
पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना म्हणजे पहलगामनंतरचा आणखी एक भयंकर ‘दहशतवादी’ हल्ला आहे. हा राष्ट्रद्रोहच आहे. जावेद मियांदाद पाकिस्तानी क्रिकेटची वकालत करण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचला तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला तोंडावर सांगितले, ‘‘जोपर्यंत कश्मीरात हिंदूंचे रक्त तुम्ही सांडत आहात तोपर्यंत पाकिस्तानबरोबर क्रिकेट होणार नाही. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही!’’ असे ठणकावून सांगणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कुठे आणि पाकिस्तानशी क्रिकेटची सलगी करणारे आजचे नकली हिंदुत्ववादी कोठे? भारताचा स्वाभिमान आणि कुंकवाच्या प्रतिष्ठेसाठी जनतेला लढावेच लागेल!
भारतात मोदींचे राज्य आल्यापासून सोयीनुसार हिंदुत्व आणि सोयीच्या राष्ट्रवादास उभारी मिळाली आहे. देशभक्ती वगैरे गोष्टी फक्त निवडणुका आणि मतांपुरत्याच उरल्या आहेत. तसे नसते तर 14 सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यास हिरवा कंदिल दाखवून पहलगाम हल्ल्यातील जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला नसता. कसला काय तो एशिया चषक दुबईत होत आहे. 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान टी-20 क्रिकेट सामना तेथे निर्लज्जपणे खेळवला जात आहे. भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू नये ही जनभावना आहे. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या रक्ताचे पाट कश्मीर खोऱ्यात वाहिले. ते रक्त अद्याप सुकलेले नाही. 26 मायभगिनींच्या डोळ्यात आजही अश्रूंच्या धारा वाहत आहेत. मृतांची मुलेबाळे, मित्र परिवार धक्क्यातून सावरलेले नाहीत. पाकिस्तानने हा दहशतवादी हल्ला घडवला. त्यामुळे भारतीय लोकांत पाकड्यांविषयी कमालीचा संताप असताना ‘जागतिक’ आणि ‘आंतरराष्ट्रीय’ नियम वगैरे सांगत मोदी सरकारने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यास परवानगी दिली. खरे म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर लगेच एक प्रखर हिंदुत्वाची बात याच मंडळींनी समोर आणली होती ती म्हणजे – ‘‘पहलगाममध्ये जे अतिरेकी घुसले व पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करत 26 जणांचे बळी घेतले तेथे प्रत्येकाला धर्म विचारून मारण्यात आले.’’ हा प्रकार भयंकरच आहे, पण मग आता दुबईत जो भारत-पाक क्रिकेट सामना होत आहे त्यात पाकच्या क्रिकेटपटूंनी धर्मांतर केले आहे की भारतातर्फे खेळणाऱ्यांनी स्वतःची वैचारिक सुंता केली आहे, हे पाहावेच लागेल. मोदी, शहा वगैरे पुढाऱ्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर जो शोक व्यक्त केला त्यानुसार, ‘‘आता आम्ही
पाकिस्तानचे कंबरडे
असे मोडू की, पाकिस्तान परत जगाच्या नकाशावर दिसणार नाही. आता पाकिस्तानबरोबर निर्णायक लढाईला तोंड फुटेल व पाकव्याप्त कश्मीरात घुसून त्याचा ताबा घेऊ,’’ अशा गर्जना केल्या व त्या योग्यच होत्या. रणशिंग फुंकून हिंदुस्थानने त्या वेळी पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, पण ते अमेरिकेच्या प्रे. ट्रम्पच्या दबावामुळे थांबवले. प्रे. ट्रम्प वारंवार भारत-पाक युद्ध आपणच थांबवल्याचे सांगतात. त्यावर खुलासा न करता पंतप्रधान मोदी हे अमेरिका आपला मित्र असल्याचे टाळ कुटतात. पाकिस्तानला भारताविरुद्धच्या युद्धात उघड मदत करणाऱ्या चीनला पंतप्रधान जाऊन आले व चीनने आमच्यासाठी कसे लाल गालिचे अंथरले त्याची वर्णने येथे केली. पण चीनच्या सहकार्याने पाकिस्तान कश्मीरात ‘पहलगाम’प्रमाणे हिंदू रक्ताचे पाट वाहत आहे. आमच्या माय-भगिनींच्या कपाळावरचे ‘कुंकू’ म्हणजे ‘सिंदूर’ पुसत आहे. त्याची वेदना सरकारच्या चेहऱ्यावर दिसत नाही. