सामना अग्रलेख – उघड गुंडाराज!

गुंडांनी फडणवीस, शिंदे व अजित पवारांच्या पक्षांत प्रवेश केला आहे. राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हा गुंडांचा पोशिंदा बनला आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांत गुंड टोळ्यांचा भरणा आहे व या टोळ्या मुंबई-महाराष्ट्रात एकमेकांविरुद्ध लढत आहेत. गृहखाते हात चोळत बसल्यावर दुसरे काय होणार? मंगेश काळोखेंची हत्या होणार, गोगावलेंचा गुंड पुत्र फरार होणार व सातारच्या ‘ड्रग्ज फॅक्टरी’चे रूपांतर मिठाईच्या दुकानात होणार. महाराष्ट्र रक्तपाताने भिजला आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे!

महाराष्ट्रात उघडपणे गुंडाराज सुरू झाले आहे. कायदा, पोलीस यांची भीती कुणालाच राहिलेली नाही व ज्यांच्यावर कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे ते गृहमंत्री फडणवीस आपल्याच मस्तीत मश्गूल आहेत. सामान्य जनतेला रस्त्यावर फिरणे कठीण झाले आहे. कोण कोठून येतील व गोळीबार करतील, तलवारी-कोयते नाचवीत हत्या करतील याचा भरवसा नाही. रायगड जिल्ह्यातील खोपोलीत मंगेश काळोखे या तरुण राजकीय कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या भररस्त्यावर हत्या झाली. काळोखे कोणत्या पक्षाचे वगैरे नंतर पाहू, पण काळोखे यांची हत्या अत्यंत निर्घृण तितकीच अमानुष आहे. खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे मंगेश हे पती. नगरपालिका निवडणूक निकालानंतर घडलेला हा रक्तपात आहे. काळोखे हे शिंदे गटाचे असल्याचे बोलले जाते व काळोखे यांची हत्या राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याचा आरोप मंत्री भरत गोगावले यांनी केला. सत्तेतील दोन पक्षांतले हे गँगवॉर आहे. एकमेकांची निवडून आलेली माणसे मारायची आणि आपले वर्चस्व कायम करायचे अशा प्रकारचा खुनी खेळ सुरू आहे. काळोखे यांची हत्या सकाळी साडेसहा वाजता झाली. म्हणजे महाराष्ट्रात गुंडाराजचा अरुणोदय पहाटेपासून सुरू होतो व रात्रीच्या अंधारापर्यंत बिनधास्त चालतो. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हेच चित्र आहे. खोपोलीतील हत्या राजकीय गँगवॉरच्या भडक्यातून झाली. फडणवीस मंत्रिमंडळातले मंत्री गोगावले यांनी खोपोली हत्याकांडाचा आरोप राष्ट्रवादीवर टाकला, पण हे गोगावले महाशय व त्यांचा परिवार काही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नाही. गेल्या 26 दिवसांपासून गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे फरार झाले आहेत व

