सामना अग्रलेख – कामाठीपुऱ्यांची वेदना; संगीतबाऱ्यांची यातना  यांना कोणी जगवायचे?

7447
tamasha

कोरोनाचे असंख्य रुग्ण उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सापडले. कोरोना परदेशातून आणणारा हा वर्ग आहे. त्यांनी धारावी, कामाठीपुरा, संगीतबाऱ्या आणि कामगार-श्रमिकांच्या वस्त्यांना उपाशी मारले आहे. या सगळ्यांना जगवायचे कोणी, हा खरा प्रश्न आहे. कोरोनाशी लढावे यासाठी टाटांपासून प्रेमजी, अंबानी यांच्यापर्यंत अनेक उद्योगपती शेकडो कोटींचा दानधर्म करीत आहेत. त्यातील एक थेंब तरी देहविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्यांना आणि त्याच्या कुटुंबियांना स्वतंत्रपणे मिळावा अशी मागणी काही संस्था करीत असतील तर त्यात चुकीचे काहीच नाही. कोणत्याही समाजघटकाला या लढाईत वेगळे काढून चालणार नाही. कामाठीपुऱ्यातील भूकबळी हे समाजाला लांच्छन ठरेल. कामाठीपुऱ्याची वेदना आणि संगीतबाऱ्यांची यातना मूकबधिर होऊ नये!

कोरोनाचे संकट होतेच, त्यात आता संपूर्ण टाळेबंदी झाली आहे. त्यामुळे ज्यांच्यावर संकट कोसळले त्यात देहविक्री करून चरितार्थ चालविणाऱ्या महिलांचा समावेश आहे. अशा महिलांबाबत ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या डोळय़ांच्या कडा ओलावणाऱ्या आहेत. भांडवलदारी वृत्तपत्रे अट्टहासाने प्रसिद्ध झाली आहेत. पण कोरोनाच्या भीतीमुळे वृत्तपत्रांचे वितरण होत नाही व ज्यांनी ती प्रसिद्ध केली त्यांनी जागतिक समस्यांवर अग्रलेख लिहून ज्ञानामृत पाजले आहे. त्यामुळे या अशा महिलांचे, त्यांच्या पोराबाळांचे दु:ख हुंदक्यांसह घर नामक खुराडय़ातच कोंडून पडले आहे. प्रश्न फक्त मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये देहविक्रय करून कुटुंबाचे पोट भरणाऱ्या महिलांचा नाही, तर महाराष्ट्रातील लोककलाकारांचे तंबू आणि बाऱ्यादेखील थंड पडल्या आहेत. हा सर्व उपेक्षित समाज आहे. त्यांच्या घुंगरांना आवाज आहे, पण त्या घुंगरांना वेदना आहेत हे कोणी समजून घ्यायला तयार नाही. दुसरा विषय गोलपिठा, कामाठीपुरा यांसारख्या भागांतील पाच-सहा हजार महिलांचा आहे. स्वत:चे शरीर विकून त्या कशाबशा जगत होत्या. कोरोनाच्या भयाने ग्राहक रोडावले आणि आता सक्तीच्या बंदनंतर एकवेळचा चहापाव मिळण्याचीही भ्रांत त्यांना पडली आहे. मुंबईत कामाठीपुरा, पुण्यात बुधवार पेठ, सोलापुरात तरटी नाका, नागपूरसारख्या शहरातील काही ठिकाणे या महिलांनी आपल्या जगण्यासाठी निवडली आहेत. या महिलांना मुले आहेत. ती शाळेत जातात. या महिलांना नातेवाईक आहेत. ते परगावी असतात. त्यांचे विश्व संध्याकाळी उजाडते आणि सकाळी मावळते. या सगळय़ांवर आधी `एड्स’चे हल्ले झाले. त्यामुळे या नकोशा झालेल्या व्यवसायाची चमकधमक नष्ट झाली. मुंबईतील या गोलपीठा गल्ल्यांवर अनेक लेखक, कवींनी लिहिले. अनेकांनी नाटके व सिनेमे काढले, पण त्या महिलांचे दु:ख काही कमी झाले नाही. देहविक्री हा व्यवसाय कोणी खुशीने करत नाही. एका मजबुरीतून हा व्यवसाय पुरातन काळापासून सुरू आहे. मुंबईत गिरण्यांचा संप झाला तेव्हा

