सामना अग्रलेख – कोणत्या देवाकडे दाद मागायची?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरनाथ यात्रा, माऊंट मेरीची जत्रा रद्द केली तरी भक्तांची जत्रा इस्पितळात उसळली आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी त्यांना खरे बळ तेथेच मिळत आहे. मंदिरे बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येकासमोर उपजीविकेचे संकट नक्कीच निर्माण झाले आहे. एक अमरनाथ यात्रा लाखोंच्या चुली पेटवते. त्या अमरनाथ यात्रेत बाधा आणणार्‍या पाकड्या अतिरेक्यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दम भरला व मार्ग सुरळीत केला. कोरोनाने अमरनाथ यात्रा व देशभरातील मंदिरे बंद पाडली. कोणत्या देवाकडे दाद मागायची? 

कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील ‘देव’ लॉक डाऊनचे बंदी झाले आहेत. पूर्वी पुराणकाळी देव आणि दानवांची युद्धे होत असत तेव्हा दानवांनी देवांना बंदी करून ठेवल्याच्या कथा पुराणात आहेत. आता कोरोना या दानवाने देवांना बंदी बनवलं आहे. मंदिरेच काय, कोणतीही प्रार्थनास्थळे उघडू नयेत असे सरकारी आदेश आहेत. त्यामुळे बहुतेक सर्व धार्मिक उत्सव बंद आहेत. मुंबईत होणारी माऊंट मेरी…मतमाऊलीची जत्राही रद्द केली, पण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील भाजपच्या शहाण्या पुढार्‍यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे अशी मागणी केली की, महाराष्ट्रातील मंदिरे लगेच उघडा. भारतीय जनता पक्ष रोज  ‘‘हे उघडा आणि ते उघडा’’ अशी मागणी कोणत्या आधारावर करीत आहे हे त्यांनी एकदा स्पष्ट केले तर बरे होईल. जम्मू-कश्मीरात सध्या केंद्राचे म्हणजे राष्ट्रपती शासन सुरू आहे. कोरोना संसर्गामुळे यंदाची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. ‘‘महाराष्ट्रातील देवळे उघडा’’ असे सांगायचे व तिकडे अमरनाथ यात्रा रद्द करायची हे दुटप्पी धोरण आहे. ‘‘आजच्या संकटकाळात समाजाला मानसिक, धार्मिक आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व मंदिरे उघडावीत,’’ असे भाजपचे पुढारी सांगत आहेत. दक्षिणेतील तिरुपती बालाजी मंदिर उघडले. पहिल्या फटक्यात मंदिराचे 34 पुजारी कोरोनाने संक्रमित झाले. त्यातल्या एका मुख्य पुजार्‍याने त्यात आपले प्राण गमावले. याचे भान निदान राजकारण्यांनी तरी ठेवले पाहिजे. ‘‘मंदिरे उघडा’’ असा रोजचा

धोशा लावून

कोणी हिंदुत्ववादी ठरणार नाही व ‘‘मशिदी, चर्च खुली करा’’ अशा मागण्या करून कोणाच्या सेक्युलर टोप्यांवर चार चांद लागणार नाहीत. सध्याचा काळ ‘जगा आणि जगू द्या’ या मंत्राचा धोशा लावण्याचा आहे. आज देशात सर्वात जास्त आवश्यकता आहे ती लोकांना धीर देण्याची, आरोग्यविषयक सुविधा निर्माण करण्याची. मुंबईत पाच हजार बेडचे जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय महापालिका उभे करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. हेसुद्धा एक प्रकारे भव्य मंदिरच नाही काय? आज सर्व इस्पितळे, कोविड केंद्र यांना एक प्रकारे मंदिराचेच स्वरूप प्राप्त झाले आहे. लॉकडाऊनमध्ये धार्मिक स्थळे बंदिवान असली तरी पांढर्‍या कपड्यांतील देवदूत इस्पितळात सेवा बजावत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात आतापर्यंत पाचशेपेक्षा जास्त नवजात बालकांनी कोरोनाचा पराभव केला. या बाळांना जन्म देणार्‍या माता कोरोनाबाधित होत्या. त्यामुळे जन्मलेल्या बाळांना सुरक्षित करणे हे पांढर्‍या कपड्यांतील देवदूतांचे कर्तव्य होते व त्यांनी ते करून दाखविले. देवांकडून तरी दुसरी काय अपेक्षा असते! अमरनाथ यात्रा, माऊंट मेरीची जत्रा रद्द केली तरी भक्तांची जत्रा इस्पितळात उसळली आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी त्यांना खरे बळ तेथेच मिळत आहे. मंदिरे बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येकासमोर उपजीविकेचे संकट नक्कीच निर्माण झाले आहे. देवावर जे
विसंबून आहेत त्यांना

देवच मार्ग

दाखवेल. कर्नाटकात कोरोनाची महामारी भयंकर पसरली आहे व सरकारचे एक मंत्री हतबलतेने सांगतात, ‘‘आता देवच काय ते बघेल!’’ देवच सर्व बघणार असेल तर इतक्या मोडतोडी व उपद्व्याप करून तुम्ही सत्तेवर आलात कशाला? सत्ता ही पवित्र आहे व तो ईश्वरी प्रसाद आहे. कर्नाटकात अनेक मंदिरे व मठ आहेत. त्यांचे पावित्र्य व सामाजिक कार्य मोठे आहे. मागे ‘‘राहुल गांधी यांनी एका मठात जाण्यापूर्वी मांसाहार केला’’ असा भावनिक आरोप कर्नाटकातील भाजपच्या एका मंत्र्याने केलाच होता. हे असले पावटे उडविण्यापेक्षा आरोग्यविषयक यंत्रणा उभी करून कोरोनाग्रस्तांना मदत करा. शेवटी लढाई माणसांनाच लढावी लागते. अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या अस्मितेसाठी भक्तांच्या रक्ताने शरयू लाल झाली. हे धार्मिक संघर्ष जगभर सुरूच असतात. मंदिरे व प्रार्थनास्थळांत पवित्र मूर्ती आहेत, पण त्या मंदिरांवर कोट्यवधींचे जीवन उभे आहे. मंदिरे बंद असल्याने पूजाअर्चा करणार्‍या गुरव समाजाचे उत्पन्न बंद झाले. मंदिरात कीर्तन करणारे, भजन करणारे, इतकेच काय, मंदिराबाहेरच गाईंना चारापाण्याचे पुण्यदान करणारे, चपला सांभाळणारे, नारळ, प्रसाद, फुले विकणारे सगळेच बेरोजगार झाले. या सगळ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. एक अमरनाथ यात्रा लाखोंच्या चुली पेटवते. त्या अमरनाथ यात्रेत बाधा आणणार्‍या पाकड्या अतिरेक्यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दम भरला व मार्ग सुरळीत केला. कोरोनाने अमरनाथ यात्रा व देशभरातील मंदिरे बंद पाडली. कोणत्या देवाकडे दाद मागायची?