सामना अग्रलेख – साखर ‘कडू’, तोंड ‘गोड’!

2093

ऊसदर आणि एफआरपीचा वाद महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेला असतो. या वर्षी महापूर आणि अवकाळीच्या संकटाची भर पडली. त्यामुळे ऊस उत्पादन घटले. आता साखर उतारा घसरण्याचा अंदाज आहे. त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांनाच बसणार आहे. संकटांच्या कोंडीत सापडलेल्या साखर उद्योगाला विविध उपायांचा डोसराज्य सरकारतर्फे दिला जात आहे. नैसर्गिक संकटांमुळे साखर कडूझाली असली तरी ऊस उत्पादक आणि सामान्य माणसाचे तोंड गोडकसे राहील याचा विचार सरकारी पातळीवरून होत आहे. त्याचे स्वागतच आहे.

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचे तडाखे यामुळे महाराष्ट्रात ऊस आणि साखर उत्पादन कमी होणार असा अंदाज यापूर्वीच व्यक्त झाला होता. आता साखर उताऱ्यातदेखील घट होणार असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भावर पावसाची अवकृपा राहिली तरी उर्वरित महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्राला तर सलग काही दिवस महापुराचा वेढा पडला होता. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील अनेक गावे आणि शेती पाण्याखाली गेली. त्यामुळे उभा ऊस तर नष्ट झालाच, पण शेतात पसरलेल्या माती, दगडांमुळे शेतीही उद्ध्वस्त झाली. साहजिकच ऊस लागवडीवरही परिणाम झाला. त्यामुळे ऊस उत्पादन कमी होणे, साखरेचे उत्पादन कमी होणे अपेक्षितच होते. घडलेही तसेच. त्यात आता साखरेचा उताराही कमी होण्याची चिन्हे आहेत. साखर आयुक्तालयानेच हा अंदाज वर्तवला आहे. या वर्षी आतापर्यंत 310 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. साखरेचे उत्पादन सुमारे 33 लाख टन इतके झाले आहे. गाळप हंगाम निम्मा संपल्यानंतरची ही स्थिती आहे. त्यात गेल्या वर्षी 11.26 टक्के असलेला साखर उतारा या वेळी 10.60 टक्क्यांपर्यंत

खाली आला

आहे. त्याचाही विपरीत परिणाम साखर उत्पादनावर होण्याचा धोका आहे. गेल्या वर्षी 952 लाख टन उसाचे गाळप झाले होते. या वेळी हे प्रमाण 518 लाख टन इतकेच राहील, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे ऊसतोड मजुरांची वानवादेखील या वेळी प्रकर्षाने जाणवत आहे. म्हणजे ऊस कमी, साखरेचा उतारा कमी, ऊसतोड कामगार कमी अशी सध्या महाराष्ट्रातील साखर उद्योगाची अवस्था आहे. दुसरीकडे 24 साखर कारखान्यांनी बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलची निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळेही उतारा आणि साखर उत्पादन घसरणार आहे. महाराष्ट्राचा विचार करता एकूण साखर उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन पश्चिम महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात होत असते. उरलेल्या 60 टक्के उत्पादनात 40 टक्क्यांहून जास्त उत्पादन केवळ कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये होते. मात्र याच तीन जिल्ह्यांना महापूर आणि अवकाळी पाऊस यांचे जबरदस्त तडाखे बसले. तिन्ही जिल्ह्यांतील सुमारे दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती उद्ध्वस्त झाली. पश्चिम महाराष्ट्र आणि ऊस हेच समीकरण असल्याने या नैसर्गिक आपत्तीचा फटका ऊस उत्पादनाला बसणे अपेक्षितच होते.

मराठवाडा, विदर्भात

कमी पावसामुळे तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादन कमी झाले. जो काही ऊस शेतकऱ्याच्या हाती आला त्याच्या प्रतवारीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. साखर उतारा कमी होण्याचे हेदेखील एक कारण आहे. एरवी ऊसदर आणि एफआरपीचा वाद महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेला असतो. या वर्षी त्याच्या जोडीला महापूर आणि अवकाळीच्या संकटाची भर पडली. त्यामुळे ऊस उत्पादन घटले. आता साखर उतारा घसरण्याचा अंदाज आहे. याचा एकत्रित परिणाम साखर उत्पादनावर होणार आहे. त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांनाच बसणार आहे. ऊस पीक हे ‘नगदी’ म्हटले जात असले तरी ऊस उत्पादक शेतकऱ्याला निसर्ग आणि साखर कारखानदार यांच्या ‘उधारी’वरच अवलंबून राहावे लागते. पुन्हा जागतिक पातळीवर साखरेच्या दरात होत असलेल्या चढ-उतारांचे सावटही महाराष्ट्रातील साखर उद्योगावर आहेच. संकटांच्या कोंडीत सापडलेल्या साखर उद्योगाला विविध उपायांचा ‘डोस’ राज्य सरकारतर्फे दिला जात आहे. नैसर्गिक संकटांमुळे साखर ‘कडू’ झाली असली तरी ऊस उत्पादक आणि सामान्य माणसाचे तोंड ‘गोड’ कसे राहील याचा विचार सरकारी पातळीवरून होत आहे. त्याचे स्वागतच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या