रोखठोक – नेपोलियन, जपान आणि चैनबाज; काही वेगळ्या सैन्यकथा!

युद्धकथा वाचायला सगळ्यांनाच आवडतात. तो काळ वृत्तपत्रांचा होता. आता वृत्तवाहिन्याच युद्धमैदानावरून खोट्या बातम्यांचे युद्ध खेळतात. इतिहासातले सेनापती, सैन्य व त्यांची कथानके कशी होती?

युद्ध आता कोणालाही परवडणार नाही. भारत आणि पाकिस्तानात सध्या युद्धतणाव आहे. त्यात एक दिवस पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नष्ट होईल. त्याची सुरुवात झाली आहे. ‘आापरेशन सिंदूर’ भारतीय सैन्याने यशस्वी केले, करून दाखवले. सिंदूर म्हणजे कुंकवाचे महत्त्व काय ते आता पाकिस्तान व त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांना समजले असेल. गांधींनी म्हटले आहे, दुर्बलाच्या अहिंसेपेक्षा बलवानाची अहिंसा अधिक चांगली असते, पण अहिंसा ही अहिंसाच असते. पण युद्धात हिंसा अटळ आहे. भारत-पाकिस्तान तणाव हा सध्याचा एक ज्वलंत प्रश्न आहे. हा प्रश्न पाकिस्तानने निर्माण केला. 1971च्या युद्धात पाकिस्तानने भारताकडून सपाटून मार खाल्ला. भारताने केलेल्या आक्रमणात आम्ही लढलो असे पाकड्यांनी म्हणणे म्हणजे ‘लढणे’ या शब्दाची चेष्टाच होईल. पाकडे मार खात राहिले व नुसते पळत सुटले. त्यांचे 90 हजार सैनिक शरण आले. हे युद्ध तसे एकतर्फीच झाले. 1971चे युद्ध इतक्या झटपट संपले की, हे युद्ध सुरू झाले याची जाणीवसुद्धा आपल्या लोकांना नीट झाली नाही, पण तेव्हा इलेक्ट्रानिक मीडिया नव्हता. त्यामुळे वर्तमानपत्रांतून युद्धविषयक अतिरंजित, खोट्या बातम्या येत नव्हत्या. युद्धाच्या रिपोर्टिंगबद्दल फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जी एक म्हण प्रचारात आली ती आजसुद्धा लागू पडते. ‘As False as A Bulletin’ अशी म्हण त्यावेळी रूढ होण्याचे कारण म्हणजे, युद्धाचे सरकारी वृत्तांत खोटे असत. युद्ध सुरू असताना खरा वृत्तांत दिला तर त्याचा शत्रूला फायदा होतो. म्हणून युद्धाचा खरा वृत्तांत कोणीच छापत नाही अशी सर्वसामान्य लोकांची समजूत असते. याचे प्रत्यंतर आताही येत आहेच.

कोण कोठे?