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना तर निर्लज्जपणाचा कळसच आहे. मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, मात्र पुसलेल्या कुंकवाचा बदला घेऊ म्हणणारे पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे सामने खेळताना दिसत आहेत. पाकिस्तानात ‘घुसून मारू’ असे वचन देणारे पाकिस्तानच्या कोणत्या अंगात घुसले ते त्यांनाच माहीत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने हे भारतीय महिलांच्या कुंकवाचा अपमान आहे. पाकिस्तानने निर्दयपणे मारलेल्या हिंदुजनांच्या बलिदानाचा अपमान आहे. क्रिकेट खेळणे महत्त्वाचे की पाकिस्तानला धडा शिकवणे महत्त्वाचे? पाकिस्तानबरोबरच्या क्रिकेट सामन्यातून ‘जुगार’ खेळला जातो व त्यातून हजारो कोटींची
आर्थिक उलाढाल
होते. या उलाढालीचे सर्व लाभार्थी आता भाजपमध्ये विराजमान आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर मोदी गरजले होते की, ‘‘सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला मिळणार नाही. सिंधूचे पाणी आणि भारतीयांचे रक्त एकत्र वाहणार नाही. नाही, नाही, त्रिवार नाही.’’ मग काय हो मोदी, क्रिकेट आणि भारतीयांचे रक्त एकत्र कसे चालेल? माझ्या धमन्यांतून रक्त वाहत नसून गरम सिंदूर वाहत असल्याचे मोदी पहलगामनंतर म्हणाले होते. मग त्या गरम सिंदूरचे आता थंड आइस्क्रीम झाले काय? याचा जाब भारतीय जनता मागत आहे. पाकिस्तानबरोबर अशा स्थितीत क्रिकेट मॅच खेळणे राष्ट्रविरोधी आहे. कोट्यवधी हिंदूंचा, त्यांच्या माय-भगिनींच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा अपमान करणारे आहे. पाकिस्तानबरोबर खेळलो नाही तर असे काय आकाश कोसळणार आहे? एकवेळ आकाश जरी कोसळले असते तरी त्यावर पाय ठेवून भारताच्या पंतप्रधानांनी गरजायला हवे होते, ‘‘जोपर्यंत कुंकवाचा बदला सफल होत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणताही संबंध नाही.’’ पण सध्याचे राज्यकर्ते शेंदाड शिपुर्डेच निघाले. देश आणि कुंकवाच्या भावना पायदळी तुडवून पाकिस्तानशी क्रिकेट खेळत आहेत. पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना म्हणजे पहलगामनंतरचा आणखी एक भयंकर ‘दहशतवादी’ हल्ला आहे. हा राष्ट्रद्रोहच आहे. जावेद मियांदाद पाकिस्तानी क्रिकेटची वकालत करण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचला तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला तोंडावर सांगितले, ‘‘जोपर्यंत कश्मीरात हिंदूंचे रक्त तुम्ही सांडत आहात तोपर्यंत पाकिस्तानबरोबर क्रिकेट होणार नाही. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही!’’ असे ठणकावून सांगणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कुठे आणि पाकिस्तानशी क्रिकेटची सलगी करणारे आजचे नकली हिंदुत्ववादी कुठे? भारताचा स्वाभिमान आणि कुंकवाच्या प्रतिष्ठेसाठी जनतेला लढावेच लागेल!