आजचा अग्रलेख : मराठवाड्याला सावरा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोटय़वधी रुपये खर्चून केलेला कृत्रिम पावसाचा प्रयोगही मराठवाड्यासाठी ‘हवेतील गोळीबार’च ठरला आहे. विक्रमी पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापुराच्या तडाख्याने हाहाकार उडाला.  मराठवाडा मात्र दुष्काळाशी झुंजत आहे. दुष्काळाच्या होरपळीतून मराठवाड्यात मागच्या दोन महिन्यांत 130 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पावसाळा संपल्यावर तर परिस्थिती आणखी भयावह होईल. त्यातच निवडणुकांचा बिगुल वाजेल आणि आचारसंहितेचा बूच बसेल. त्याआधी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला सावरण्यासाठी काय करता येईल याचा निर्णय व्हायलाच हवा.

दुष्काळाच्या राक्षसाने पुन्हा एकदा मराठवाड्याला विळखा घातला आहे. ऐन पावसाळय़ात गतवर्षी जशी दुष्काळी परिस्थिती ओढवली होती, त्यापेक्षाही भीषण संकट यंदा मराठवाड्यासमोर उभे ठाकले आहे. पावसाळय़ाचा तिसरा महिना संपत आला, पण मराठवाड्यात आतापर्यंत जेमतेम 40 टक्केच पाऊस झाला आहे. जूनमध्ये सुरुवातीला थोडाफार पाऊस झाल्यानंतर बाकी 20 दिवस कोरडेच गेले. काही जिल्ह्यांत तर महिना-दीड महिना पावसाचा थेंबही पडला नाही. जुलैच्या अखेरीस काही जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या, पण संपूर्ण मराठवाडा ओलाचिंब व्हावा अशी संततधार या पावसाळय़ात कोसळलीच नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांत तब्बल दीड महिन्यानंतर पावसाच्या सरी कोसळल्या. पण लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि संभाजीनगर या पाच जिल्ह्यांवर मात्र पावसाने आपला रुसवा कायम ठेवला. एका जिह्यात पाऊस पडतो तर बाजूच्या जिह्यात नाही, एका तालुक्यात पडतो तर बाजूचा तालुका कोरडाच आणि एखाद्या गावात तासभर पाऊस कोसळत असताना दहा किलोमीटरवर असलेल्या शेजारच्या गावात मात्र लख्ख ऊन पडलेले! निसर्गाचा आणि पावसाचा इतका लहरीपणा मराठवाड्याने आजवर कधीही अनुभवला नव्हता. आता तर ऑगस्टही संपत आला. त्यामुळे मराठवाड्याची सगळी भिस्त उरली आहे ती सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसावरच. पहिले तीन महिने तर पावसाने

मराठवाड्याच्या डोळय़ांत पाणी

आणलेच, पण पावसाळय़ाचा अखेरचा महिनाही कोरडा गेला तर मराठवाड्यातील दुष्काळाचे संकट आणखी गडद होण्याचा धोका आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न जरूर केला, पण त्याचाही म्हणावा तसा उपयोग झाला नाही. 19 ऑगस्टपासून कृत्रिम पाऊस पाडणारे विमान आकाशात उडत आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पन्नासहून अधिक गावांवर घिरटय़ा घालत या विमानाने ढगांवर रसायनांची फवारणी केली. मात्र, एक-दोन ठिकाणी झालेली रिमझिम सोडली तर कुठेही मोठा पाऊस पडला नाहीच. त्यामुळे कोटय़वधी रुपये खर्चून केलेला कृत्रिम पावसाचा प्रयोगही मराठवाड्यासाठी ‘हवेतील गोळीबार’च ठरला आहे. देशभरात धो धो पाऊस पडत असताना, अनेक राज्यांतून जलप्रलयाच्या बातम्या धडकत असताना मराठवाडा मात्र पावसाच्या बाबतीत सातत्याने कमनशिबी ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन-तीन जिल्ह्यांना महापुराने जलसमाधी मिळाली. विक्रमी पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापुराच्या तडाख्याने हाहाकार उडाला. मराठवाडा मात्र दुष्काळाशी झुंजत आहे. कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून मोठा ओघ सुरू झाला तेव्हा या मदत यज्ञात आपलाही खारीचा वाटा असावा

या कर्तव्यभावनेतून

दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या जिल्ह्यांतून आणि गावागावांतून पूरग्रस्त

जनतेसाठी मदत पाठविली गेली. स्वतः संकटात असतानाही मराठवाडी जनतेने पूरग्रस्तांना मदत पाठवून अनोख्या बंधुभावाचे दर्शनच घडवले. तोच मराठवाडा आता दुष्काळाच्या मोठय़ा तडाख्यात सापडला आहे. नाशिकच्या पुरामुळे जायकवाडी धरण भरले. त्यामुळे गोदावरीच्या कोरड्याठाक पडलेल्या नदीपात्रात पाऊस नसतानाही पाणी आले, हे खरे असले तरी मराठवाड्यातील अन्य प्रकल्पांमध्ये मात्र अवघा 10 टक्के पाणीसाठा आहे. 24 लाख लोकांना तेराशेहून अधिक टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तर परिस्थिती अधिकच बिकट आहे. उन्हाळय़ानंतर बंद करण्यात आलेल्या गुरांच्या छावण्या चाऱ्याअभावी पावसाळय़ात पुन्हा सुरू कराव्या लागल्या यापेक्षा वाईट स्थिती आणखी काय असू शकते? मराठवाड्यावर येऊ घातलेले दुष्काळाचे संकट भीषण आहे. दुष्काळाच्या होरपळीतून मराठवाड्यात मागच्या दोन महिन्यांत 130 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पावसाळा संपल्यावर तर परिस्थिती आणखी भयावह होईल. त्यातच निवडणुकांचा बिगुल वाजेल आणि आचारसंहितेचा बूच बसेल. त्याआधी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला सावरण्यासाठी काय करता येईल, याचा निर्णय व्हायलाच हवा.