
फक्त सेप्टिक टँक किंवा मॅनहोल साफ करणारेच नाही तर घनकचरा आणि सांडपाणी साफ करणारे देशभरातील लाखो सफाई कामगार जिवावर उदार होत स्वच्छतेची ‘काळ ओझी’ वाहात आहेत. सेप्टिक टँक आणि रस्त्यावरील मॅनहोल त्यांच्यासाठी जमिनीखालील ‘गॅस चेंबर्स’ बनले आहेत. सरकारपासून समाजापर्यंत सगळेच स्वच्छतेच्या पालखीचे भोई झाले असले तरी स्वच्छतेचे खरे दूत असलेल्या सफाई कामगारांसाठी हीच स्वच्छता ‘यमदूत’ बनली आहे. या ‘गॅस चेंबर्स’मध्ये गुदमरणारे सफाई कामगारांचे श्वास आणि त्यांच्या उद्ध्वस्त कुटुंबीयांचा आक्रोश स्वच्छतेच्या गजरात विरून जात आहे. तो कोणी ऐकेल का?
मुंबईतील गोवंडी भागात सेप्टिक टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन सफाई कामगारांचा मंगळवारी मृत्यू झाला. या वर्षभरात फक्त मुंबई-ठाण्यात अशा प्रकारे 12 ते 15 सफाई कामगारांचा बळी गेला आहे. आठ महिन्यांपूर्वी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका सोसायटीच्या सेप्टिक टँकची स्वच्छता करताना तीन कामगार मरण पावले होते. नालासोपारा येथेही मे महिन्यात सेप्टिक टँकची साफसफाई तीन कामगारांच्या जिवावर बेतली होती. त्यापूर्वी मार्च महिन्यात नाशिक येथे एका सफाई कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला होता. कल्याणमध्ये जुनी विहीर साफ करणाऱ्या कामगारांवर मृत्यूची कुऱहाड पडली होती. जुलै महिन्यात श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे शौचालयाच्या टाकीतील मैला साफ करणाऱ्या ज्ञानेश्वर गांगुर्डे या कामगाराला जीव गमवावा लागला होता. तिकडे गुजरातमध्येही एका हॉटेलच्या सेप्टिक टँकची सफाई सात कामगारांच्या जिवावर उठली होती. तामीळनाडूमध्ये कोइंबतूर येथे शौचालयाची टाकी साफ करणाऱ्या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. आता मुंबईतील गोवंडी येथे अशाच दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली. दुर्घटना वेगवेगळ्या ठिकाणच्या असल्या तरी कामगार मृत्यूची कारणे तीच आहेत. सफाई कामगारांच्या सुरक्षेची काळजी ना कंत्राटदार घेतात ना गृहनिर्माण सोसायट्या त्याबाबत दक्ष असतात. दुर्घटना घडली आणि
कामगारांचा मृत्यू झाला
की काही काळ वादंग होते. कामगारांचे मृत्यू, त्यांची सुरक्षा, सुरक्षा साधनांची वानवा, त्याबाबत केले जाणारे दुर्लक्ष, कंत्राटदार आणि गृहनिर्माण सोसायटय़ांची उदासीनता असे सगळेच मुद्दे ऐरणीवर येतात. त्यावर तावातावाने चर्चा झडतात. सफाईची ही अमानवी पद्धत बंद करावी आणि यंत्राच्या सहाय्याने या टाक्या साफ कराव्यात अशी मागणी सफाई कामगार संघटनांपासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत सगळेच करतात, पण पुढे काहीच होत नाही. मध्यंतरी उच्च न्यायालयानेही सेप्टिक टँक आणि मॅनहोलमध्ये उतरून साफसफाई करणाऱ्या कामगारांच्या वाढत्या मृत्यूंबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच सफाई कामगारांच्या मृत्यूप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. तरीही आता गोवंडीसारखी दुर्घटना घडलीच. एकीकडे ‘स्वच्छता अभियान’, ‘स्वच्छ भारत,’ ‘हर घर शौचालय’ आदी योजनांचे ढोल दिल्लीपासून गल्लीपर्यंत पिटले जात आहेत. शौचालयांची निर्मिती, त्यांची डागडुजी वगैरेंबाबत जागृती केली जात आहे. हे चांगलेच आहे, पण याच शौचालयाच्या टाक्या, त्यातील मैला, तेथे खदखदत असणारा विषारी वायू, त्याचे उत्सर्जन याची काळजी ना सोसायटय़ांना असते ना सफाई कंत्राटदारांना. गेल्या वर्षी
एकट्या मुंबईत
शौच टाक्यांचे स्फोट होऊन किंवा शौचालय खचल्याने तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला होता. सेप्टिक टँक आणि गटारांवरील मॅनहोल सफाई कामगारांसाठी ‘मौत का कुँआ’ बनले आहेत. बरं, फक्त त्यात उतरल्यावरच त्यांचा बळी जातो असे नाही, तर त्यातून वाचणाऱ्या 80 टक्के कामगारांचा मृत्यू क्षयरोगासारख्या आजारांनी होत असतो. अनेकांना त्वचारोगांचा कायमचा संसर्ग होतो. फक्त सेप्टिक टँक किंवा मॅनहोल साफ करणारेच नाही तर घनकचरा आणि सांडपाणी साफ करणारे देशभरातील लाखो सफाई कामगार जिवावर उदार होत स्वच्छतेची ‘काळ ओझी’ वाहात आहेत. मागील दहा वर्षांत सुमारे 2700 सफाई कामगारांनी जीव गमावला आहे. एकीकडे प्रशासन आणि समाजाची उदासीनता तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्याची मजबुरी अशा दुहेरी कोंडीत देशातील सफाई कामगार सापडला आहे. सेप्टिक टँक आणि रस्त्यावरील मॅनहोल त्यांच्यासाठी जमिनीखालील ‘गॅस चेंबर्स’ बनले आहेत. सरकारपासून समाजापर्यंत सगळेच स्वच्छतेच्या पालखीचे भोई झाले असले तरी स्वच्छतेचे खरे दूत असलेल्या सफाई कामगारांसाठी हीच स्वच्छता ‘यमदूत’ बनली आहे. याची जाणीव ना प्रशासनाला आहे ना समाजाला. या ‘गॅस चेंबर्स’मध्ये गुदमरणारे सफाई कामगारांचे श्वास आणि त्यांच्या उद्ध्वस्त कुटुंबीयांचा आक्रोश स्वच्छतेच्या गजरात विरून जात आहे. तो कोणी ऐकेल का?





























































