाच्या गुढ्या उभारायच्या असले दळभद्री उद्योग सध्या आपल्या महाराष्ट्रात व देशभरात बिनबोभाट चालले आहेत. या असल्या लोकांच्या हाती ना देश सुरक्षित आहे, ना हिंदू धर्म. जगात युद्धामुळे अशांतता, भय निर्माण झाले आहे. युद्ध दोन-चार देशांत सुरू आहे, पण भारत नावाचा स्वयंघोषित विश्वगुरू कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही. अमेरिका आणि इस्रायलसारख्या सावकारी राष्ट्रांचे गुलाम म्हणून जगणे भारतासारख्या महान देशाच्या नशिबी सध्या आले आहे. भारतीय जनतेचे हे असे नशीब फुटले ते त्यांनी

अंधभक्त बनून

केलेल्या मतदानामुळे. ‘गॅसचे सिलिंडर पाच हजार रुपयांना विकत घेऊ, पण आम्हाला मोदी आणि गोदीच हवेत,’ ही धर्मांध भांगेची गोळी संपूर्ण समाजाला बेबंद करत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीदेखील लोक ‘गॅस’च्या रांगेतच आहेत, पण कुठे संताप नाही की चीड नाही. आवाज उठवायचा तो शिवसेनेसारख्या ज्वलंत विचारांच्या पक्षाने. तो ज्वलंत विचारांचा पक्षही पैशांच्या जोरावर फोडण्यात आला व महाराष्ट्राला स्वाभिमानशून्य बनवण्याची अघोरी इच्छा काही लोकांनी पूर्ण केली. माणसाला स्वच्छ हवा नाही, स्वच्छ पाणी नाही, युवकांना नोकरी नाही, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दाम नाही, शेतकरी इतका हतबल झाला आहे की, स्वतःची किडनी विकून सावकारांची कर्जे फेडत आहे व हे सर्व आमच्या महाराष्ट्रात घडत आहे. छत्रपती शिवरायांनी जेथे सोन्याच्या नांगराने शेती करून कष्टकऱ्यांना आधार दिला, त्या महाराष्ट्रात कष्टकऱ्यांचीच विजय पताका कधीकाळी फडकत होती, पण ते दिवस आता इतिहासजमा झाले. शिवरायांचा महाराष्ट्र आता अदानीछाप उद्योगपतीचा होत आहे. कष्टकऱ्यांची मुंबई मूठभर धनिकांच्या घशात जात आहे व ही मुंबई काळ्या कारनाम्याने जिंकण्याचा रावणी आनंद साजरा करणारेच आपल्या समोर महाराष्ट्राचे शत्रू म्हणून उभे ठाकले आहेत. या शत्रूस गाडून महाराष्ट्रावर विजयाची गुढी उभारण्याचा निश्चय करण्याचा आजचा ‘पाडवा’ आहे. आम्ही सर्व एक आहोत. आमच्यात आत्मविश्वास आहे. त्याच आत्मविश्वासाच्या बळावर महाराष्ट्राच्या आसमंतावर पसरलेले काळे ढग दूर करून नवे भगवे आकाश निर्माण करण्याचा निश्चय आज करू या. हेही दिवस जातील हा विश्वास सार्थ ठरवूनच आजची गुढी उभारू!