
न्या. गुप्ता यांनी ठिणग्या जाहीरपणे टाकल्या आहेत व विद्यमान राज्य व्यवस्थेला त्या चटके देऊन गेल्या असतील. देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य कायम राहावे यासाठी सार्वजनिक मंचावरून सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तीने बोलावे याला महत्त्व आहे. न्या. दीपक गुप्ता यांनी चमक दाखवली. निदान जे पटत नाही ते धाडसाने बोलण्याचे सामर्थ्य त्यांनी दाखवले.
कोरोनाच्या धुक्यात अनेक गोष्टी घडत आहेत. त्यांची योग्यप्रकारे दखल घेतली जात नाही. याच धुक्यात सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती दीपक गुप्ता निवृत्त झाले. न्यायमूर्ती निवृत्त होणे ही काही महान गोष्ट नाही. इतर सरकारी कर्मचारी, अधिकारी निवृत्त होतात त्याप्रमाणे न्यायमूर्तीसुद्धा निवृत्त होतात, पण न्यायमूर्ती दीपक गुप्ता हे एक वेगळे रसायन होते. सध्या न्याय, कायदा क्षेत्रात जो अंध:कार पसरला आहे, त्या अंधारात पेटत राहिलेला एक दिवा म्हणून गुप्ता यांच्याकडे पाहायला हवे. न्या. गुप्ता हे अलिकडच्या काळात त्यांनी घेतलेल्या स्पष्ट भूमिकांमुळे चर्चेत आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, देशद्रोहाचे सरसकट गुन्हे याबाबत न्या. गुप्ता हे अलिकडे तटस्थपणे बोलत होते. अलिकडच्या काळात असे घडू लागले की, जे विद्यमान सत्ताधाऱ्यांबरोबर नाहीत ते देशद्रोही किंवा जे पंतप्रधान मोदींबरोबर नाहीत ते देशाबरोबर नाहीत, असा एक प्रचार सुरू असतो. न्या. गुप्ता यावर म्हणतात, ”सरकारशी सहमती दर्शविण्यासाठी लोकांवर जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. सरकारशी असहमती दर्शविणे आणि कठोर शब्दात ती मांडणे हा देशद्रोह असू शकत नाही. जोपर्यंत त्यात हिंसेची चिथावणी नसेल.” न्या. गुप्ता यांनी घेतलेल्या या परखड भूमिकेमुळे अनेकांचा श्वास गुदमरला व न्या. गुप्ता यांच्यावरही दबक्या आवाजात टीका होऊ लागली, पण न्या. गुप्ता यांच्या विचारांचे रॉकेट उडत राहिले. गेल्या काही वर्षांत देशद्रोहाचा आरोप कसाही कुणावर झाला आणि तसे गुन्हे दाखल झाले. सरकारविरुद्ध बोलणारे देशविरोधी ठरवून बोलणाऱयांचे स्वातंत्र्य हिरावले जाऊ नये, अशी भूमिका न्या. गुप्ता घेत राहिले. ”देशद्रोहाचे कलम आणि अनुच्छेद 19 हे एकत्रितपणे बघितले पाहिजे. त्यावरून असे दिसेल की, एखादा नवा विचार किंवा मतप्रदर्शन सत्तेतील लोकांसाठी कितीही अप्रिय असले तरी ते मांडू दिले पाहिजे. बहुसंख्याकवाद हा कायदा असू शकत नाही. अल्पसंख्याकांना सुद्धा त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.” न्या. गुप्ता यांनी आणखी एक स्फोट केला तो आजच्या घडीस महत्त्वाचा. ”आणीबाणीच्या काळात एक व्यक्ती म्हणजेच देश अशी मांडणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पूर्णपणे अपयश आले. मला खात्री आहे भविष्यात देशाला एक व्यक्तीशी जोडण्याचा प्रयत्न कुणी करणार नाही. देश एका व्यक्तीपेक्षा खूप मोठा आहे.” न्या. गुप्ता यांचे हे जाहीर मत देशाला प्रकाश दाखविणारे आहे. आणीबाणीच्या कालखंडात ‘इंदिरा इज इंडिया’चा नारा झाला. आता ‘मोदी म्हणजे हिंदुस्थान किंवा जे मोदींबरोबर नाहीत ते हिंदुस्थानबरोबर नाहीत,’ अशी फवारणी काही भक्तांनी सुरू केली. तो सर्व प्रकार श्री. मोदी यांनाही मान्य नसेल. सत्ताधाऱ्यांच्या भजन-किर्तनात सगळेच धुंद होतात व न्याय क्षेत्रही हाती चिपळ्या घेऊन त्याच भगतगिरीत नाचू-गाऊ लागते. परिणामी, सर्वोच्च न्यायालयाचे एक मुख्य न्यायाधीश निवृत्तीनंतर केरळचे राज्यपाल झाले, तर दुसरे एक राज्यसभेचे सरकारनियुक्त सदस्य झाले.
