आजचा अग्रलेख : ईश्वरचंद्र विद्यासागर बंगालचे शाहू-फुले!

ईश्वरचंद्र हे साहित्य, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातले शिखरपुरुष होते. कोलकाता संस्कृत महाविद्यालयात ते शिकले व त्याच महाविद्यालयाने त्यांना विद्यासागर (Ocean of Learning) ही उपाधी दिली. तीच आजन्म त्यांना चिकटली. त्यांच्या नावाने विद्यापीठे उभी राहिली. त्याच विद्यापीठाच्या आवारातला या महापुरुषाचा पुतळा तोडण्यात आला. नवा पुतळा उभारला जाईल, पण विद्यासागर यांच्या पुतळ्यावर हल्ला करणारे माथेफिरू आहेत. त्यांना स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांचा अर्थ समजलेला नाही. आम्ही ईश्वरचंद्र विद्यासागर यांना झुकून नमस्कार करीत आहोत!

महाराष्ट्रात जे स्थान महात्मा फुले यांना आहे तेच स्थान पश्चिम बंगालात ईश्वरचंद्र विद्यासागर यांना आहे. महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल प्रांतालाही क्रांतिकारक व समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. ईश्वरचंद्र हे सुधारकी परंपरेतील शिखरपुरुष. राजा राममोहन रॉय यांनी सतीची चाल बंद करायला लावली. सामाजिक क्रांती केली. ईश्वरचंद्र यांनीही दुःखी, कष्टी, पीडित, उपेक्षित यांच्यासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांची राहणी साधी होती अशा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड कोलकात्यात दोन दिवसांपूर्वी झाली. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या राजकीय साठमारीत ईश्वरचंद्र यांच्या पुतळ्याची मोडतोड झाली व देशात एकच हलकल्लोळ झाला. विद्यासागर यांच्या पुतळ्याची नासधूस झाल्याबद्दल दिल्ली आणि कोलकात्यात मोर्चे निघाले. ईश्वरचंद्र तर कोणत्याही राजकीय पक्षाचे चार आण्याचे सदस्य नव्हते. दोन वाक्यांत त्यांचे वर्णन करायचे तर ते एक सुधारक संत होते. मानवतेचे महान दैवत होते. ते क्रांतिकारकही नव्हते व स्वातंत्र्यलढय़ात त्यांचे योगदानही नव्हते. महाराष्ट्रात आधी सामाजिक सुधारणा की आधी स्वातंत्र्य असा जो वाद टिळक व आगरकरांत झाला त्याप्रमाणे विद्यासागर हे ‘सामाजिक सुधारणा सर्वात आधी, सामाजिक सुधारणांशिवाय स्वातंत्र्य काय कामाचे?’ ही भूमिका घेऊन उभे राहिले. ईश्वरचंद्र हे स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होतेच, पण पारतंत्र्यापेक्षा त्यांना हिंदू समाजातील

विषमता आणि अन्याय

यांची अधिक चीड आली. महात्मा फुले यांच्याप्रमाणेच त्यांच्याही मनात हेच होते की, या देशाचा शत्रू इंग्रज नाही. अज्ञान, रूढी-परंपरांच्या बेडय़ा, सामाजिक विषमता हेच खरे शत्रू आहेत. 1856 साली विधवा विवाहाचा कायदा संमत करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बालविवाहास त्यांनी विरोध केला. स्वतःच्या मुलींची लग्ने त्यांनी त्या चौदा-पंधरा वर्षांच्या होईपर्यंत केली नाहीत. आपल्या मुलाचे लग्न त्यांनी एका बालविधवेशी लावून दिले होते. हिंदू समाजातील राक्षसी रूढी-परंपरांविरुद्ध बंड करणे त्या काळात सोपे नव्हते. त्या काळी बंगालातील कुलीन वर्गात बहुपत्नीत्वाची चाल होती. जमीनदार, सरंजामदार यांची सामंतशाही म्हणजे भोगवाद होता. त्यामुळे अनेक बायकांशी विवाह करणे हा जणू त्यांचा जन्मसिद्ध हक्कच बनला होता. ईश्वरचंद्र यांनी या भोगवादाविरुद्ध बंड केले. मद्यपानाविरोधात चळवळ केली. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी शाळा उघडल्या. शिक्षणाचा प्रसार केला. महाराष्ट्राप्रमाणेच शिक्षणाचा मक्ता त्या काळी एकाच वर्गाकडे होता. ईश्वरचंद्रांनी गरीबांसाठी व बहुजन समाजासाठी शिक्षण संस्था उघडल्या. स्त्र्ााrजातीच्या उद्धारासाठी त्यांचे योगदान अभूतपूर्व होते. ‘मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱया जिवाचाच विचार करीत असतो. माणुसकीने वागणे हाच मी माझा धर्म मानतो’ असे ते म्हणत. सारे जग त्यांना विद्यासागर म्हणून ओळखत असले तरी प. बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना

‘दयासागर’ म्हणून

अधिक ओळखते. संस्कृत आणि बंगाली भाषेचे ते प्रकांडपंडित होते. बंगाली भाषेतील शिक्षण व्यवस्थेवर आजही त्यांचाच पगडा आहे. प्राथमिक शाळेत आजही विद्यासागर यांनी लिहिलेली पुस्तके व बाराखडी शिकवली जाते. दीडशे वर्षांपासून त्यात बदल झाला नाही. ईश्वरचंद्र यांचा जन्म बंगालच्या मिदनापुरात 26 सप्टेंबर 1820 रोजी झाला. त्यांची 200 वी जयंती सुरू होत असतानाच कोलकात्याच्या कॉलेज रोडवरील त्यांच्या पुतळ्याची नासधूस करण्यात आली. ईश्वरचंद्र विद्यासागर हे 29 जुलै 1891 रोजी स्वर्गवासी झाले. 128 वर्षांनंतर अचानक प. बंगालच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ते बनले. त्यांचा पुतळा ज्यांनी तोडला ते विद्यासागर यांचा सामाजिक विचार कसा संपवणार? ईश्वरचंद्र हे साहित्य, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातले शिखरपुरुष होते. कोलकाता संस्कृत महाविद्यालयात ते शिकले व त्याच महाविद्यालयाने त्यांना विद्यासागर (Ocean of Learning) ही उपाधी दिली. तीच आजन्म त्यांना चिकटली. त्यांच्या नावाने विद्यापीठे उभी राहिली. त्याच विद्यापीठाच्या आवारातला या महापुरुषाचा पुतळा तोडण्यात आला. नवा पुतळा उभारला जाईल, पण विद्यासागर यांच्या पुतळय़ावर हल्ला करणारे माथेफिरू आहेत. त्यांना स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांचा अर्थ समजलेला नाही. आम्ही ईश्वरचंद्र विद्यासागर यांना झुकून नमस्कार करीत आहोत!