पोलीस त्यांच्या मागावर

आहेत. महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी हिंसा केली. काँग्रेस कार्यकर्त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण महाड शहरात तणाव निर्माण केला. हातात शस्त्र घेऊन विकास व त्याची गुंड टोळी शहरात हैदोस घालत होती. पोलिसांनी या प्रकरणात वेळीच कारवाई केली नाही व मंत्री पुत्र विकास पोलिसांना तुरी देऊन फरार झाला. विकास गोगावलेची अंतरिम जामिनाची मागणी मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. हायकोर्टाने अंतरिम किंवा अटकपूर्व जामीन फेटाळल्यावरही मंत्र्याचा मुलगा फरार आहे व फरार मुलाचा मंत्रीपदी असलेला बाप खोपोलीतील हत्याकांडावर मगरीचे अश्रू ढाळतो हे आश्चर्यकारक आहे. मंत्री गोगावले यांनी आपल्या फरार पुत्राचा ठावठिकाणा पोलिसांना द्यावा, मगच खोपोलीतल्या घटनेवर डोळे भिजवावेत. संपूर्ण महाराष्ट्रात अशा राजकीय हत्या, झुंडशाही व गुंडागर्दीने कहर केला आहे. भाजपचे एक आमदार आशीष देशमुख विरोधकांना धमकी देतात, ‘‘जास्त बडबड केलीस तर कापून टाकू. राज्यात फडणवीसांचे सरकार आहे.’’ श्री. फडणवीस यांनी आमदारांची कोयता गँग तयार केली आहे काय? हे फडणवीसांचे सरकार म्हणजे गुंड-मवाल्यांचे अंडरवर्ल्ड आहे काय? एक मंत्री नितेश राणे हे विरोधकांना मारण्याची भाषा करतात व ‘‘पोलीस आपले वाकडे करू शकत नाहीत. कारण आपला बॉस वर्षा बंगल्यावर बसलाय,’’ अशी धमकी पोलिसांना देतात. याला कायद्याचे राज्य कसे म्हणायचे? मंत्री, आमदार, खासदार व त्यांच्या टोळ्या सरळ हत्या व मारण्याच्या धमक्या देतात. पुरोगामी व सहिष्णू महाराष्ट्राला काळिमा फासणारे हे वातावरण आहे. कालपर्यंत जे बिहार, उत्तर प्रदेशात घडत होते ते आता महाराष्ट्रात घडताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस, शिंदे व अजित पवार त्यांच्या पक्षांत खतरनाक

गुंडांची भरती

करून आपापला पक्ष मजबूत करत आहेत. ‘धुरंधर’ चित्रपटातील एक शहर ‘ल्यारी’ ज्याप्रमाणे गुंड टोळ्यांसाठी कुख्यात झाले तसे महाराष्ट्राचे होत आहे व सरकार पक्षातील म्होरके ‘धुरंधर’ चित्रपटातील रहेमान डकैतसारखे वागत आहेत. बीडमध्ये वाल्मीक कराडच्या झुंडशाहीस सर्वच पक्षीय राजाश्रय होता हे उघड झाले. रायगड ही शिवरायांची राजधानी ‘बीड’चाच खुनी पॅटर्न राबवत आहे व सर्वच पक्षांचे ‘आका’ आपापल्या टोळ्या पोसत आहेत. त्यांनी महाराष्ट्र नासवला आहे. प्रत्येक जिल्हा गुंडगिरीचा अड्डा बनला आहे. पुण्यातील गुंड टोळ्यांना निवडणुकीत उतरविण्याचा प्रयोग महाराष्ट्राला बदनाम करणारा आहे. अजित पवार यांचे पुत्र ‘पार्थ’ यांच्या जमीन माफियागिरीचे प्रकरण समोर आले व त्याला वाचविण्याचे महान कार्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. साताऱ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या घरात व दारात ‘मॅन्ड्रेक्स’ ड्रग्जचा कारखाना सापडतो, या ड्रग्ज कारखान्याचे धागेदोरे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भावापर्यंत जातात. उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना शरण जातात व सातारच्या ड्रग्ज फॅक्टरीचे रूपांतर हलवायाच्या दुकानात होते. पोलिसांचा रिपोर्ट डावलून राज्याचे गृहराज्यमंत्री नीलेश घायवळला पासपोर्ट आणि पिस्तुलाचा परवाना देतात. पुण्यात गुंडांच्या सर्व टोळ्यांना उघड राजाश्रय लाभला आहे. गुंडांनी फडणवीस, शिंदे व अजित पवारांच्या पक्षांत प्रवेश केला आहे. राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हा गुंडांचा पोशिंदा बनला आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांत गुंड टोळ्यांचा भरणा आहे व या टोळ्या मुंबई-महाराष्ट्रात एकमेकांविरुद्ध लढत आहेत. गृहखाते हात चोळत बसल्यावर दुसरे काय होणार? मंगेश काळोखेंची हत्या होणार, गोगावलेंचा गुंड पुत्र फरार होणार व सातारच्या ‘ड्रग्ज फॅक्टरी’चे रूपांतर मिठाईच्या दुकानात होणार. महाराष्ट्र रक्तपाताने भिजला आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे!