सामना अग्रलेख – हे सावटही दूर होईल!

6126

पंतप्रधान मोदी स्वतः अयोध्येत जाऊन भूमिपूजन करतील. उमा भारती शरयू किनार्‍यावरून ‘मन की आंखे’ उघडून सोहळा पाहतील. आडवाणी, मुरली मनोहर दिल्लीत बसून रामजन्मभूमी लढ्याचा गोड शेवट अनुभवतील. बाकी मंचावरचे प्रमुख अतिथी श्रीरामांचे मंदिर उभारणीचे कार्य पुढे नेतील. संपूर्ण देश अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्याने रोमांचित झाला आहे. देशाचे पंतप्रधान राममंदिर निर्माणासाठी कुदळ मारणार यासारखा दुसरा सोनेरी क्षण नाही. कोरोना वगैरे आहेच. तो अयोध्या, उत्तर प्रदेश व संपूर्ण देशात आहे. रामाच्या कृपेने हे सावटही दूर होईल! 

अयोध्येतील भूमिपूजनानिमित्त धार्मिक विधी सुरू झाले आहेत.  गणेश पूजनाची सुरुवात झाली असतानाच देशातील अनेक प्रमुख नेते कोरोना पॉझिटिव्हने आजारी पडून इस्पितळात दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना संसर्ग झाला. सध्या ते गुडगावमधील इस्पितळात पडून आहेत. राममंदिराच्या भूमिपूजनास ते जाणार होते. मंचावर बसणाऱयांच्या यादीत त्यांचे नाव होते असे म्हणतात. अयोध्येतील सुरक्षा तसेच इतर व्यवस्थेची जबाबदारी गृहमंत्रालयावर होती, पण गृहमंत्री साहेबांनाच कोरोनाने पकडावे, जखडावे हे अयोध्येतील सोहळ्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल. पंतप्रधान, सरसंघचालक, उत्तर प्रदेशचे संन्यासी मुख्यमंत्री योगी महाराज व इतर निमंत्रित तर असतीलच, पण गृहमंत्री शहांशिवाय हा संपूर्ण सोहळा फिकाच पडेल. शहा यांच्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडो, अशी आम्ही श्रीरामचरणी प्रार्थना करीत आहोत. गृहमंत्री शहा यांच्यावर कोरोनाने झडप घातली व श्री. शहा यांना एकांतवासात जावे लागले. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी खूश व्हायचे कारण नाही. अमित शहा जेथे असतील तेथून ते राजकीय शस्त्र्ाक्रिया करीत असतात. त्यामुळे गेहलोत सरकारवरील धोका कायम आहे. गृहमंत्री एकांतवासात गेले तसे गेहलोत यांनाही त्यांच्या आमदारांना घेऊन एकांतवासात जावे लागले. म्हणजेच धोका कायम आहे! लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची वाढलेली वये पाहता त्यांनी ‘संसर्ग’ टाळावा व अयोध्येत पोहोचू नये

असा सल्ला

देण्यात आला व त्याबरहुकूम आडवाणी-जोशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच अयोध्या सोहळ्यात सहभागी होतील. आडवाणी यांनी वयाची नव्वदी पार केली, पण रामजन्मभूमी लढ्याचे ते शिलेदार होते. उमा भारती यांचे नाव निमंत्रितांच्या यादीत होते असे म्हणतात, पण त्यांनी स्वतःच जाहीर केले, त्या काही प्रत्यक्ष भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. कोरोना संसर्गाची भीती वाटत असल्याने त्या शरयू नदीच्या परिसरातच थांबून भूमिपूजनाशी श्रद्धेने नाते जोडतील. अयोध्येत कोरोना संक्रमणाचा कहर उडाला आहे हेच सत्य आहे. राममंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र महाराज यांच्यासह अनेक सेवक, सुरक्षा रक्षकांना कोरोनाने पकडले आहे. उत्तर प्रदेश तर कोरोनाचा भयंकर हॉटस्पॉट झाल्याचे चित्र आहे व त्यातून अयोध्याही मुक्त नाही. योगी सरकारच्या एक वरिष्ठ मंत्री कमल राणी वरुण यांचे रविवारी कोरोनाने निधन झाले. इतर तीन मंत्री व प्रत्यक्ष उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र सिंह हे कोरोना संसर्गाने बेजार झाले आहेत. तामीळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे कोरोना संक्रमित झाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडुरप्पादेखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. हे चित्र चिंताजनक व कोरोनाची भयावह स्थिती दाखवणारे आहे. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे एका महिला मंत्र्याचे निधन होणे हे जनतेसाठी मनाचे खच्चीकरण करणारे आहे. मंत्री कोरोनामुळे मृत्यू पावत असतील तर आम्हा गरीब पामरांचे काय, असा प्रश्न त्यांच्या

भेदरलेल्या मनास

पडू शकतो. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी लॉक डाऊन काळात सगळ्यात जास्त काळजी घेतली होती. शनिवारी त्यांनी दिल्लीतील एका सार्वजनिक सोहळ्यात भाग घेतला. त्याआधी बुधवारी कॅबिनेट बैठकीत सामील झाले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन सरकारने केले होते हे खरे, पण आता तरीही गृहमंत्री शहा यांनी सूचना केल्या आहेत की, जे कोणी गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आले होते, त्यांनी स्वतःला ‘आयसोलेट’ करून कोरोना टेस्ट करून घ्यावी. गृहमंत्री महोदय हे सांगत असतील तर कॅबिनेटला उपस्थित असणारे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळच ‘आयसोलेट’ करावे लागेल. पंतप्रधान मोदींचे निकटवर्ती म्हणून तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील दुसर्‍या क्रमांकाचे प्रमुख सहकारी म्हणून शहा हे पंतप्रधानांच्या निकट असतात, पण श्रीरामाच्या आशीर्वादाने पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांचा बालही बाका होणार नाही. या कामी श्री. राहुल गांधी यांनी अमित शहांना दिलेल्या शुभेच्छा महत्त्वाच्या आहेत. हे सर्व अयोध्येतील मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर घडत आहे. पंतप्रधान मोदी स्वतः अयोध्येत जाऊन भूमिपूजन करतील. उमा भारती शरयू किनार्‍यावरून ‘मन की आंखे’ उघडून सोहळा पाहतील. आडवाणी, मुरली मनोहर दिल्लीत बसून रामजन्मभूमी लढ्याचा गोड शेवट अनुभवतील. बाकी मंचावरचे प्रमुख अतिथी श्रीरामांचे मंदिर उभारणीचे कार्य पुढे नेतील. संपूर्ण देश अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्याने रोमांचित झाला आहे. देशाचे पंतप्रधान राममंदिर निर्माणासाठी कुदळ मारणार यासारखा दुसरा सोनेरी क्षण नाही. कोरोना वगैरे आहेच. तो अयोध्या, उत्तर प्रदेश व संपूर्ण देशात आहे. रामाच्या कृपेने हे सावटही दूर होईल!

आपली प्रतिक्रिया द्या