युद्धात कोण कोणाच्या बाजूने याला महत्त्व आहेच. महाभारतात ते महत्त्व कृष्ण आणि कर्णाला आलेच होते. आता पाकिस्तानच्या बाजूने चीन उभा आहे. म्हणजे पाकिस्तान एकाकी नाही. अमेरिका, रशिया, जपानसारख्या राष्ट्रांनी भारताला पाठिंबा दिला. मात्र प्रत्यक्षात युद्ध भारतीय सैन्यालाच लढायचे आहे. नेपोलियन ज्या बाजूला असेल त्या बाजूला लाखभर सैन्य जास्त आहे असे धरून चालण्याची प्रथा तेव्हा होती. हे बळ कुशल सेनापतींमुळे एखाद्या राष्ट्राला चढते. पाकिस्तानचा सध्याचा सेनापती मुनीर हा आधी वल्गना करत होता. आता त्याचा ठावठिकाणा लागत नाही. युद्ध जोरात चालले आणि दीर्घकाळ चालले म्हणजे मग सेनापतीच्या लायकी-नालायकीची परीक्षा होऊ लागते. सैन्य हे सेनापतीच्या हुकूमावर चालते हे पहिले व सैन्य हेच सेनापतीचे शस्त्र असते हे दुसरे. ते जर त्याला नीट वापरता आले नाही तर कितीही बलाढ्य राष्ट्र असले तरी त्याचा उपयोग नाही. सैन्यात धर्म आणि राजकारण आणू नका, असे जे सांगितले गेले ते यासाठीच. पहिल्या महायुद्धाच्या वेळच्या ब्रिटिश पंतप्रधानांनी लिहिलेल्या आठवणी मार्गदर्शक आहेत. पाश्चेंडेलेच्या रणांगणावर अक्षरश: चिखलामध्ये आपल्या सैनिकांना घालून मारल्याबद्दल त्यांनी ब्रिटिश सेनापतींवर ठपका ठेवला आहे. आपण आपल्या सैनिकांना कोठे पाठवत आहोत याचा विचार करण्याची तसदीसुद्धा तेव्हाच्या वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांनी घेतली नाही. सैन्य पुढे आणि सेनापती पन्नास मैल मागे असे चित्र होते. सेनापतीने आघाडीवर जाण्यात धोका असतो हे खरे, पण सेनापतीने धोका पत्करायचाच असतो. दोन-चार सेनापती मारले गेले असते तर त्याने काय दुनिया ओस पडत नव्हती, असे लाईड जार्ज यांनी म्हटले आहे. पहिल्या महायुद्धाबद्दल अमेरिकन जनरल शेरमान याने लिहिलेल्या पुस्तकाचे नावच ‘Lions Led By Donkeys’  असे आहे. गाढवांच्या नेतृत्वाखाली लढणारे सिंह या मथळ्यावरूनच सेनापतींच्या लायकीबद्दल मत व्यक्त होते.

संघ आणि सेना

भारताचे सैन्य प्रोफेशनल आहे. ती खोगीर भरती नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकदा सांगितले होते, भारतीय सैन्यापेक्षा संघाचे स्वयंसेवक अधिक तेजस्वी आणि वेगवान आहेत. युद्धासाठी ते अधिक वेगाने तयार होतील. भारतीय सैन्याचा हा अपमान असल्याचा आरोप तेव्हा झाला. स्वत:च्या क्षमतेविषयी या भ्रामक समजूती आहेत. पंतप्रधान मोदी हे स्वत: संघाचे स्वयंसेवक आहेत, पण त्यांनी युद्ध करण्याची जबाबदारी भारतीय सेनादलावर सोपवली. अर्थात भारतीय सैन्याचे शौर्य व कौशल्याचे श्रेय मोदी नक्कीच घेतील. राजकीय उदोउदो नक्कीच होईल. त्याला काय करायचे? पहिल्या महायुद्धाच्या काळातल्या ब्रिटिश पंतप्रधानांनी लिहिलेल्या आठवणी गमतीशीर आहेत. पहिले महायुद्ध चालू असताना ब्रिटिश वर्तमानपत्रात अमुक एका सेनापतीने अमक्या लढाईत फार मोठा पराम केला, अशी बातमी छापून आली होती. त्या वर्तमानपत्राच्या अंकाचा फोटो त्याने आपल्या पुस्तकात छापला आणि त्याखाली एक टीप अशी दिली की, `जी लढाई कधी लढलीच गेली नाही, त्या लढाईमध्ये मोठा विजय संपादन केल्याबद्दल राजकीय कारणासाठी सेनापतीची पाठ कशी थोपटली जाते पहा. अशी लढाई खरोखर झाली की नाही याबद्दल खात्री करून घ्यायची असेल तर वाचकांनी युद्धाचा जो अधिकृत इतिहास प्रसिद्ध झाला आहे तो चाळून पाहावा. त्यात अशा कुठल्याच लढाईचा उल्लेख सापडायचा नाही. कारण ही लढाई झालीच नाही.’ प्रत्यक्ष युद्धकाळात युद्धभूमीवरून कशा खोट्या बातम्या दिल्या जातात आणि पंतप्रधानांनाही कसे फसवतात याचे उदाहरण देऊन लाईड जार्ज यांनी मोठ्या वैतागाने उद्गार काढले की, “”I, the Prime Minister of Great Britain was kept ignorant of these Facts.” पंतप्रधानांपासून युद्धभूमीवरचे सत्य कसे दडवून ठेवण्यात येते हे इंग्लंडसारख्या राष्ट्रात सतत घडत होते.

