आजचा अग्रलेख : मंत्रालयातील गर्दी; वाऱ्याची दिशा!

2327

मंत्रालय आणि गर्दी हे समीकरण आपल्याकडे कालसापेक्षतसेच कारणसापेक्षआहे. सध्याच्या मंत्रालयातील गर्दीला विधानसभा निवडणुकीचे निमित्त आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम कधीपासूनच वाजू लागले आहेत. निवडणूक आचारसंहितेचे वारेदेखील घुमू लागले आहेत. माणसांनी फुललेले मंत्रालय आणि हाऊसफुल्ल झालेली मंत्र्यांची दालने याच वाऱ्याची दिशादाखवीत आहेत. आपला देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. पुन्हा येथील लोकशाही ही जिवंतवगैरे असल्याचे बिगुल नेहमीच फुंकले जातात. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रालय माणसांनी फुलून जाणे हे त्या जिवंत लोकशाहीचेच लक्षण मानले पाहिजे.

मंत्रालयात सध्या लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. एरवीदेखील मंत्रालयात लोकांची वर्दळ असतेच, पण आता उसळलेली गर्दी, तिचे निमित्त आणि स्वरूप जरा वेगळे आहे. संभाव्य आचारसंहितेचा धसका हे या गर्दीचे निमित्त आहे. या गर्दीत जी ‘कामवाली’ मंडळी आहेत त्यांचा आपण सामान्य माणसांचीच कामे करण्यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवतो असा दावा असतो. त्यात तथ्यदेखील आहे. त्यामुळे आताही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच आपापली कामे मार्गी लागावीत यासाठी त्यांची धावपळ मंत्रालयाच्या सर्व मजल्यांवर सुरू आहे. मंत्र्यांची दालने माणसांनी ओव्हरफ्लो झालेली दिसत आहेत. त्याला दुसरा पर्याय तरी कुठे आहे? आचारसंहितेचा बडगा बसण्यापूर्वी कामांचा ‘वाडगा’ मार्गी लावणे गरजेचे आहे. तो आपल्या ‘व्यवस्थे’चाच एक भाग आहे. याआधीही प्रत्येक निवडणुकीपूर्वी हे चित्र पाहायला मिळाले आहे. आणखी काही दिवस हेच चित्र दिसले तरी त्यात अनपेक्षित काहीच नाही. शेवटी मंत्रालय म्हणजे राज्याचा संपूर्ण कारभार जेथून चालतो ती जागा. राज्यकारभाराची प्रकृती कशी आहे याची ‘नाडी’परीक्षा

मंत्रालयातील गर्दीने

होते असे म्हणतात. सर्वसाधारणपणे राजकारणी, सामान्य जनता, तक्रारदार आदींची वर्दळ मंत्रालयात नेहमीच असते. पुन्हा इतर देखील मंत्रालयात रोज येत-जात असतात. म्हणूनच मंत्रालय आणि लोकांची वर्दळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि मंत्रालयातील गर्दी हे लोकशाही व्यवस्थेच्या ‘जिवंत’पणाचे लक्षण आहे असे म्हणावे लागेल. अर्थात हे ‘जिवंत नोकरशाही’चे लक्षण मानायचे का, हा तसा प्रश्नच आहे. शेवटी मंत्रालय म्हणजे प्रशासन स्तरावरील सर्वात वरचा ‘मजला’ आहे. ग्रामपंचायत ते मंत्रालय असे अनेक मजले मध्ये आहेत. तरीही मंत्रालयाची पायरी लोक चढतात आणि तेथे ‘गर्दी’ करतात. हा मंत्रालय महिमा म्हणावा का? हिंदुस्थानी माणसाला या सर्व गोष्टींची सवय झाली आहे. ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत माणसांच्या गर्दीचे चित्र सारखेच असते. शेवटी मंत्रालयापर्यंत हे लोंढे येऊन पोहोचतात. फक्त एरवी मंत्रालयातील वर्दळीची ‘बातमी’ होत नाही. मात्र हीच वर्दळ जेव्हा गर्दी बनते तेव्हा तो बातमीचा विषय बनतो. आताही तेच झाले आहे. कधी मंत्रालयातील गर्दीची बातमी होते, तर कधी मंत्रालयात ‘शुकशुकाट’ हा

बातमीचा विषय

होतो. कधी मार्च महिन्यात वर्षअखेर म्हणून मंत्रालयात फायलींची लगबग वाढते. ‘नियतव्यय’ पूर्ण खर्च झाल्याचे दाखवणे, तरतूद केलेली पण पूर्ण खर्च न झालेली रक्कम सरकारी तिजोरीत परत जाऊ न देणे अशा कारणांसाठी प्रत्येक मार्च महिन्यात मंत्र्यांची दालने फुललेली दिसतात. म्हणजे मंत्रालय आणि गर्दी हे समीकरण आपल्याकडे ‘कालसापेक्ष’ तसेच ‘कारणसापेक्ष’ आहे. ही गर्दी कधी आणि कशासाठी झाली यानुसार त्याच्या बातम्यांची लांबी-रुंदी ठरते. सध्याच्या मंत्रालयातील गर्दीला विधानसभा निवडणुकीचे निमित्त आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम कधीपासूनच वाजू लागले आहेत. निवडणूक आचारसंहितेचे वारेदेखील घुमू लागले आहेत. माणसांनी फुललेले मंत्रालय आणि हाऊसफुल्ल झालेली मंत्र्यांची दालने याच ‘वाऱ्याची दिशा’ दाखवीत आहेत. आपला देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. पुन्हा येथील लोकशाही ही ‘जिवंत’ वगैरे असल्याचे बिगुल नेहमीच फुंकले जातात. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रालय माणसांनी फुलून जाणे हे त्या जिवंत लोकशाहीचेच लक्षण मानले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या