
- वैदेही भूषण वैद्य
दि 9 नोव्हेंबरला माझी 60 पूर्ण होऊन एकसष्टीत प्रवेश करीत आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे म्हणजे 50 वे पुस्तक प्रकाशित होते आहे. या सर्वाचा वेध घेणार एक छोटेखानी लेख माझी कन्या सौ. वैदेही वैद्य हिने लिहिला आहे, तो सोबत पाठवत आहे. शक्यतो रविवार, 7 नोव्हेंबरच्या अंकात घ्यावा ही विनंती.
9 नोव्हेंबरला बाबा एकसष्टीत प्रवेश करीत आहेत. त्यांच्याकडे पाहून हे खरे वाटत नाही. त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पुस्तक संख्येने सुवर्ण महोत्सवी संख्या गाठली आहे. हे दोन्ही योग एकदम जुळून आले आहेत.
चित्रदर्शी आणि घणाघाती भाषेत गेल्या तीन तपांहून अधिक काळ प्राचीन संस्कृतीचा इतिहास, शिवचरित्र, पानिपत, क्रांतिकारक आदी अनेक विषय व्याख्यानातून आणि रामायण, भागवत, भगवान श्रीकृष्ण, संत वचने आदी विषय अत्यंत रसाळ प्रवचनातून मांडणारे डॉ. सच्चिदानंद शेवडे हे प्रत्यक्षात, जमिनीवर असलेले अत्यंत साधेसुधे व्यक्तिमत्त्व आहे. डोके आभाळाला टेकले तरी जमिनीवरचे पाय सुटता काम नयेत, हा आबांनी (आजोबांनी) दिलेला कानमंत्र त्यांनी जपला आहे. साहित्यिक, व्याख्याता आणि प्रवचनकार असा दुर्मिळ त्रिवेणी संगम त्यांच्यात एकवटला आहे.
इतिहासापासून चालू घडामोडींपर्यंत, पौराणिक गोष्टींपासून अगदी चित्रपट, वेबसीरिज, भटपंती किंवा खादाडीच्या जागा, आम्हाला चर्चेला कधीच विषय कमी नसतात. गंमत म्हणजे आपण कोणत्याही विषयाबाबत विचारावं आणि बाबांना ते माहित नाही, असं सहसा होत नाही. झालंच, तरी ते काही दिवसांत उत्तर नक्की कळवतील हे माहीत असतंच. असं हे माझं जगावेगळं चालतं बोलतं विद्यापीठ आहे.
लहानपणी आम्हाला बाबांची व्याख्यानं, प्रवचन जवळच असतील तर अम्मा आवर्जून घेऊन जात असे. त्यामुळे नकळत्या वयापासून शिवराय, क्रांतिकारक, फाळणी, अध्यात्म, रामायण, महाभारत असे अनेक विषय कानावर पडत गेले. मनाचे श्लोक, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम, कवी तिवारींची महाराजांवरील कवने, शंकराचार्यांच्या रचना, कोणाचे फटके यामुळे सहज मुखोद्गत झाले.
बँकेतील नोकरी, सततचे कार्यक्रमाचे दौरे आणि लेखनकार्य यातून वेळ काढून आमच्या स्पर्धा, घरातील जबाबदारी आणि जमेल तशी एकत्र भटपंती! आज माझं लग्न झाल्यावर आणि जबाबदारी अंगावर पडल्यावर, एवढी कसरत त्यांनी कशी केली असेल याचा विचार करूनही थकायला होतं.
पाठय़पुस्तकातून तुटपुंजा इतिहास आणि भूगोल समजण्याआधी हिंदुस्थानातील बरीचशी ठिकाण आम्हाला बाबांनी दाखवली होती आणि तेथील माहिती सांगितली होती. अशा भटपंतीच महत्त्व वेळोवेळी पटत गेलं. पुराणकथांशी आजचे संदर्भ जोडत, प्रगल्भपणे विचार करत त्यातील नेमका अर्थ सहज उलगडून सांगितल्यामुळे याबाबत श्रद्धा डोळस झाली.
