आजचा अग्रलेख : महाराष्ट्राची ‘पाऊसकोंडी’

179

मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 15 टक्के जास्त तर विदर्भ, मराठवाड्यात सरासरीपेक्षा 30 टक्के कमी पाऊस झाला आहे. निम्मे राज्य पेरणीविना पावसाची वाट पाहत आहे. महाराष्ट्र सध्या अशा विचित्र पाऊसकोंडीत सापडला आहे. अद्याप बराच पावसाळा बाकी आहे आणि त्यात वरुणराजा महाराष्ट्रावर कृपादृष्टी करील अशी आशा आहे. तरीही सध्याची पाऊसकोंडी कशी सुटणार, दुबार पेरण्यांचे संकट पेलण्याची ताकद शेतकऱ्यांत कशी येणार, सरकार या अस्मानी संकटातून कसा मार्ग काढणार आदी प्रश्न उरतातच. काही दीर्घकालीन आणि काही तातडीच्या उपाययोजना करून या प्रश्नांची उत्तरे शोधावीच लागतील, तरच राज्यातील शेतकरी निदान जगण्यापुरता मोकळा श्वास घेऊ शकेल.

कोकणातील रत्नागिरी आणि काही भागांत पावसाचा कहर सुरू आहे. मुंबईसह ठाणे, नाशिक, पुणे भागातही मागील पंधरवड्यात वरुणराजाने कृपा केली होती. मात्र विदर्भ, मराठवाडा, खान्देश या मोठय़ा पट्टय़ांत पावसाची मेहेरनजर झालेली नाही. अर्धा जुलै संपला तरी या भागात सरासरीपेक्षा 30 ते 31 टक्के पाऊस कमी पडला आहे. मराठवाड्यात 76 पैकी 41 तालुके आजही कोरडेच आहेत. आठ जिह्यांत फक्त 14 टक्के पाऊस झाला आहे. विदर्भातदेखील यापेक्षा वेगळे चित्र नाही. वास्तविक जुलै महिन्यात ग्रामीण विदर्भ आणि नागपूर पट्टय़ात सर्वाधिक पाऊस होतो. यंदा मात्र या संपूर्ण भागावर मान्सून अजून रुसलेला आहे. बंगालच्या उपसागरातील परिस्थितीवर विदर्भातील पर्जन्यमान अवलंबून असते आणि सध्या तरी तशी कोणतीही अनुकूल स्थिती दिसत नाही. त्यामुळे विदर्भावरील पावसाची अवकृपा तूर्त तरी कायम राहील असे दिसत आहे. खान्देश, सोलापूर वगैरे पट्टय़ांतही हीच परिस्थिती असल्याने 70 टक्के महाराष्ट्रावर पाण्याबरोबरच पेरणीचेही संकट कोसळले आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट घोंघावते आहे, तर काही ठिकाणी पेरण्याच होऊ शकलेल्या नाहीत. मराठवाड्यात

फक्त 26 टक्के पेरणी

झाली आहे. गेल्या वर्षी जून महिनाअखेरपर्यंत मराठवाड्यातील 80 टक्के पेरणी पूर्ण झाली होती. यंदा मात्र पाऊस नाही आणि पेरणीही नाही अशी भयंकर परिस्थिती महाराष्ट्राची आहे. परिस्थिती अशीच राहिली तर मराठवाड्याचे खरीपाचे उत्पादन घसरेल आणि तेथील दुष्काळग्रस्त बळीराजावरील संकट अधिक गडद होईल. विदर्भ आणि खान्देशातही बहुतांश नद्या, नाले, धरणे कोरडीच आहेत. पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्यांनी हिंमत करून पेरण्या केल्या त्यांची पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांनी पेरणी केली नाही त्यांचीही शेते भकासच आहेत. खरीपाची किमान 75 टक्के पेरणी या वेळेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असते, पण जेमतेम 43 टक्के पेरण्या झाल्या आहेत. तीच स्थिती धरणांमधील पाणीसाठय़ाची आहे. गेल्या वर्षी जुलैच्या मध्यापर्यंत जो जलसाठा 28.77 टक्के होता तो या वेळी जेमतेम 17 टक्क्यांच्या आसपास आहे. म्हणजे कोकण, मुंबई, ठाणे, पुणे आणि आसपासच्या भागांत पावसाने जोर कायम ठेवला असला तरी उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राला कोरडेच ठेवले आहे. राज्यातील 160 तालुक्यांमध्ये 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्याची अवस्था तर खूपच बिकट आहे. त्यामुळेच तेथील 39 शेतकऱ्यांनी मागील दोन आठवडय़ांत

आत्महत्येचा मार्ग पत्करून

स्वतःची सुटका करून घेतली, पण त्यांच्या कुटुंबीयांचे काय? 2022 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. तो चांगलाच आहे, पण तोपर्यंत शेतकरी जगणार कसा, तग धरणार कसा याकडेही सरकारला लक्ष द्यावे लागेल. निसर्गावर आपले नियंत्रण नाही हे मान्य, पण म्हणून शेतकऱ्याला निसर्गाच्या हवाली देऊन मोकळे कसे होता येईल? मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 15 टक्के जास्त तर विदर्भ, मराठवाड्यात सरासरीपेक्षा 30 टक्के कमी पाऊस झाला आहे. निम्मे राज्य पेरणीविना पावसाची वाट पाहत आहे. नद्या, नाले किमान पाऊसपाण्याचा खळखळाट तरी व्हावा अशी आस लावून आहेत. महाराष्ट्र सध्या अशा विचित्र पाऊसकोंडीत सापडला आहे. अद्याप बराच पावसाळा बाकी आहे आणि त्यात वरुणराजा महाराष्ट्रावर कृपादृष्टी करील अशी आशा आहे. तरीही सध्याची पाऊसकोंडी कशी सुटणार, दुबार पेरण्यांचे संकट पेलण्याची ताकद शेतकऱ्यांत कशी येणार, सरकार या अस्मानी संकटातून कसा मार्ग काढणार आदी प्रश्न उरतातच. काही दीर्घकालीन आणि काही तातडीच्या उपाययोजना करून या प्रश्नांची उत्तरे शोधावीच लागतील, तरच राज्यातील शेतकरी निदान जगण्यापुरता मोकळा श्वास घेऊ शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या