सामना अग्रलेख – अवकाळी पावसाचा तडाखा

1414

आज मतमोजणी होऊन नवे सरकार स्थानापन्न होऊन त्या विजयाचा जल्लोष सर्वत्र केला जाईल. तो व्हायलाच हवा, त्याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र या धामधुमीत अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या बळीराजाकडे दुर्लक्ष होणार नाही, वेळेत नुकसानीचे पंचनामे होऊन योग्य मदत त्याला मिळेल याची काळजी सरकार आणि प्रशासनाला घ्यावी लागेल. खरीप आणि रब्बी पिकाचे नियोजन आणि वेळापत्रक, ‘क्रॉप पॅटर्नयांचीही फेरमांडणी करण्याचा धडा यंदाच्या पावसाने दिला आहे. तो लक्षात घ्यायला हवा 

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू, मान्सून परतला, अशा बातम्यांची शाई वाळते ना वाळते तोच राज्यभरात पावसाने पुन्हा तडाखे द्यायला सुरुवात केली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात सर्वदूर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. पुढील तीन दिवसदेखील राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आता जो पाऊस कोसळतो आहे तो मान्सूनोत्तर असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे मान्सूनपूर्व आणि मान्सून याबरोबरच मान्सूनोत्तर अशा आणखी एका पावसाची भर यंदा पडली आहे. या वेळचे पावसाचे चक्र हे असे उलटसुलट फिरत आहे. येताना तो उशिरा आला. नंतर बेभरवशासारखा कोसळला. संपूर्ण महिन्याची सरासरी दोन-तीन दिवसांत पूर्ण करण्याचा विक्रम त्याने केला. कोल्हापूर, सातारा, सांगली या पट्ट्यात तर महाप्रलय झाला. नाशिक जिह्यात तो एवढा कोसळला की, तेथील गोदावरीच्या पाण्याने मराठवाड्यातील जायकवाडी धरण 100 टक्के भरले. म्हणजे मराठवाडा कोरडा, पण जायकवाडीतून मात्र पाण्याचा विसर्ग असे विरोधी चित्र या पावसाळ्यात पाहायला मिळाले. सरासरीपेक्षा

दहा टक्के कमी

पावसाचा आधीचा अंदाज खोटा ठरवत या वर्षी मान्सून दहा-पंधरा टक्के जास्त कोसळला. एरवी मुंबईशी असलेले नाते या वेळी मुसळधार पावसाने पुण्याशीही जोडले. ढगफुटीसारखा प्रसंगही पुणेकरांवर ओढवला. ‘कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रावर नाही तर पुण्यावर तयार झाला आहे’ अशा टिप्पण्या त्यामुळेच सोशल मीडियावर फिरल्या. अर्थात आता आलेला पाऊस खरीप पिकांसाठी अवकृपा ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. कारण ही वेळ खरीप पिकांच्या काढणीची, वाळवणीची असते. मात्र आता कोसळणार्‍या पावसाने कोकणातील भातापासून विदर्भातील धान, सोयाबीनपर्यंत, उत्तर महाराष्ट्रातील कांदा, द्राक्ष, ज्वारीपासून प. महाराष्ट्रातील ऊस आणि इतर पिकांपर्यंत सगळ्यांनाच दणका दिला आहे. याशिवाय मका, बाजरी, भुईमूग, इतर कडधान्ये धोक्यात आली आहेत. भाताची काढणी रेंगाळली आहे, तर बर्‍याच ठिकाणी भाताचे पीक आडवेच झाले आहे. कापूसदेखील धोक्यात आला आहे. द्राक्षबागेतील मण्यांना तडे आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सतत बदलणारे हवामान, ऊन-पावसाचा खेळ आणि परतीच्या पावसापाठोपाठ आताच्या मान्सूनोत्तर पावसाने दिलेला तडाखा यामुळे नाशिकसह प. महाराष्ट्रातील हजारो द्राक्ष उत्पादकांना कोट्यवधींची झळ बसण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची काढणी सुरू आहे, तर काही ठिकाणी शेतकर्‍यांनी हे

पीक कापून

ठेवले आहे. मात्र अवकाळी पावसाने सगळे पीक भिजले आहे. कांदा आणि कापूस उत्पादकांसमोरही असेच संकट उभे ठाकले आहे. राज्यात पाऊस थांबायला तयार नाही. त्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात आलेले पाणीही थांबताना दिसत नाही. एरवीही शेतकरी अस्मानी, सुल्तानीच्या तडाख्यात सापडतच असतो. या वर्षी मराठवाड्याचा अपवाद वगळता मान्सूनने भरभरून कृपा केल्याने शेतकर्‍याच्या पदरातही भरभरून दान पडेल अशी अपेक्षा होती. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजाच्या आनंदाला तशी दृष्टच लागली. त्यातूनही जे पीक हाताशी आले तेदेखील आता परतीच्या आणि अवकाळी पावसाने हातातून जाण्याचे संकट उद्भवले आहे. राज्याचे प्रशासन आणि राजकीय मंडळी गेले 15 दिवस निवडणूक उत्सवात अडकली होती. आज मतमोजणी होऊन नवे सरकार स्थानापन्न होऊन त्या विजयाचा जल्लोष सर्वत्र केला जाईल. तो व्हायलाच हवा, त्याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र या धामधुमीत अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या बळीराजाकडे दुर्लक्ष होणार नाही, वेळेत नुकसानीचे पंचनामे होऊन योग्य मदत त्याला मिळेल याची काळजी सरकार आणि प्रशासनाला घ्यावी लागेल. खरीप आणि रब्बी पिकाचे नियोजन आणि वेळापत्रक, ‘क्रॉप पॅटर्न’ यांचीही फेरमांडणी करण्याचा धडा यंदाच्या पावसाने दिला आहे. तो सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवा.

आपली प्रतिक्रिया द्या