हे अध:पतन आहे
असे वाटणाऱ्यांपैकी दीपक गुप्ता असावेत म्हणूनच त्यांनी पडखड मते व्यक्त करून वादळे ओढवून घेतली. न्या. गुप्ता यांच्या ठिणग्या इथेच संपल्या नाहीत. ते मनाला येईल ते बोलत राहिले, त्यास राष्ट्रप्रेम, अभिव्यक्ती स्वातंत्र्य रक्षणाचा आधार होता. न्या. गुप्ता काय सांगत होते ते पहा :
– संवादाच्या कलेचा स्तर कमी होतो आहे. सकस किंवा निरोगी चर्चेचे प्रमाण कमी झाले आहे. तत्त्व अणि मुद्यांवर चर्चा होण्याऐवजी आरडाओरडा आणि अपशब्द यांचाच वापर होतो आहे. दुर्दैवाने अशा संवादामध्ये समान धागा दिसतो तो म्हणजे तुम्ही माझ्याशी सहमत आहात अन्यथा माझे शत्रू आहात किंवा देशाचे शत्रू आहात. ऍण्टी नॅशनल आहात.
– लोकशाहीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागरिकांना सत्तेचे भय नसावे. सत्तेविरुद्ध मत मांडण्याबद्दल त्यांच्या मनात भीती नसावी. अर्थात हे मत सभ्य आणि अहिंसक पद्धतीने मांडले गेले पाहिजे, असे मत मांडणे हा गुन्हा असू शकत नाही.
– हिंसेशिवाय एखाद्या गोष्टीवर केवळ टीका करणे हा देशद्रोह असू शकत नाही. महात्मा गांधी म्हणाले होते, एखाद्या गोष्टीबद्दल प्रेम हे कायद्याने रेग्युलेट करता येत नाही. जर एखाद्या व्यक्तीला इतर व्यक्तीशी किंवा व्यवस्थेशी आपुलकी नसेल तर त्याला त्याचे आक्षेप अथवा मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहेच. जोपर्यंत तो हिंसेला उत्तेजन देत नाही तोपर्यंत.
– ”न्यायव्यवस्था ही टीकेला अपवाद नाही. न्यायव्यवस्थेने टीकेचे स्वागतच केले पाहिजे. टीकेतूनच प्रगती होत असते. सरकार न्यायव्यवस्था, प्रशासन किंवा सैन्य यांच्यावरील टीकेला ‘सेडिशन’चे लेबल लावले जाऊ शकत नाही. सरकार, न्यायव्यवस्था किंवा प्रशासन यांच्यावर होणाऱया टीकेला दडपण्याचा प्रयत्न केल्यास आपले रूपांतर लोकशाही देशातून पोलीस स्टेशनमध्ये होईल, ते आपल्या देशाच्या संस्थापकांना कधीच अपेक्षित नव्हते.”
न्या. गुप्ता यांनी या ठिणग्या जाहीरपणे टाकल्या आहेत व विद्यमान राज्य व्यवस्थेला त्या चटके देऊन गेल्या असतील. देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य कायम राहावे यासाठी सार्वजनिक मंचावरून सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तीने बोलावे याला महत्त्व आहे. कायदा व न्यायव्यवस्था म्हणजे सत्ताधाऱयांच्या व श्रीमंतांच्या ताटाखालची मांजर आहेत असे वातावरण निर्माण झालेल्या देशात आपण राहात आहोत. न्यायव्यवस्थेस कोंडीत पकडून हवे ते निकाल लावून घ्यायचे अशा तज्ञमंडळींची रेलचेल सध्या राजकारणात वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायमूर्ती आपल्याच व्यवस्थेविरुद्ध बंड करतात. जाहीर पत्रकार परिषद घेऊन खदखद व्यक्त करतात, हे कधीच घडले नव्हते. त्याच व्यवस्थेच्या चिखलातून एक तारा चमकला. न्या. दीपक गुप्ता यांनी ती चमक दाखवली. निदान जे पटत नाही ते धाडसाने बोलण्याचे सामर्थ्य त्यांनी दाखवले. बहुधा त्यांना निवृत्तीनंतर गाडी-घोडय़ाची शासकीय व्यवस्था नकोय असेच दिसते. न्यायमूर्ती गुप्ता यांना शुभेच्छा द्याव्याच लागतील.
























































