सामना अग्रलेख – नांदेडचा रक्तपात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेला गोदावरीत जलसमाधीच मिळाली आहे. तीन दिवसांत झालेल्या पाच हत्यांनी नांदेड शहराचा थरकाप उडाला आहे. पोलिसांचा धाक कमी झाला व गुन्हेगारांचे वर्चस्व वाढल्यामुळेच नांदेडमध्ये टोळीयुद्धाचा हा भडका उडाला आणि भयंकर रक्तपात झाला. नांदेडसारखे शहर ‘मर्डर हब’ बनले असताना गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री व पोलीस दल काय करीत आहेत? महाराष्ट्राचे मंत्रालयच जिथे भोंदूबाबा व त्याच्या गुन्हेगार टोळीने पोखरून टाकले आहे, तिथे पोलीस दलाकडून तरी काय अपेक्षा ठेवावी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवडणूक पर्यटन सुरू आहे. आसाम, केरळ, तामीळनाडू, प. बंगाल वगैरे राज्यांत ते सध्या प्रचार कार्यात गुंतले आहेत. त्यांच्या मागे स्वतःच्या राज्यात मात्र रोज खूनखराबा, बुवाबाजी, दरोडे यांनी हाहाकार उडवला आहे. महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था अशी वाऱ्यावर सोडून दुसऱ्या राज्यांत पर्यटन करणारे मुख्यमंत्री फडणवीस यांचे काय करावे, असा प्रश्न जनतेला पडला आहे. मुंबईत एकेकाळी ‘शिकागो’ पद्धतीचे गँगवॉर चालले. पुणे, नागपुरातही देशी कट्टे, तलवारी-कोयते, चॉपर्स यांचा खणखणाट सुरूच असतो, पण सध्या नांदेडमध्ये ज्या पद्धतीचे हत्याकांड भररस्त्यावर उघडपणे सुरू आहे तो सर्वच प्रकार चिंताजनक आहे. नांदेडमध्ये कायद्याचे राज्य लयास गेल्याचे प्रात्यक्षिक रोज घडवले जात आहे. नांदेडकरांचा दिवस उजाडतो तो खून, हत्येच्या बातमीने. गेल्या 70 तासांमध्ये नांदेड शहरात एक-दोन नव्हे, तब्बल पाच खून पडले! सलग तीन दिवस झालेल्या हत्यासत्रांमुळे नांदेडकरांची झोप उडाली आहे आणि पोलीस दल मात्र झोपेत आहे. लागोपाठ होणाऱ्या खुनांचे स्वरूपही क्रूर व थरकाप उडवणारे आहे. पोलीस दल अस्तित्वात आहे की नाही, असे वाटावे इतके गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. शुक्रवारी रात्री खुनाची पहिली घटना घडली. ई-स्क्वेअर थिएटरमध्ये ‘धुरंधर-2’ चित्रपट पाहून घरी निघालेल्या अरजितसिंग चव्हाण या 25 वर्षीय तरुणावर साईलीला गँगच्या टोळीने भीषण हल्ला चढवला. थिएटरबाहेर पडल्याबरोबर दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी अरजितवर खंजीर व तलवारीने सपासप वार केले. अरिजित व त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांनी मारेकऱ्यांवर प्रतिहल्ला चढवला. यात सय्यद आवेज व मोहंमद आरबाज हे दोघे जखमी झाले, तर अरिजित हा जागेवरच ठार झाला. दोन्ही मारेकरी साईलीला टोळीचे सदस्य असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी जखमी झालेल्या दोन्ही मारेकऱ्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले. अरिजितच्या खुनाचा

