आजचा अग्रलेख : राजकीय ‘पायधुणी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दलित सेवा, समाजसेवा, धर्मसेवेची ‘झटापट’ व स्पर्धाच चालली आहे. आता पंतप्रधानांनी गंगाकिनारी सफाई कामगारांचे पाय धुतले. याबद्दल अभिनंदन, पण सफाई कामगारांचे प्रश्न ‘पाया’चे नसून ‘पोटा’चे आहेत. ‘डिजिटल इंडिया’त ही ‘पायधुणी’ आली कोठून? ज्यांचे पाय धुतले ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत, देशातील जातीयवादी उन्माद गंगार्पण व्हावा हे ‘पायधुणी’तून झाले तरी पंतप्रधानांची करसेवा सत्कारणी लागेल.

निवडणुकांची चाहूल लागली आहे. असेही म्हणता येईल की, दरवाजावर टकटक करून निवडणुकांचे वारे आत घुसले आहेत. एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता जमा झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार जमा झाले हे चांगले झाले. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा लाखांपैकी किमान दोन लाखांचा पहिला हप्ता जमा होईल अशी आशा पुन्हा जिवंत झाली आहे. बांधकाम होत असलेल्या घरांसाठी ‘जीएसटी’मध्येही पाच-सात टक्के कपात केली आहे, पण हे सर्व लाभ एप्रिलनंतर मिळतील. त्यामुळे दोन महिने सर्व व्यवहार ठप्प राहतील. हे सर्व आधी करता आले असते, पण तेव्हा करून फायदा नव्हता. ‘जीएसटी’ वगैरे माध्यमांतून दोनेक वर्षे जमा केले व आता वाटप सुरू केले असेच फार तर म्हणावे लागेल. जनतेचा पैसा जनतेच्याच खिशात जात आहे. हे सर्व निवडणुकीवर डोळा ठेवून चालले असल्याचा आरोप झाला आहे. आरोपांचे काय घेऊन बसलात? काही केले नाही तरी आरोप तर होतच असतात. निवडणूकपूर्व अर्थसंकल्प व घोषणा या राजकीय फायद्याचा विचार करूनच केल्या जातात व सत्तेवर असलेला प्रत्येक राजकीय पक्ष तेच करीत असतो. याचदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जाऊन गंगास्नान केले, म्हणजे ‘डुबकी’ मारली. पंतप्रधानांनी गंगेत डुबकी मारली व नंतर सफाई कामगारांचे पाय धुऊन ‘करसेवा’ केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. पंतप्रधान सफाई कामगारांचे पाय धूत आहेत, पंतप्रधानांनी भगवी वस्त्रे परिधान करून कपाळावर चंदन, भस्म वगैरे लावल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. हे सर्व नेहमीच

ठरवून केले जाते

व त्याचे राजकीय रंग-तरंग उमटत असतात. 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधानांनी केसरी पगडी परिधान करून हिंदुत्ववादी मतदारांना संदेश देण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तीन राज्यांत भाजपचा पराभव झाला व ही सर्व राज्ये परंपरेने हिंदुत्ववादी होती. पंतप्रधान मोदी यांनी प्रयागराजला जाऊन कुंभस्नान करणे किंवा दलितांचे पाय धुणे (चरणतीर्थ) यात गैर काय? त्याचा कुणी राजकीय संबंध लावू नये. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, मायावती यांच्यासारख्या वंचितांच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या करसेवेवर अद्यापि भाष्य केले नाही. कारण त्यांची विवंचना वेगळी आहे. काहींना त्यात ब्राह्मणवाद दिसला आहे. श्री. आठवले यांना लोकसभेची एकच जागा हवी आहे. त्या विवंचनेत ते आहेत व त्यासाठी कुणाचे पाय धरावेत किंवा धुवावेत या चिंतेत ते आहेत. प्रकाश आंबेडकरांना समाजापेक्षा ओवेसींची चिंता जास्त. ज्या पद्धतीने त्यांनी हैदराबादी ओवेसींचे ‘पायधुणी’ प्रकरण सुरू केले आहे, ते पाहून स्वर्गस्थ डॉ. बाबासाहेबही अस्वस्थ झाले असतील आणि बहन मायावतींचे काय बोलावे? त्या आज जरी समाजवादी पार्टीच्या सोबतीस असल्या तरी लोकसभा निकालानंतर जे बहनजींचे पाय धुतील त्यांच्या बाजूने त्या जातील. राजकारणातील ही ‘पायधुणी’ सुरूच असते. आज प्रियांका किंवा राहुल गांधी तरी काय करीत आहेत? चिरंजीव राहुल तर अचानक सौम्य हिंदुत्ववादी बनले व काल तर सोवळे नेसून तिरुपती बालाजीच्या मंदिरात गेले. सोवळ्यात चालताना ते अडखळत होते, गांगरत होते, पण हे महाशय अयोध्येत राममंदिर व्हावे यावर बोलत नाहीत. विरोधी महाआघाडीतील कॉम्रेड सीताराम येचुरी, शरद पवार, केजरीवाल वगैरे तथाकथित ‘सेक्युलर’ मंडळींनीदेखील गंगेत ‘डुबकी’ मारायला काहीच हरकत नाही. बरं, त्यामुळे तुमच्या त्या

‘स्युडो सेक्युलॅरिझम’ला

कुठलाही धक्का पोहोचणार नाही; उलट तुम्हीदेखील ‘गंगास्नान’ केले म्हणून तुमचे कौतुकच होईल. तेव्हा एकंदरीतच सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दलित सेवा, समाजसेवा, धर्मसेवेची ‘झटापट’ व स्पर्धाच चालली आहे. महाराष्ट्रात बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन यांनी आयुष्यभर कुष्ठरोग्यांची सेवा केली. महात्मा गांधी, संत गाडगे महाराज यांनी दीनदुबळे, दलितांची सेवा आजन्म केली. महाराष्ट्रात दलितांच्या पंगतीत सवर्ण बसले व डॉ. आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात सुरबानाना टिपणीस हे बिगर दलित शिलेदार होते. समाजसुधारक ‘समतानंद’ अनंत हरी गद्रे यांनीही 1940च्या दशकात कोकणामध्ये ‘समतेसाठी सत्यनारायण’ ही संकल्पना हिरीरीने राबवली होती. झुणका-भाकर सहभोजन आणि स्पृश्यास्पृश्य सत्यनारायण अशा दोन माध्यमांतून गद्रे यांनी अस्पृश्य निवारणाचे कार्य केले. मुख्य म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेसाठी यजमान म्हणून गद्रे अस्पृश्य समाजातील पती-पत्नीला बसवीत आणि या जोडप्याला लक्ष्मीनारायण मानून त्यांच्या पायाचे तीर्थ ते प्राशन करीत. अस्पृश्याच्या पायाचे तीर्थ उच्चवर्णीयाने प्राशन केले तरच ती खरी समता ठरेल अशी गद्रे यांची धारणा होती आणि त्यांनी ती तेवढ्याच प्रामाणिकपणे अमलात आणली. आता पंतप्रधानांनी गंगाकिनारी सफाई कामगारांचे पाय धुतले. याबद्दल अभिनंदन, पण सफाई कामगारांचे प्रश्न ‘पाया’चे नसून ‘पोटा’चे आहेत. ‘डिजिटल इंडिया’त ही ‘पायधुणी’ आली कोठून? ज्यांचे पाय धुतले ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत, देशातील जातीयवादी उन्माद गंगार्पण व्हावा हे पायधुणी’तून झाले तरी पंतप्रधानांची करसेवा सत्कारणी लागेल.