जपान आणि नेपोलियन

जपानने भारताला पाठिंबा दिला आहे. त्या जपानच्या सैन्याविषयी सांगायला हवे. सैन्यात उंची मोजली जाते. बुटक्या लोकांना सैन्यात स्थान नसते.

माणसाला उंची नसली म्हणजे तो लढायला नालायक असे म्हणणे जपानी सैनिकांचा अपमान ठरेल. जपानच्या हवाई दलात चष्मा लावणारे पायलट होते. त्यामुळे त्यांना विमाने उडविण्यात व युद्ध करण्यात कोणतीच अडचण निर्माण झाली नाही. त्यांच्या `कामिकाझे’ वैमानिकांनी ब्रिटनच्या अजस्र युद्धनौका बुडवल्या. सैन्य पोटावर चालते व त्या पगारी फौजा आहेत हा समज बराच काळ जपानी सैनिकांनी खोटा ठरवला होता. जपानी सैन्यातले अधिकारी दोन्ही महायुद्धांत फक्त शांततेच्या काळात पगार घेत असत. युद्ध सुरू झाल्यावर कोणताही जपानी अधिकारी पगार घेत नसे व त्याचे कारण ते असे सांगत की, “आम्ही पैशांकरिता आपला जीव द्यायला तयार नसतो. आम्ही देशाकरिता मरावयास तयार असतो.” युद्ध चालू असताना सर्व जपानी अधिकाऱ्यांच्या बायका कामे करून आपला घर-संसार चालवीत असत. त्यामुळे संपूर्ण समाज त्यांच्याकडे आदराने पाहत असे. आता असे कोठेच नाही. जो पाकिस्तान भारताविरुद्ध गरळ ओकतो व दहशतवादी कारवाया घडवतो, त्याचे सैन्य जगातील सगळ्यात भ्रष्ट, व्यभिचारी आणि चैनबाज आहे. पाकिस्तानी सैन्याबद्दल तेथील जनतेला आदर नाही. त्यांना सत्ता आणि चैनबाजीची चटक लागली. माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरंगात आहेत व त्यांच्यावर एका `मेजर’ हुद्द्याच्या सैन्य अधिकाऱ्याने बलात्काराचा प्रयत्न केला. नव्हे, बलात्कार केला. हे पाक सैन्याचे चरित्र आहे. चरित्र नसलेले सैन्य भारतासमोर उभे आहे. हे सैन्य अवगुणी आहे. नेपोलियनच्या जीवनातील एक प्रसंग देतो व विषय संपवतो. एका अधिकाऱ्याला नेपोलियनने पदावरून हटवले तेव्हा त्याचा एक मित्र नेपोलियनकडे रदबदली करायला गेला. तेव्हा नेपोलियनने त्याला उत्तर दिले ते महत्त्वाचे, “तो माणूस जुगारी आहे. त्याला अशा अधिकार पदावर ठेवून कसे चालेल? उद्या माझ्या सैनिकांच्या जिवाशी तो खेळेल आणि देशाची सुरक्षा जुगारावर लावेल. अशा जुगाऱ्याला मी माझ्या सैन्यात ठेवणार नाही. मी माझ्या सैन्याची प्रतिष्ठा जपतो.”

नेपोलियनचे हे उद्गार तो उत्तम सेनापती व सैनिक असल्याचे दर्शवते. पाकिस्तान हा देश बॅ. जीना यांनी निर्माण केला व लोकशाही, संसद असताना तेथील सैन्यालाही राजकारणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिला. त्याचे परिणाम पाकिस्तान व जग भोगत आहे. पाकड्यांचे सैन्य जुगारी, नशेबाज, चैनबाज आहे. त्यामुळे ते भारतीय सैन्याप्रमाणे `प्रोफेशनल’ नाही. असे जुगारी, नशेबाज सैन्य धोकादायक असते. त्यांना मुळापासूनच उखडायला हवे. भारतीय सैन्य हे पवित्र काम फत्ते करेल!

@rautsanjay61

[email protected]