सिनेमा – उत्तर नसलेले प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रा. अनिल कवठेकर

या भौतिक जगात पडणाऱया प्रश्नांची उत्तरे माणूस जेव्हा शोधतो तेव्हा त्याला ती उत्तरे सापडतात. पण ती उत्तरे प्रत्येक वेळी मिळतीलच असं नाही. खरं तर अनेक प्रश्नांची उत्तरं अनेक तत्त्ववेत्त्यांनी अगोदरच दिलेली आहेत. आपण आपल्या प्रश्नांना घेऊन त्या उत्तरापर्यंत पोहोचत नाही.  बऱयाचदा नवे प्रश्न तयार करून उगीच न सापडणारी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो. उत्तरं सापडण्याची जी दृष्टी तयार व्हायला हवी ती दृष्टी तयार होत नाही आणि म्हणूनच ते प्रश्न अनुत्तरित राहतात.

 आजचे गीत आहे 1972 साली आलेल्या ‘अमरप्रेम’ या चित्रपटातील. त्या वर्षीचा फिल्मफेअर अवॉर्ड किशोर कुमार आणि आनंद बक्षी यांना मिळालेला होता. त्या गाण्यात नायकाला जे प्रश्न पडलेत, त्यांची उत्तरे देणे तसे कोणालाही  शक्य नाही, पण असं म्हणतात, जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हाच त्याचे उत्तर निर्माण होत असते, पण त्या उत्तराचा सातत्याने व प्रामाणिकपणे शोध घ्यायला हवा. या गीतात नायकाला जे प्रश्न सतावत आहेत ते दुसऱया दृष्टीने आपल्याशीही संबंधित आहेत.  या प्रश्नांतील साहित्यिक सौंदर्य आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

चित्रपटसृष्टीतील चार मजबूत स्तंभ जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून सर्वश्रेष्ठ कलाकृती निर्माण होते. आराधना, कटी पतंग, कश्मीर की कली आणि ऍन इव्हनिंग इन पॅरिस यांसारख्या एकाहून एक सरस आणि मनोरंजक चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे शक्ती सामंत, केवळ आपल्या डोळ्यांनी बोलणारा राजेश खन्ना, गाण्यातील शब्दाचे सौंदर्य आपल्या हृदयापर्यंत पोहोचवणारा किशोर कुमारचा अप्रतिम आवाज, आनंद बक्षी यांचे जीवनाचा अर्क शब्दात पकडणारे गीत आणि ते गीत अंतःकरणामध्ये त्याच्या नादासह पोचवणारे संगीत हे सगळं जमल्यानंतर चित्रपट आणि गीत बेहतरीन होणार यात कोणती शंकाच नाही.

गाणं सुरू होतं. बहुधा मध्यरात्र झालेली असावी. दूरवर शहरातील दिवे लुकलुकताना दिसत आहेत. त्या दिव्यांचं पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब हलतं आहे. त्यामुळे ते त्या दिव्यांचं प्रतिबिंब लांबलचक झालेलं आहे. कोळशाच्या शेगडीला कुणीतरी लाकडी फुंकणीने फुंकर घालून त्यातील कोळसे पेटवत आहे. याचा अर्थ हवेमध्ये चांगलाच गारठा आहे. एक छोटेखानी होडी कोलकात्याच्या हुबळी नदीतून चाललेली आहे. वल्हवताना ती हलतेय आणि राजेश खन्ना कंदिलाच्या त्या प्रकाशात दिसू लागतो. त्याच्या हातात मदिरेचा भरलेला ग्लास  आहे. समोर शर्मिला टागोर आकाशी रंगाच्या साडीत आहे. किशोर कुमारचा दुःख आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणारा आवाज आणि शब्द ऐकू येतात…

चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुझाए

सावन जो अगन लगाये उसे कौन बुझाए

या गाण्यातील प्रश्न म्हणजे ज्यांचे उत्तर शोधूनसुद्धा सापडणार नाही, असे आहेत. विचार केला तर ते तार्किक प्रश्न नाहीत, पण जीवनाचा विचार केला तर त्याचा आपल्या जीवनाशी कसा ना कसा, कुठे ना कुठे संबंध आहे, असेच ते प्रश्न आहेत. नदीच्या हळुवार लाटांवर डोलत चालणारी ती नाव जीवनाचे प्रतीक आहे. नाहीतर जीवन कधी स्थिर असत नाही. या जीवनात अनेक सुखद, दुःखद लाटा येतच असतात. प्रत्येकाच्या जीवनाची नौका हलते, पण आपला प्रवास मात्र संपत नाही.  नदीच्या पाण्यात चालणाऱया होडीमध्ये हे गाणं शूट करण्यामागे कदाचित जीवनाची ही अस्थिरता दाखवण्याचे कारण असावे. त्याशिवाय नायकाने विचारलेला प्रश्नही आपल्याला निरुत्तर करणारा आहे. आग भडकली तर पावसाच्या पाण्याचे थेंब त्यावर पडतात. ती आग विझते, पण त्या श्रावणानेच जर आग लावली तर ती कशी विझणार? नायक स्वतःलाच प्रश्न विचारतोय. जिला विचारतोय तिला त्याच्या शब्दांचा अर्थ पूर्णपणे समजलेला आहे, पण आपल्याला तर आता काहीच कळत नाही हे ती मोठय़ा सफाईने दाखवते. तो खटय़ाळ भोळेपणा शर्मिलाच्या त्या सुंदर डोळ्यांमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतो.

पतझड जो बाग उजाडे वो  बाग बहार खिलाये 

जो बाग बहार मे उजडे उसे कौन खिलाये 

जीवन हे नेहमीच फुललेली बाग नसते. जीवनातही पानगळती येते. ती आली की, त्या झाडांची सगळी पाने गळून जातात आणि ती बाग सुनी वाटू लागते. त्या बागेमध्ये एक उदासपणा येतो, पण ही सगळी लक्षणं वसंतामध्ये ती बाग फुलणार आहे याची असतात, या वसंताने जर या बागेला सुकवून टाकलं तर या बागेला पुन्हा कोण फुलवेल, हा प्रश्न त्याला पडलेला आहे.

या कडव्याच्या शेवटी त्या दोघांमधून दिसणारा कोलकाता शहराची ओळख असणारा हावडा ब्रिज दिसतो. दिग्दर्शकाने प्रत्येक कडव्याच्या कुठल्या ना कुठल्या शब्दावर त्या हावडा ब्रिजला कधी दोघांच्या मधून, कधी लांबून, कधी जवळून, तर कधी त्या हावडा ब्रिजच्या खालून या गाण्यांमध्ये सातत्याने आणलेलं आहे. दिग्दर्शक सुचवतोय की, जीवनाच्या नदीच्या प्रवासात सुखाचा एक किनारा असतो आणि दुःखाचा एक किनारा असतो. या दोन्ही किनाऱयांना जोडणारा एक पूल असतो. तो पूल आपल्यासमोर असतो, पण आपण आपल्या दुःखात इतकी आसवे गाळतो की, त्यामुळे आपल्या डोळ्यात असलेल्या आसवांमुळे तो पूल जवळ असूनही आपण पाहू शकत नाही. तसंच काहीसं राजेश खन्नाचं झालेलं आहे. या संपूर्ण गाण्यात त्याने एकदाही तो पूल पाहिलेला नाही.  याला म्हणतात दिग्दर्शकाची कमाल. नायक पुढे गातो…

हमसे मत पूछो कैसे मंदिर टूटा सपनो का 

लोगो की बात नही है ये किस्सा है अपनों का 

कोई दुश्मन खेत लगाये तो मीत जिया बेहलाये

मन मीत जो घाव लगाये उसे कौन मिटाये 

जेव्हा प्रेम होतं, तेव्हा दोघे मिळून त्या प्रेमाचं मंदिर आपल्या स्वप्नामध्ये बांधतात, पण त्या स्वप्नातील मंदिरही तुटते. आपल्याच माणसांनी आपल्याच मनातील प्रेमाचं मंदिर उद्ध्वस्त करून टाकावं ही किती उच्च पातळीवरची कल्पना आहे. गीतकार आनंद बक्षी यांना खरं तर आदराने सलाम करायला हवा. मनावर सर्वात मोठा घाव घालणारा हा अत्यंत जवळचा आपल्या मनावर राज्य करणारा आपलाच असतो. त्या जखमांचे धाव कधीही बरे होत नाहीत.

