
पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने जे काम सुरू केले आहे, त्या कार्याची नोंद घेऊन युनोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या परिषदेने हवामान बदलातील प्रेरणादायी नेतृत्वाचा सन्मान महाराष्ट्राला बहाल केला आहे. मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून यावी असा हा क्षण आहे. अर्थात, या पुरस्काराने महाराष्ट्राची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रदूषणाला आळा घालून पर्यावरणाच्या संवर्धनाचे महाराष्ट्राने हाती घेतलेले शिवधनुष्य यापुढेही आपल्याला आणखी समर्थपणे पेलावे लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या महाराष्ट्राच्या गौरवाचा हाच संदेश आहे.
महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशी आनंदाची बातमी संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान बदल परिषदेतून आली आहे. या परिषदेने हवामान बदलासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी महाराष्ट्राची पाठ तर थोपटलीच, शिवाय हवामान बदलासाठी दिलेल्या योगदानाबद्दल जगभरातील देशांच्या प्रतिनिधींसमोर विशेष पुरस्काराने महाराष्ट्राचा गौरवही केला. हवामानात सातत्याने होणारे बदल आणि त्यामुळे उद्भवणारे परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी स्कॉटलंडमधील ग्लास्गो शहरात 31 ऑक्टोबरपासून जागतिक जलवायू परिषद सुरू आहे. ‘सीओपी-26’ असे नामाभिधान असलेल्या या परिषदेत महाराष्ट्राला ‘प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व’ हा पुरस्कार देण्यात आला. अभिमानाची गोष्ट अशी की, हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे महाराष्ट्र हे हिंदुस्थानातील एकमेव राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील 10 कोटी जनतेच्या वतीने हा सन्मान स्वीकारला. जागतिक पातळीवर आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिष्ठत व्यासपीठावर महाराष्ट्राच्या कार्याचा गौरव व्हावा, ही सामान्य बाब नव्हे. अर्थात हा पुरस्कार महाराष्ट्राच्या पदरात सहजासहजी पडला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखे पर्यावरणप्रेमी, निसर्गपेमी, वन्यजीवपेमी व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभल्यापासून प्रदूषणमुक्तीच्या क्षेत्रात जे झपाटय़ाने काम सुरू आहे, त्या कामाची पोचपावती म्हणजे हा पुरस्कार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून
पर्यावरणाचे संवर्धन
आणि त्यासाठी प्रदूषणमुक्त ऊर्जा व तत्सम घटकांवर जे लक्ष केंद्रित केले, त्या कामाची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली आणि पुरस्काराच्या माध्यमातून महाराष्ट्राला शाबासकी मिळाली, असेच म्हणावे लागेल. स्कॉटलंडमधील परिषदेत ‘इन्स्पायरिंग रिजनल लीडरशिप’ हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा सन्मान महाराष्ट्रातील जनतेला व हिंदुस्थानातील पर्यावरण संवर्धनाच्या ध्येयाला समर्पित केला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी जे मत व्यक्त केले, त्यावरूनही राज्यातील विद्यमान सरकारची पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याबाबतीत असलेली बांधिलकीच दिसून येते. आदित्य ठाकरे त्यावेळी म्हणाले, ‘माय प्लॅनेट’ अर्थात ‘माझी वसुंधरा’ या नावाची चळवळ आम्ही सुरू केली आहे. या चळवळीच्या माध्यमातून निसर्गाच्या पाच पारंपरिक घटकांवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हिंदुस्थानात महाराष्ट्राने पुढाकार घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. उत्कट पर्यावरणप्रेमी असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला उत्तम भवितव्यासाठी हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे.’’ खुद्द आदित्य ठाकरे हेदेखील राज्याचे पर्यावरणमंत्री या नात्याने सातत्याने प्रदूषण निर्मूलनासाठी झटत असतात. महाराष्ट्रात प्रदूषणात भर घालणाऱया डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा, यासाठी आदित्य ठाकरे गेले काही महिने झपाटल्यागत काम करत आहेत. महाराष्ट्राने पर्यावरणपूरक अशा
शाश्वत विकासाच्या दिशेने
वाटचाल करावी यासाठी महाराष्ट्रात ‘ईव्ही’ अर्थात इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. वातावरणातील बदलांच्या अनुषंगाने बदलत्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत ई-मोबिलिटीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने अन्य राज्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. त्यासाठीच शून्य उत्सर्जन आणि पर्यावरणपूरक वाहन निर्मितीवर महाराष्ट्राने वेगाने काम सुरू केले आहे. याच धोरणाचा भाग म्हणून 2027 पर्यंत मुंबईतील बेस्टच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक असतील, असा शब्द आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना दिला आहे. मुंबईत एका वर्षात कचऱयाचे प्रमाण 10 हजार टनांवरून साडेसहा हजार टनांवर आणण्यात पर्यावरण विभागाला यश आले आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जगभरात पर्यावरणाच्या बाबतीत राज्य सरकारांमध्ये सर्वाधिक चांगले काम महाराष्ट्रातच सुरू आहे, असे आदित्य ठाकरे दोन आठवडय़ांपूर्वीच म्हणाले होते. स्कॉटलंडमधील हवामान बदल परिषदेने त्यावर आता मोहोर उठवली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने जे काम सुरू केले आहे, त्या कार्याची नोंद घेऊन युनोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या परिषदेने हवामान बदलातील प्रेरणादायी नेतृत्वाचा सन्मान महाराष्ट्राला बहाल केला आहे. मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून यावी, असा हा क्षण आहे. अर्थात या पुरस्काराने महाराष्ट्राची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रदूषणाला आळा घालून पर्यावरणाच्या संवर्धनाचे महाराष्ट्राने हाती घेतलेले शिवधनुष्य यापुढेही आपल्याला आणखी समर्थपणे पेलावे लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या महाराष्ट्राच्या गौरवाचा हाच संदेश आहे.


























































