
लडाखमधून चीन सैन्य मागे घेत नाही आणि पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याची चिन्हे नाहीत. कश्मीरमधून 370 कलम हटविण्याला आता एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला. तरीही जम्मू-कश्मीर धगधगतच राहणार असेल, कश्मीरची सीमा पाकिस्तानच्या गोळीबाराने अशांतच राहणार असेल तर कसे व्हायचे? 1971च्या युद्धात आपण पाकड्यांना धडा शिकविला. एका देदीप्यमान विजयाचा ‘इतिहास’ रचला, पण कश्मीरमधील ‘वर्तमाना’चे काय? 1971चा इतिहास रचणाऱ्य़ांवर टीका करणारे जरा या वर्तमानावरही एखादी ‘मन की बात’ करतील का?
पाकड्यांना चारीमुंड्या चीत करून कायमची अद्दल घडवणाऱ्य़ा 1971 च्या युद्धाचा 50 वा विजय दिवस बुधवारी हिंदुस्थानने साजरा केला. जगाच्या इतिहासात आणि भूगोलातही सुवर्णाक्षरांनी लिहावे अशा विजयाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्ताने राजधानीतील शहीद स्मारकात जाऊन विजय मशाल प्रज्वलित केली. ही विजयी मशाल आता देशभरातील सर्व सैन्यदलांच्या छावण्यांत जाणार आहे. आपल्या देशाची शौर्यगाथा, लष्कराने गाजवलेला अचाट पराक्रम पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचलाच पाहिजे. त्यासाठी इतिहासात बजावलेले शौर्य आणि पराक्रमाच्या खुणा असलेल्या अद्भुत युद्धकथा राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग तर चेतवतातच, पण विजयाची ही मशाल अशीच धगधगत ठेवण्याची प्रेरणाही देतात. 1971 च्या युद्धाचा इतिहासच तसा रोमांचक आणि स्फूर्तिदायक आहे. इंदिरा गांधींच्या मुत्सद्देगिरीची कमाल, अमेरिकेचे आरमार पाकिस्तानच्या मदतीला पोहचण्यापूर्वीच पाकड्यांना पराभूत करण्यासाठी रचलेले धूर्त डावपेच, जनरल माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी लष्कराने चित्त्याच्या चपळाईने पाकिस्तानी सैन्यावर चढवलेला हल्ला आणि अवघ्या 13 दिवसांत पाकड्यांना गुडघे टेकायला लावणारी हिंदुस्थानी सैन्याची जबरदस्त मर्दुमकी अशा जाज्वल्य इतिहासाचा हा सुवर्ण महोत्सव आहे. या विजयाने पाकिस्तानचा दारुण पराभव करून केवळ
इतिहासच घडवला नाही
तर पाकिस्तानचे दोन तुकडे करून भूगोलही बदलला. पाकिस्तानचा लचका तोडून बांगलादेश या नवीन राष्ट्राची निर्मिती करून पाकिस्तानला कायमची भळभळती जखम देण्याची महान कामगिरी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बहाद्दर लष्करी अधिकाऱ्य़ांच्या साथीने फत्ते करून दाखवली. ‘काँग्रेसने 70 वर्षांत काय केले?’ असा पोरकट सवाल करणाऱ्य़ा व्हॉटस्ऍप विद्यापीठाच्या वाचाळवीरांनी पाकिस्तानची दोन शकले करण्याचा हा जाज्वल्य इतिहास जरूर डोळय़ाखालून घालायला हवा. त्याच युद्धातील विजयाचा गौरव बुधवारी पंतप्रधान मोदी यांनाही केला. अर्थात, पाकिस्तानसारख्या देशाचे शेपूट अशा तडाख्यानंतरही वाकडेच राहिले आहे, हे देखील खरेच. तीन-तीन युद्धांत सपाटून मार खाऊन आणि नामुष्की ओढवूनही पाकिस्तान अजूनही वठणीवर यायला तयार नाही. तिकडे राजधानीत पंतप्रधान विजयी मशाल पेटवत असतानाच कश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्याने युद्धबंदीचे उल्लंघन करून अंदाधुंद गोळीबार केला. हिंदुस्थानी सैनिकांनी नेहमीप्रमाणे जोरदार प्रतिहल्ला चढवून पाकिस्तानच्या दोन सैनिकांचा खात्मा केला. दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या गोळीबारात आपले तीन जवान शहीद झाले. पाकिस्तानने युद्धबंदीच्या चिंधड्या उडवायच्या, कश्मीर सीमेवरील गावांवर तोफांचा भडिमार करायचा, जवानांवर गोळीबार करायचा हे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. 2020 या वर्षात तर
पाकड्यांनी युद्धबंदी मोडण्याचा
उच्चांकच गाठला. नोव्हेंबर महिन्यापर्यंतच यंदा पाकिस्तानने तब्बल 4052 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले. गेल्या 17 वर्षांतील हा सर्वात मोठा आकडा आहे. दररोज होणाऱ्य़ा चकमकीत शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव देह त्या त्या राज्यांतील गावात पोहचतात, शोकाकुल वातावरणात तरण्याबांड जवानांवर अंत्यसंस्कार होतात. तिरंग्यात लपेटलेले असे किती पार्थिव देह आपण अजून पाहणार आहोत? 1971च्या युद्धाचा विजय दिवस साजरा करतानाच गरज भासली तर पाकिस्तानवर पुन्हा एकदा तशा युद्धासारखा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल. काँग्रेसने काय केले, असे प्रश्न करून भूतकाळात रमण्यापेक्षा रोज युद्धबंदी पायदळी तुडवणाऱ्य़ा पाकिस्तानचे आणि लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांचे आपण काय करणार आहोत? लडाखमधून चीन सैन्य मागे घेत नाही आणि पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याची चिन्हे नाहीत. कश्मीरमधून 370 कलम हटविण्याला आता एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला. तरीही जम्मू-कश्मीर धगधगतच राहणार असेल, कश्मीरची सीमा पाकिस्तानच्या गोळीबाराने अशांतच राहणार असेल तर कसे व्हायचे? 1971च्या युद्धात आपण पाकड्यांना धडा शिकविला. एका देदीप्यमान विजयाचा ‘इतिहास’ रचला, पण कश्मीरमधील ‘वर्तमाना’चे काय? 1971चा इतिहास रचणाऱ्य़ांवर टीका करणारे जरा या वर्तमानावरही एखादी ‘मन की बात’ करतील का?




























































