
बाळासाहेब खेर, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्या चारित्र्य व निष्पक्षतेच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस नक्की कोठे उभे आहेत? उकिरड्यावर भुंकणारे कुत्रे व गुंडांच्या टोळ्या जमवून ते राज्य करीत आहेत. दुर्योधन माजतील व लोकशाही, संसदीय परंपरांचा खून करतील, अशी स्थिती भाजप व त्यांच्या दिल्लीतील ‘आका’ मंडळीने महाराष्ट्रात निर्माण केली आहे. महाराष्ट्राचा राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वारसा उद्ध्वस्त व्हावा यासाठी हे चालले आहे. महाराष्ट्राबरोबरच मुख्यमंत्री फडणवीस स्वतःचेही अवमूल्यन करून घेत आहेत. मुख्यमंत्री येतील आणि जातील. भाजपमधील हवशे, गवशे महाराष्ट्राचा पायाच उखडायला निघाले आहेत.
उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार माकडांची माणसे झाली, पण काल महाराष्ट्राच्या विधान भवनात जे घडले ते पाहिल्यावर लोकप्रतिनिधींची माकडे झाली असून या माकडांनी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला कलंकित केले आहे. ज्याला आपण कायदेमंडळ म्हणतो, त्या कायदेमंडळाच्या दारात आमदारांनी पोसलेल्या दोन टोळ्या भिडल्या. रस्त्यावर खुनी हाणामारी व्हावी तसे ते एकमेकांवर हल्ला करताना कायदेमंडळाच्या दारात दिसले. महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचे असे विकृतीकरण करणारे हे सर्व टोळभैरव भारतीय जनता पक्षात भरती केले गेले आहेत व त्यांचे नेतृत्व मुख्यमंत्री फडणवीस करीत आहेत. पुन्हा हे सर्व लोक राज्याच्या संस्कृतीवर आणि नैतिकतेवर गप्पा मारतात याचे आश्चर्य वाटते. भाजपचे आमदार पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या टोळ्यांत हे युद्ध भडकले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहाच्या पायरीवर फक्त हत्यारे उपसायचीच बाकी होती. फडणवीस यांनी सामाजिक विघटनवाद्यांना रोखण्यासाठी, अर्बन नक्षलवाद्यांना जेरबंद करण्यासाठी ‘जनसुरक्षा कायदा’ आणला, पण शहरी नक्षलवाद्यांचे नमुने त्यांच्याच पक्षात आहेत व असे अनेक नमुने विधानसभेत आणि विधान परिषदेत आणून फडणवीस स्वतःचेच वस्त्रहरण करून घेत आहेत. भाजपने महाराष्ट्राची राजकीय सूत्रे हाती घेतल्यापासून विधिमंडळाचे कामकाज दर्जाहीन झाले आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या गुंडांनाही उमेदवारी देण्याचा हा परिणाम. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे चिंतन अलीकडे कमी झाले आहे. कोणत्याही विषयाचे अध्ययन करण्याची प्रवृत्ती आमदारांत कमी होत आहे. त्यामुळे सखोल व अभ्यासपूर्ण भाषणे हे पूर्वी असलेले
विधानसभागृहाचे स्वरूप
आता नाहीसे होऊन एकमेकांना शिव्या देणे, अंगावर धावून जाणे, आरडाओरड करून कामकाज होऊ न देणे ही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात बळावली आहे. निकोप लोकशाही परंपरा जतन करण्याच्या दृष्टीने या गोष्टी अत्यंत हानीकारक आहेत. विचारांची प्रक्रिया विधिमंडळात संपली असून चमचे व हाणामारी करणाऱयांचे वर्चस्व सभागृहात आणि बाहेर स्पष्ट दिसत आहे. काल विधान भवनात जे घडले तो त्याचाच परिपाक आहे. संसदीय लोकशाहीत विधानसभा ही राज्यातील लोकशाहीची जपणूक करून तिची पूजा बांधणारे पवित्र मंदिर असते, परंतु अलीकडच्या काळात या मंदिराचे पावित्र्य मलिन करणाऱ्या घटनांची खंत कुणाच्याच उरात बोचत नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेने कै. बाळासाहेब खेर, कै. दादासाहेब मावळंकर, बाळासाहेब भारदे यांसारख्या पूर्वसुरींनी निर्माण केलेल्या थोर परंपरा तर जतन केल्याच पाहिजेत, शिवाय त्यात नवनवीन उज्ज्वल परंपरांची भर टाकून आपली प्रतिमा अधिक तेजस्वी केली पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. भाजपने तर संसदीय कार्यातील पदांवर अशा अनेक व्यक्ती आणून बसवल्या आहेत की, त्यांची जागा पोलीस कोठडी किंवा तुरुंगात हवी. अशा व्यक्ती व त्यांच्या टोळ्या विधान भवनात आल्यावर ‘राडे’ तर होणारच. पडळकर, खोत, लाड, शिरसाट, गायकवाड, गोगावले यांसारखे नमुने विधान भवनाची अब्रू रोज वेशीवर टांगत आहेत व गृहमंत्री असलेले आपले मुख्यमंत्री फडणवीस महाभारतातील धर्मराजाप्रमाणे जुगाराच्या पटावर बसावे तसे विधिमंडळाच्या मुख्य सिंहासनावर बसले आहेत आणि
राजकीय द्यूताचे फासे
फेकीत आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणाऱया शरद पवार व ‘ठाकरे’ कुटुंबावर फडणवीस यांनी पोसलेले लोक ज्या शिवराळ भाषेत बोलतात ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे लोक बोलतात कारण त्यांना फडणवीस वगैरे लोकांचे पाठबळ आहे. त्यांना भीती उरलेली नाही. हेच आमदार झालेले टोळीप्रमुख गुंडांना घेऊन विधान भवनात येतात व हाणामाऱ्या करतात. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभांचे हे असे धिंडवडे मागच्या दहा वर्षांत निघाले. लोकप्रतिनिधींचे चारित्र्य धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आणि त्यांचे व्यवहार सूर्यप्रकाशाइतके लख्ख असले पाहिजेत. ‘Caesar’s wife should be above suspicion’ एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. बाळासाहेब खेर म्हणत असत, ‘‘मला कोणी बावळट म्हटले तरी चालेल, पण माझ्यावर कोणी खोटेपणाचा आरोप केला तर मला अधिक दुःख होईल.’’ बाळासाहेब खेर, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्या चारित्र्य व निष्पक्षतेच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस नक्की कोठे उभे आहेत? उकिरड्यावर भुंकणारे कुत्रे व गुंडांच्या टोळ्या जमवून ते राज्य करीत आहेत. लोकशाहीच्या राखणदारांनीच तिच्या मुळावर घाव घालायला सुरुवात केली तर तिचे रक्षण कोण करणार? दुर्योधन माजतील व लोकशाही, संसदीय परंपरांचा खून करतील, अशी स्थिती भाजप व त्यांच्या दिल्लीतील ‘आका’ मंडळीने महाराष्ट्रात निर्माण केली आहे. महाराष्ट्राचा राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वारसा उद्ध्वस्त व्हावा यासाठी हे चालले आहे. महाराष्ट्राबरोबरच मुख्यमंत्री फडणवीस स्वतःचेही अवमूल्यन करून घेत आहेत. मुख्यमंत्री येतील आणि जातील. भाजपमधील हवशे, गवशे महाराष्ट्राचा पायाच उखडायला निघाले आहेत.