सामना अग्रलेख – शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका!

4747
प्रातिनिधीक

आधीचे कर्ज डोक्यावर असतानाच परतीच्या पावसाने पिकांची जी प्रचंड नासाडी केली त्यामुळे खचलेला शेतकरी रोज मृत्यूला कवटाळतो आहे. मागील एका महिन्यात मराठवाडय़ातील 68 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडेदेखील अस्वस्थ करणारे आहेत. हतबल शेतकरी केंद्र सरकारकडे मोठय़ा आशेने पाहत आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका, तातडीने भक्कम आधार देऊन त्यांचे प्राण वाचवा, एवढेच आमचे सरकारला सांगणे आहे.

आधी कोरडा दुष्काळ आणि नंतर ओढवलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जगणे असह्य करून सोडले आहे. खासकरून मराठवाडय़ातून येणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. मराठवाडय़ाच्या प्रत्येक जिल्हय़ात आत्महत्यांचे सत्रच सुरू झाले आहे. 14 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या सुमारे एक महिन्याच्या कालावधीत मराठवाडय़ातील 68 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. एकटय़ा बीड जिल्हय़ातच महिनाभरात 16 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नांदेड जिल्हय़ात 12, परभणी जिल्हय़ात 11, संभाजीनगर जिल्हय़ात 9, लातूरमध्ये 7, जालन्यात 6, हिंगोली जिल्हय़ात 4, तर धाराशीव जिल्हय़ात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भातही याहून वेगळी परिस्थिती नाही. अवकाळी पावसाने बसलेल्या फटक्यानंतर पहिल्या 20 दिवसांतच विदर्भातील 29 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बुलढाणा आणि यवतमाळ जिल्हय़ांत हे प्रमाण अधिक आहे. जानेवारीपासूनची आकडेवारी तपासली तर गेल्या अकरा महिन्यांत मराठवाडय़ात 746 आणि विदर्भात 877 अशा एक हजार 623 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी आहेत. शेतकऱ्यांच्या मनावर ताणच इतका असह्य झाला आहे की मृत्यू हाच या संकटातून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे, असे त्याला वाटते. शेतकऱ्यांनी

आधुनिकतेची कास

धरावी, पीक पद्धतींचे नियोजन करावे, उत्पादन दुपटीने वाढवावे वगैरे वगैरे बाता भाषणापुरत्या ठीक असल्या तरी प्रत्यक्ष शेतात जो शेतकरी राबतो त्याला भेटल्यानंतर कागदावरील हे स्वप्नाळू चित्र उद्ध्वस्त होते. शेतकऱ्यांनाही दुप्पट उत्पादन हवेच असते. पण निसर्गाने ते हाती पडू द्यायला हवे ना! कधी अवर्षण, कधी गारपीट तर कधी ओला दुष्काळ अशी नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांवर आलटून पालटून कोसळत असतात. या परिस्थितीशी दोन हात न करता शेतकरी मृत्यूला का कवटाळतात असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांनी शेतीचे अर्थचक्र आणि शेतकऱ्यांची परिस्थिती नीट समजून घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना एकाच वेळी अनेक पातळय़ांवर संघर्ष करावा लागतो. कधी बियाणेच निकृष्ट निघते, कधी पाऊसच न पडल्यामुळे पेरणी वाया जाते, दुबार पेरणीच्या संकटाला तोंड देतानाच पीक विम्यासाठी रांगा लावाव्या लागतात़  नुकसान झाले तर पुन्हा पीक विम्याच्या भरपाईसाठी कंपन्यांच्या कार्यालयात खेटे मारावे लागतात. कृषीविषयक सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे ठरवले तर सरकार दफ्तरीही एका फेरीमध्ये कधीच काम होत नाही. बँका दारात उभे करत नाहीत आणि आधीचेच कर्ज थकल्यामुळे सावकाराकडेही जाता येत नाही, अशा एक ना अनेक संकटांशी शेतकऱ्यांना झुंजावे लागते. एवढे सगळे करून शेतात एखाद्या हंगामात चांगली पिके डोलू लागली तर अलीकडच्या अवकाळी पावसाप्रमाणे एखादे संकट येते आणि डोळय़ादेखत

उभे पीक नष्ट

होते. ऑक्टोबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत राक्षस बनून आलेल्या अवकाळी पावसाने राज्यातील तमाम शेतशिवारे अशीच उद्ध्वस्त केली. कापणीला आलेल्या पिकांचा चिखल झाला. फळबागाही नेस्तनाबूत झाल्या. हातातोंडाशी आलेला घासच निसर्गाने हिरावून नेल्यामुळे राज्यभरातील शेतकरी मोठय़ा विवंचनेत सापडला आहे. झालेले नुकसान इतके मोठे आहे की या आपत्तीमधून बाहेर कसे पडायचे, कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा आणि शेतीच्या पुढच्या हंगामासाठी पैसा कुठून आणायचा अशा एक ना अनेक प्रश्नांचे काहूर गावागावांतील शेतकऱ्यांच्या मनात उठले आहे. राष्ट्रपती राजवटीतील सरकारने अजूनही ओला दुष्काळ जाहीर केला नाही. शिवाय राज्यपालांनी जी मदत जाहीर केली तीही इतकी तुटपुंजी आहे की त्यातून शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. आधीचे कर्ज डोक्यावर असतानाच परतीच्या पावसाने पिकांची जी प्रचंड नासाडी केली त्यामुळे खचलेला शेतकरी रोज मृत्यूला कवटाळतो आहे. मागील फक्त एका महिन्यात मराठवाडय़ातील 68 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडेदेखील अस्वस्थ करणारे आहेत. हतबल झालेले शेतकरी केंद्र सरकारकडे मोठय़ा आशेने पाहत आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका, तातडीने भक्कम आधार देऊन त्यांचे प्राण वाचवा, एवढेच आमचे सरकारला सांगणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या