उद्ध्वस्त कुटुंबांची अवस्था

काय होती आणि या कुटुंबांतील तरुण मुले त्या वेळी `गँगवॉर’मध्ये कशी शिरली हे जसे वास्तव आहे तसे देहविक्री हेदेखील एक दाहक वास्तव आहे. धारावी झोपडपट्टीतील गरिबी ही जशी वेदना आहे तशी कामाठीपुरा हीसुद्धा एक यातना आहे. राज्यकर्त्यांच्या पिढय़ा बदलल्या तरी या वेदना आणि यातनांवर कोणी उतारा देऊ शकलेले नाही. आता `लॉक डाऊन’नंतर सगळय़ात जास्त हाल याच वर्गाचे झाले आहेत. प्रश्न फक्त गोलपीठा, कामाठीपुऱ्याचा नाही. संगीतबारीचे कलाकार तसेच दक्षिण मुंबईतील बच्चूभाई वाडीत परंपरेने संगीत मुजरा करणाऱ्या कलाकार यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना स्वत:ला सरकारसमोर जाऊन उभे राहता येत नाही. सरकारच्या दृष्टीने हे लोक नालायक, टाकाऊ आणि समाज बिघडवणारे आहेत. पण प्रत्यक्षात हेच लोक हाडाची काडे करीत आहेत म्हणून समाजातील `हवस’पणा नियंत्रणात आहे व समाज टिकला आहे. हे सर्व लोक म्हणजे समाजाची अत्यावश्यक सेवाच आहेत. त्यामुळे त्यांच्या उपासमारीकडे गांभीर्याने पाहायला हवे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोकसंगीत, लावण्या, बाऱ्या चालतात. नारायणगावला तर वर्षभराच्या कार्यक्रमांच्या सुपाऱ्या दिल्या-घेतल्या जातात. चौफुल्यापासून मोडलिंबपर्यंत आणि यवतपासून नारायणगावपर्यंत सर्वत्र ढोलकी आणि घुंगरांचे बोल सध्या मुके झाले आहेत. बच्चूभाई वाडीतील मुजरा कलाकारांवर भीक मागायची वेळ आली आहे. हीसुद्धा आपली प्रजाच आहे आणि सरकारने तिची उपासमार होणार नाही, याची काळजी वेळीच घ्यावी. कोणी कला विकते, तर कोणी देहविक्री करतात, पण ही सगळी शेवटी माणसेच आहेत. `बंद’मुळे त्यांना काहीच विकता येत नाही. मात्र पापी पेट का सवाल आहेच. आगीस वारा लागताच ती जशी भडकते तशी ही

पोटाची आगही

भडकतच आहे. त्यांच्यापर्यंत स्वस्त अन्नधान्य पोहोचत नाही. त्यांना भीक मागण्याचीही चोरी आहे. त्यामुळे बाहेर पडता येत नाही. त्यात कोरोनामुळे मरायचे नसेल तर घरातच थांबा असे सरकारतर्फे सांगितले जात आहे. ते एका अर्थाने बरोबरच आहे, पण या महिलांना घरी थांबवूनही मरावेच लागणार आहे. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की, कोरोनाचे असंख्य रुग्ण उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सापडले. कोरोना परदेशातून आणणारा हा वर्ग आहे. त्यांनी धारावी, कामाठीपुरा, संगीतबाऱ्या आणि कामगार-श्रमिकांच्या वस्त्यांना उपाशी मारले आहे. या सगळय़ांना जगवायचे कोणी, हा खरा प्रश्न आहे. कोरोनाशी लढावे यासाठी टाटांपासून प्रेमजी, अंबानी यांच्यापर्यंत अनेक उद्योगपती शेकडो कोटींचा दानधर्म करीत आहेत. त्यातील एक थेंब तरी देहविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्यांना आणि त्याच्या कुटुंबियांना स्वतंत्रपणे मिळावा अशी मागणी काही संस्था करीत असतील तर त्यात चुकीचे काहीच नाही. कोणत्याही समाजघटकाला या लढाईत वेगळे काढून चालणार नाही. कामाठीपुऱ्यातील भूकबळी हे समाजाला लांच्छन ठरेल. कामाठीपुऱ्याची वेदना आणि संगीतबाऱ्यांची यातना मूकबधिर होऊ नये!

आपली प्रतिक्रिया द्या