बदला घेण्यासाठी

त्याचा भाऊ प्रदीप व वडील गजानन चव्हाण हे दोघेही रुग्णालयात पोहोचले. रुग्णवाहिकेतून या जखमींना बाहेर काढताच अरिजितच्या भाऊ व वडिलांनी गंभीररीत्या जखमी असलेल्या आवेज व आरबाज या दोघांवर तलवारीने असंख्य वार केले. यात हे दोघेही उपचारांपूर्वीच मरण पावले. पहिली हत्या कायम वर्दळ असलेल्या कॅनॉल रोडवरील डी-मार्टच्या शेजारी आणि नंतरच्या दोन हत्या पोलिसांदेखत रुग्णालयात झाल्या. राज्याचे पोलीस दल किती हतबल व हताश आहे आणि कायदा-सुव्यवस्थेचा कसा बोऱ्या वाजला आहे याचा यापेक्षा आणखी मोठा पुरावा कोणता हवा? साईलीला व सदा गँग यांच्यातील वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्धाचा हा भडका उडाला. शुक्रवारी रात्री नांदेडच्या रस्त्यावर पडलेला रक्ताचा सडा पोलीस धुऊन काढत नाही, तोच शहरातील मुरमुरा गल्लीत रणजितसिंग तबेलेवाले या तरुणाची हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली. या चार हत्यांनी नांदेडचे नागरिक सुन्न झाले असतानाच सोमवारी पहाटे साडेपाच वाजता आणखी एक हत्या झाली. अनिकेत ऊर्फ सोनू कल्याणकर हा तरुण आपल्या कुत्र्याला सोबत घेऊन मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला असतानाच अचानक एक कार त्याच्या जवळ थांबली. त्यातून बाहेर पडलेल्या सहा-सात जणांच्या टोळक्याने तीक्ष्ण हत्यारांनी सोनूवर असंख्य वार केले. शरीराची चाळणी होईपर्यंत मारेकरी वार करत राहिले. जुन्या वादातून कल्याणकर याच्यावर यापूर्वीही गोळीबार झाला होता. मात्र त्या वेळी तो बचावला होता. कल्याणकर हा पूर्वी भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी होता, तर अलीकडेच त्याने शिंदे गटात प्रवेश केला होता. कल्याणकर हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत. यातील एक मारेकरी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली. लागोपाठ झालेल्या या पाच हत्याकांडांनी नांदेड शहर नव्हे, तर संपूर्ण

मराठवाडा हादरला

आहे. तीन वर्षांपूर्वी पंजाबातील दहशतवादी हरविंदरसिंग रिंदा याच्या टोळीने नांदेडमधील प्रख्यात उद्योजक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. तेव्हापासून नांदेडमध्ये रिंदा याच्या नावाने व्यावसायिक, उद्योजक, डॉक्टर यांना धमक्या देऊन खंडण्या उकळण्याचे सत्रच सुरू झाले होते. गेल्या वर्षभरात नांदेडमध्ये तब्बल 16 जणांच्या हत्या झाल्या. यातील काही हत्या वैयक्तिक वादातून, तर काही टोळीयुद्धातून झाल्या आहेत. नांदेडमध्ये सक्रिय असलेल्या साईलीला व सदा गँगच्या टोळीला पोलिसांनी ‘मकोका’ लावला आहे व त्यापैकी काहींना हद्दपारही केले आहे. असे असतानाही ‘मकोका’चे आरोपी पोलिसांच्या नाकावर टिच्चून नांदेडमध्ये येतात व खुलेआम रक्ताचा सडा पाडतात याला पोलिसांचे अपयश नाही, तर काय म्हणायचे? तेलंगणाच्या सीमेवरील नांदेड जिल्हा म्हणजे आंतरराज्यीय गुन्हेगारांचा मोठाच अड्डा बनला आहे. सट्टेबाजी, ड्रग्ज व इतर अवैध धंदे यामुळे जिल्ह्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. अलीकडेच नांदेड जिल्ह्यातील एका सट्टेबाजाला तेलंगणा पोलिसांनी नांदेडमध्ये येऊन अटक केली. अजूनही काही राजकीय पाठबळ असलेले सट्टेबाज तेलंगणा पोलिसांच्या रडारवर आहेत. इतर राज्यांचे पोलीस नांदेडमध्ये येऊन कारवाई करत असताना नांदेडचे पोलीस दल मात्र डोळ्यांवर कातडे पांघरून बसले आहे. नांदेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेला गोदावरीत जलसमाधीच मिळाली आहे. तीन दिवसांत झालेल्या पाच हत्यांनी नांदेड शहराचा थरकाप उडाला आहे. पोलिसांचा धाक कमी झाला व गुन्हेगारांचे वर्चस्व वाढल्यामुळेच नांदेडमध्ये टोळीयुद्धाचा हा भडका उडाला आणि भयंकर रक्तपात झाला. नांदेडसारखे शहर ‘मर्डर हब’ बनले असताना गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री व पोलीस दल काय करीत आहेत? महाराष्ट्राचे मंत्रालयच जिथे भोंदूबाबा व त्याच्या गुन्हेगार टोळीने पोखरून टाकले आहे, तिथे पोलीस दलाकडून तरी काय अपेक्षा ठेवावी?