ना जाने क्या हो जाता, जाने हम क्या कर जाते

पीते है तो जिंदा है, ना पिते तो मर जाते 

दुनिया जो प्यासा रख्खे, तो मदिरा प्यास बुझाये 

मदिरा जो प्यास लगाये, उसे कौन बुझाये

पुढे गीतकार लिहितात, मी ही मदिरा पितोय म्हणून जगतोय. क्षणभर का होईना माझ्या दुःखापासून मला बाजूला ठेवणारी ही मदिरा जर आज नसती तर मी केव्हाच मरण पावलो असतो. कारण जेव्हा जेव्हा या जगाने मला अतृप्त ठेवलं, तेव्हा तेव्हा या मदिरेने शब्दांची, प्रेमाची, आपुलकीची तहान भागवली. पण हल्ली एक भीती मला सतावते जर या मदिरेनेही माझी तहान भागवली नाही तर मी काय करणार?

माना तुफा के आगे, नही चलता जोर किसी का

मौजो का दोष नही है, ये दोष है और किसी का 

मंझदार मे नैया डोले, तो माझी पर लगाये 

मांझी जो नाव डुबोए उसे कौन बचाये

वादळावर कोणाचेही नियंत्रण नसते. ज्या लाटा उसळतात, त्यामध्ये त्या उसळणाऱया लाटांचा दोष नाही, तर तो दुसऱया कोणाचा तरी दोष आहे. पुढे गीतकार असे लिहितात, एखादी नाव जर या वादळात सापडली,  तर नाविक आपलं कौशल्य पणाला लावून ती नाव सुखरूपपणे किनाऱयावर आणतो, पण जर नावाडय़ाने  नाव बुडवली तर त्या नावेला कोण वाचवणार? प्रत्येक कडव्यातून विचारला जाणारा प्रश्न त्या व्यक्तीच्या जीवनातील कटुता, पराभव, निराशा, अपयश यांच्या शिखराची उंची आपल्याला सांगतो. तसं जीवनही त्या नावेतल्या प्रवासासारखेच हेलकावे खात जाणारं असतं, पण हळूहळू त्या  हेलकाव्याची आपल्याला इतकी सवय होते की, ते हेलकावे नंतर आपल्याला जाणवतच नाहीत.

शेवटी ‘अमरप्रेम’ची कथा थोडक्यात अशी…  पुष्पा नावाच्या तरुणीला सावत्र आई आहे. तिचा विवाह झाल्यानंतर तिचा पती दुसरा विवाह करतो. त्यामुळे तिला नवऱयाचे घर सोडून आपल्या आईकडे यायला लागतं. सावत्र आई तिचा छळ करते तेव्हा तिचा मामा तिला तुझी सोय करतो असे सांगून तिला शरीर विकणाऱया बाजारात विकतो. तिथे एकाकी असणाऱया एका व्यावसायिकाशी अर्थात  राजेश खन्नाशी ओळख होते. या दोघांमध्ये असलेल्या नात्याचं नाव आहे ‘अमर प्रेम.’ ही कथा वाचल्यानंतर तुमच्या  लक्षात येईल की, शर्मिला टागोर आपल्या चेहऱयावर कोणते भाव का दाखवत नव्हती? संदर्भ मिळाला की, वेगळे अर्थ सापडू लागतात. म्हणूनच गीत जाणण्यासाठी संदर्भ हवे असतात.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)