सामना अग्रलेख – पत्रकारितेतील ‘टॉवर’

‘पत्रकाराचे हात स्वच्छ असले पाहिजेत. तर आणि तरच तो निर्भीड पत्रकारिता करू शकतो. मी जे मनात आहे तेच व्यक्त करणारा अग्रलेख लिहू शकतो. माझा अग्रलेख घाबरत नाही, अग्रलेखाला घाबरतात!’ असे निळूभाऊ नेहमी सांगत. तळागाळातील जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा एक लढवय्या संपादक हीच त्यांची शेवटपर्यंत महत्त्वाची ओळख राहिली. निळूभाऊ उंचीने छोटे होते, पण पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य टोलेजंग होते. पत्रकारितेतील ते ‘टॉवर’च होते. 

‘अग्रलेखांचा बादशहा’ म्हणून लोकप्रिय ठरलेले नीळकंठ खाडिलकर हे जग सोडून गेले आहेत. निळूभाऊ म्हणून ते महाराष्ट्रातील जनसामान्यांत परिचित होते. ‘नवाकाळ’ दैनिकाचा इतिहास नव्या पिढीस माहीत नाही, पण स्वातंत्र्यलढय़ात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ‘नवाकाळ’ लढत राहिला. निळूभाऊ खाडिलकर यांच्यामुळे ‘नवाकाळ’ लोकप्रिय ठरला. खाडिलकरांचे खुमासदार अग्रलेख चर्चेचा विषय ठरत असत. गिरणी कामगारांचे लढे असोत नाही तर कष्टकऱ्यांचे लढे, खाडिलकरांच्या अग्रलेखाचा प्रभाव बहुजन समाजावर मोठय़ा प्रमाणात पडत असे. त्यांचे अग्रलेख जेवढे खुमासदार तेवढेच टोकदार व मार्मिक असत. सोप्या भाषेचा वापर, विषयाची तर्कशुद्ध मांडणी आणि संदर्भासह लेखन हे त्यांच्या अग्रलेखांचे वैशिष्टय़ होते. निळूभाऊंच्या अग्रलेखांचे एकूण पाचपेक्षा अधिक खंड प्रकाशित झाले आहेत. अग्रलेख म्हणजे काय हे मोजक्या शब्दांत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फक्त निळूभाऊंनीच सांगितले. खाडिलकर हे वाचस्पती होते. एखाद्या व्यक्तीस ते चपखल उपमा देत. ‘तेल लावलेला पैलवान’ ही उपाधी निळूभाऊंनीच शरद पवारांना दिली व ती आयुष्यभर पवारांना चिकटून राहिली. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या

सामान्य मनाचे ‘लाऊडस्पीकर’

आहेत असे ते म्हणत. त्यांची लेखणी आणि वाणी धारदार होती. संपादक असले तरी ते स्वतः वार्तांकन करीत व ते जसेच्या तसे हशा व टाळय़ांसह प्रकट करीत. जणूकाही वाचक प्रत्यक्ष जाहीर सभेलाच बसला आहे. ते मुलाखती घेत असत. मात्र तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे निळूभाऊ मुलाखत घेताना कागदावर उतरवून घेत नसत. सिगारेटच्या पाकिटावर आतल्या पांढऱया बाजूवर ते मुलाखतीचे व भाषणाचे मुद्दे लिहून घेत. पण दुसऱया दिवशी सगळे वार्तांकन व मुलाखत वाजतगाजत ‘नवाकाळ’मध्ये प्रसिद्ध होत असे. ते उत्तम मुलाखतकार होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या निळूभाऊंनी घेतलेल्या मुलाखती प्रचंड गाजल्या. आपण मालक, संपादक असल्याचा अभिमान त्यांना होता. ‘नवाकाळ’ व ‘सामना’ ही दोनच दैनिके भांडवलशाही आणि कंपूशाहीला पुरून उरली. त्यासाठी त्यांचा संघर्ष रोमांचक होता. पत्रकारिता ही निळूभाऊंसाठी एका क्रतासारखी होती. समाजातील शोषित, पीडित आणि गरीबांच्या, कामगार-कष्टकऱयांच्या भल्यासाठीच निळूभाऊंची लेखणी कायम तळपली. त्यांचे धोरण तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी लढण्याचेच राहिले. निळूभाऊंनी ‘नवाकाळ’ हाती घेतला तेव्हा त्याचा खप जेमतेम 600 होता. ‘नवाकाळ’च्या खपावरून अनेक

अपमान व हेटाळणीचे प्रसंग

त्यांच्या जीवनात आले. त्यावर मात करून निळूभाऊंनी ‘नवाकाळ’च्या खपाचा विक्रम घडवून आणला. ‘पत्रकाराचे हात स्वच्छ असले पाहिजेत. तर आणि तरच तो निर्भीड पत्रकारिता करू शकतो. मी जे मनात आहे तेच व्यक्त करणारा अग्रलेख लिहू शकतो. माझा अग्रलेख घाबरत नाही, अग्रलेखाला घाबरतात!’ असे निळूभाऊ नेहमी सांगत. निळूभाऊ प्रामुख्याने ‘नवाकाळ’च्या अग्रलेखांसाठी परिचित असले तरी त्यांची एकूण 46 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘टॉवर्स’, ‘संत तुकाराम’, ‘यशस्वी कसे व्हाल?’, ‘महात्मा गांधी’, ‘राजे शिवाजी’ आदी पुस्तकांचे तसेच ‘द्रौपदी’ या नाटकाचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या ‘हिंदुत्व’ या पुस्तकाचीही बरीच चर्चा झाली. राज्य सरकारचा पत्रकारितेचा पहिला ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव’ पुरस्कार त्यांनाच 2008 मध्ये देण्यात आला होता. ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही त्यांना केंद्र सरकारतर्फे सन्मानित करण्यात आले होते. अर्थात, तळागाळातील जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा एक लढवय्या संपादक हीच त्यांची शेवटपर्यंत महत्त्वाची ओळख राहिली. निळूभाऊ उंचीने छोटे होते, पण पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य टोलेजंग होते. पत्रकारितेतील ते ‘टॉवर’च होते. त्यांना आमची विनम्र श्रद्धांजली!

आपली प्रतिक्रिया द्या