
देशाच्या आझादीचे ‘अमृत’ भलत्यांच्याच तोंडी लागले. गरीब आदिवासींच्या वाटय़ाला मात्र ‘विष’च आले. आदिवासी बालकांचे कुपोषण, त्यातून होणारे त्यांचे मृत्यू, कुपोषित आदिवासी माता, गरिबी, दळणवळण, रस्ते, आरोग्य सुविधा यांचा अभाव, त्यात पाचवीला पुजलेली सरकारी अनास्था या शापातून आदिवासींची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही सुटका झालेली नाही. नाशिक आणि मोखाडा येथील घटनांनी शापित आदिवासींच्या नशिबी आलेले हे वास्तव पुन्हा समोर आले आहे.
सरकारी आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय मदत गरीब आदिवासींसाठी आजही फक्त कागदावरच आहेत. वैद्यकीय मदतीअभावी हकनाक जीव गमावणे हेच आजही आदिवासींचे विधिलिखित आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागात आर्थिक विपन्नावस्थेत राहण्याच्या सुलतानी शापातून आजही त्यांची मुक्तता झालेली नाही. त्यामुळेच कुठे दुथडी भरून वाहणारी नदी ओंडक्यावर बसून पार करीत रुग्णालय गाठण्याची वेळ आदिवासी गर्भवतीवर येत आहे, तर कुठे वैद्यकीय मदत वेळेत न मिळू शकलेल्या आदिवासी स्त्रीला नवजात अर्भकासह जीव गमवावा लागत आहे. पालघर जिल्हय़ातील मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम कुर्लोद ग्रामपंचायतीमधील शेडय़ाचा पाडा येथील एका गर्भवतीला मंगळवारी रुग्णालयात नेण्याची वेळ आली. मात्र जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेण्यासाठी रुग्ण महिला आणि इतरांना आधी काही किलोमीटरची पायपीट करावी लागली. नंतर नदीवर पूल नसल्याने दुथडी भरून वाहणारी नदी लाकडाच्या ओंडक्यावर बसून पार करावी लागली. एकीकडे वैद्यकीय सेवेअभावी जिवाची शाश्वती नाही आणि दुसरीकडे मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर घेऊनच उपचारांसाठी धाव घ्यायची. आदिवासींचे जीवन हे असे आजही
जीवनमृत्यूच्या दुष्टचक्रात
अडकले आहे. पुन्हा एवढी यातायात करूनही सरकारी आरोग्य केंद्रात उपचार होतीलच याची काहीच शाश्वती नसते. एक तर ते बंद असते. उघडे असले तरी डॉक्टर किंवा इतर वैद्यकीय कर्मचारी नसतात. ते असले तरी आवश्यक वैद्यकीय सुविधा, उपकरणे आणि औषधांच्या नावाने बोंब असते. नाशिक जिल्हय़ातील दुसरी घटना याच दुरवस्थेची पोलखोल करणारी आहे. इगतपुरी भागातील एका आदिवासी गर्भवतीला प्रसूती वेदना होऊ लागल्याने उपचारासाठी मध्यरात्री काही किलोमीटर पायपीट करावी लागली. दुर्दैवाने तिचा आणि बाळाचा दवाखान्यात मृत्यू झाला. दुर्दैव हे की, तिचा मृतदेह घरी परत नेतानाही तीच यातायात नातेवाईकांना करावी लागली. कुठलीच सुविधा नसल्याने मृतदेह झोळीतून न्यावा लागला. महाराष्ट्रातील आदिवासी भागाचे हे दाहक वास्तव आहे. राज्यकर्ते विकासाच्या आणि गतिमान वगैरे कारभाराच्या कितीही गप्पा करीत असले तरी या दोन्ही घटनांनी या दाव्यांना चपराकच लगावली आहे. 2014 नंतर देशाचा कसा आमूलाग्र विकास झाला, गरीब आणि आदिवासींच्या घरांमध्ये कसे प्रगतीचे दिवे लागले असे फुगे नेहमीच सोडले जातात. त्यांनाही या घटनांनी टाचणी लावली आहे. गरीब आदिवासींच्या नशिबी आलेले हे सरकारी
गैरकारभाराचे भोग
दशकानुदशकांचे आहेत. कधी प. बंगालमध्ये सरकारी शववाहिकेचा खर्च परवडणारा नसल्याने दुर्दैवी बापाला मुलाचा मृतदेह पिशवीत टाकून बसमधून न्यावा लागतो तर कधी इगतपुरीमध्ये गर्भवती महिलेचा मृतदेह झोळीतून घरी न्यावा लागतो. पालघर जिल्हय़ात दर्शना फरले ही आदिवासी महिला झोळीतच प्रसूत होते आणि तिच्या डोळय़ादेखत अर्भकाचा मृत्यू होतो. नाशिक जिल्हय़ातील पेठ तालुक्यात विद्यार्थ्यांना मोठ्या पातेल्यात बसून तर बीडच्या पाटोदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना थर्माकोलच्या आधारे जीवघेणा नदीप्रवास करावा लागतो. देशाच्या आझादीचे ‘अमृत’ भलत्यांच्याच तोंडी लागले. गरीब आदिवासींच्या वाटय़ाला मात्र ‘विष’च आले. आदिवासी बालकांचे कुपोषण, त्यातून होणारे त्यांचे मृत्यू, कुपोषित आदिवासी माता, गरिबी, दळणवळण, रस्ते, आरोग्य सुविधा यांचा अभाव, त्यात पाचवीला पुजलेली सरकारी अनास्था या शापातून आदिवासींची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही सुटका झालेली नाही. नाशिक आणि मोखाडा येथील घटनांनी शापित आदिवासींच्या नशिबी आलेले हे वास्तव पुन्हा समोर आले आहे.





























