बाबांनी बँकेतली अधिकारी पदावरची नोकरी सोडून पूर्णपणे राष्ट्रकार्याला वाहून घेतले तेव्हा मी सातवीत होते. पुढच्या काळात परीक्षित दादा वैद्यकीय क्षेत्रात व मी कलाक्षेत्रात द्विपदवीधर झालो. यावरून बाबांनी पारिवारिक दायित्व उत्तम प्रकारे निभावल्याचे दिसून येते. माझ्या बऱयाच मित्रमैत्रिणी किंवा अगदी यजमानही, ‘बाबांचं आणि तुझं जसं प्रेम आहे, तुम्ही अजूनही जशी मस्ती करता, तसं लेकीसोबत आमचं नातं असावं.’ असं म्हणतात ना, तेव्हा खूप छान वाटतं. एकमेकांना समजून घेण्याची, आपलंस करण्याची वाट अगदीच सोपी नाही, पण अशक्यही नाही. समोरच्यावर प्रचंड विश्वास ठेवून आपण भक्कम सोबत उभं राहिलो की हे सहज शक्य होतं. बरं, हे करताना बाबांनी त्यांच्या चुका, अपयश आमच्यापासून लपवले नाहीत किंबहुना त्यामुळेच धडपडलो तरीही पुन्हा ‘पुन्हा लढू’ हा विश्वास आला.
कोरोनाची ही वर्षं आम्हा कलाकार आणि कुटुंबासाठी काम ठप्प असल्याने कसोटीचीच आहेत. तरीही परिस्थितीवर चिडून सैरभैर न होता मिळालेल्या वेळेत लेखन, वाचन आणि साधना नियमित ठेवून, आमच्यासारख्या अधूनमधून हताश होणाऱयांना, ‘हेही दिवस सरतील.’ असा धीर आणि विश्वास देत आहेत. सततचे दौरे, अभ्यास, धावपळ त्यामुळे खाण्यापिण्याची आबाळ, आमची काळजी आणि आता वाढतं वय यामुळे तब्येतीच्या तक्रारी डोपं वर काढत असतात. पण त्याही बाबा संयमाने हाताळतात. तितक्याच सहजतेने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या तरुणांना, सोप्या भाषेत मनाला उभारी देणारे समुपदेशन करताना मी पाहिले आहे. शाळा व महाविद्यालयातून ते मांडत असलेल्या व्याख्यानातून ‘यश कसे मिळवाल?’ हा विषयसुद्धा एकप्रकारे समुपदेशनाचाच असतो असे मला वाटते.
धर्म व इतिहास यावरील विकृत आणि विपरीत मांडणी मात्र त्यांना अस्वस्थ करते. वृत्तपत्रीय साप्ताहिक स्तंभलेखनातून त्यांनी त्या सात्त्विक संतापाला अनेकवेळा वाट करून दिली आहे. त्या लेखनाचीही जवळपास दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कित्येकवेळा छद्म पुरोगाम्यांचा ‘सिलेक्टिव्ह आऊटरेज’ उघड करताना आपण कित्येक वाहिन्यांच्या चर्चेत पाहिले असेलच!
काव्य हा साहित्यप्रकार वगळता अन्य प्रांतातून त्यांची लेखणी मुक्तपणे विहरली आहे. महानाटय़, नाटक, कादंबरी, ललित चरित्रे, ऐतिहासिक, धार्मिक, लेखसंग्रह, सहलेखन, अनुवाद असे सर्व प्रकार त्यांनी लीलया हाताळले आहेत. नुकतेच प्रकाशित होणारे त्यांचे ‘डावी विषवल्ली’ हे पन्नासावे पुस्तक अनुवादित आहे.
सांगावं तेवढं अजून काहीबाही आठवतं, पण लेखन मर्यादा असल्यामुळे आपणा सर्वांच्या वतीने भगवंताकडे, त्यांच्या उत्तम आयुरारोग्य आणि पुस्तक संख्येच्या शंभरीचे मागणे मागते!




























































