आजचा अग्रलेख  : महापुराचे ‘आफ्टर शॉक्स’; साखर ‘कडू’ होणार!

1927
प्रातिनिधिक फोटो

सांगली, सातारा, कोल्हापूर पट्ट्यातील उद्ध्वस्त शेती आणि शेतकरी सावरायला वेळ लागेल. कारण महापुराचे ‘आफ्टर शॉक्स’ शेतकऱ्यालाच जास्त बसतात. देशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेले मंदीचे सावट दूर करण्यासाठी सवलतींचा ‘बुस्टर डोस’ केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दोनच दिवसांपूर्वी उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला पाजला. महाराष्ट्राच्या ऊस उत्पादक आणि साखर उद्योगावर जे संकट कोसळले आहे, त्यासाठीही सवलतींचे ‘सलाईन’ सरकारने देण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील साखर ‘कडू’ होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

सांगली, सातारा आणि कोल्हापूर परिसरात पूरस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी त्यामुळे झालेले नुकसान भरून निघायला बराच काळ लागेल. पुन्हा या महापुराचे काही दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. येथील जलप्रलयाने जनजीवन आणि शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. शेतांमधील उभी पिके नष्ट झाली. शेतजमिनीचीदेखील वाताहत झाली. त्यामुळे यावेळचा खरिपाचा हंगाम जवळजवळ वायाच गेला आहे. प. महाराष्ट्र म्हटला की, ऊस आणि साखर हे समीकरण आहे. साहजिकच महापुराचा सर्वाधिक फटका उस पिकाला बसला आहे. उभा ऊस निरुपयोगी ठरल्याने त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होणार हे स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा विचार करता एकूण साखर उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन प. महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात होते. उरलेल्या 60 टक्के उत्पादनात 40 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांचा आहे. मात्र महापुरामुळे या वाट्यात मोठा घाटा झाला आहे. या तिन्ही जिल्ह्यांतील सुमारे दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती महापुराने उद्ध्वस्त झाली आहे. ही बव्हंश शेती उसाची होती. हे संपूर्ण पीक तर हातातून गेलेच आहे, पण उर्वरित ठिकाणीही फारशी समाधानकारक स्थिती नाही. उसाचा शेंडा वर, पण बाकीचा ऊस पाण्याखाली

अशी स्थिती

अनेक भागांत सलग आठ-दहा दिवस होती. तो ऊसदेखील साखर उत्पादनाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरला आहे. जो थोडाफार ऊस साखर कारखान्यांपर्यंत जाण्याच्या स्थितीत आहे, त्याचा उतारा किती राहील याबद्दल शंकाच आहे. आधीच या भागात जेमतेम 35 ते 50 टक्के ऊसच गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. त्यातील किती ऊस आवश्यक तो उतारा देईल याचे उत्तर तूर्त तरी ‘महापूर भरोसे’च आहे. म्हणजे प. महाराष्ट्रात महापुरामुळे ऊस उत्पादन कमी होणार आहे तर मराठवाडा, खान्देश, सोलापूर भागात कमी पावसाचा तडाखा उसाला बसला आहे. त्यामुळे राज्यात साखरेच्या उत्पादनात यावर्षी किमान 50 टक्के घट होईल अशी भीती आहे. पुन्हा हे दुहेरी संकट आहे. गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन जास्त होते, पण मागणी कमी झाली आणि गोदामांमध्ये साखर पडून राहिली, साखर उद्योगांसमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच महाराष्ट्राला यावर्षी एकाच वेळी महापूर आणि दुष्काळ अशा परस्परविरोधी आपत्तींनी तडाखे दिले. त्यामुळे साखर उत्पादन निम्म्याने कमी होण्याचे संकट साखर उद्योगासमोर उद्भवले आहे. महाराष्ट्रातील कांदा, ऊस, केळी आदी महत्त्वाची पिके कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच संकटात सापडत असतात. दरवर्षी कांदा रस्त्यावर

फेकण्याची वेळ येते

किंवा मिळेल त्या दराने शेतकऱ्याला तो विकावा लागतो. उसाचा दर आणि एफआरपीचा वाद तर पाचवीलाच पुजलेला आहे. शेतात गाळलेल्या घामाचा योग्य मोबदला ऊस उत्पादकालाही मिळत नाही. म्हणायला ऊस हे ‘नगदी पीक’ असले तरी ते घेणाऱ्या बळीराजाला मात्र कायम साखर कारखान्यांच्या ‘उधारी’वरच जगावे लागते. बळीराजाला कधी कांदा रडवतो तर कधी ऊसदराच्या चरकात तो पिळून निघतो. यावर्षी महापुराच्या तडाख्याची भर पडली. सांगली, सातारा, कोल्हापूर पट्ट्यातील महापूर आता ओसरला आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे, पण उद्ध्वस्त शेती आणि शेतकरी सावरायला वेळ लागेल. कारण महापुराचे ‘आफ्टर शॉक्स’ शेती आणि शेतकऱ्यालाच जास्त बसतात. आताही वाया गेलेला ऊस आणि त्यामुळे कमी होणारे साखर उत्पादन यांचा तडाखा प. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक आणि साखर उद्योगालाच बसणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेले मंदीचे सावट दूर करण्यासाठी विविध सवलतींचा ‘बुस्टर डोस’ केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दोनच दिवसांपूर्वी उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला पाजला. महाराष्ट्राच्या ऊस उत्पादक आणि साखर उद्योगावर जे संकट कोसळले आहे, त्यासाठीही काही सवलतींचे ‘सलाईन’ सरकारने देण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील साखर ‘कडू’ होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या