
काळानुसार आपण तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. साथीच्या काळात प्रेक्षक नाटक, सिनेमे बघायला जाऊ शकत नाहीत. अशा वेळी खासकरून मराठी सिनेमांसाठी ओटीटी हा उत्तम पर्याय आहे. ओटीटीवर रिलीज झालेल्या मराठी सिनेमांना आठवडाभरात लाखो ह्यूज मिळतायत कदाचित थिएटर सुरू असतानाही इतके प्रेक्षक मराठी सिनेमांना लाभले नसते, असे मत अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत दैनिक ‘सामना’शी बोलताना सचिन खेडेकर म्हणाले, मराठीत फारशा कमर्शियल सिनेमांची निर्मिती होत नाही. आजही मराठी सिनेमा हा अभ्यासू आणि वाड्मयाला धरून आहे. आपल्या सिनेमांना फारसे प्रेक्षक नाहीत अशी ओरड असताना ओटीटीवर मात्र लाखो ह्यूज मिळतायत. याबाबत उदाहरण देताना ते पुढे म्हणाले, किशोर कदम यांचा ‘दिठी’ असो किंवा माझा नेटफ्लिक्सवरील ‘फायर ब्रॅंड’. हेच सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले असते तर सिनेमांचे प्रमोशन करूनही कदाचित त्यांना इतका प्रेक्षकवर्ग लाभला नसता. सिनेमांची निर्मिती मोठय़ा पडद्यासाठी होत असली तरीपण या साथीच्या काळात ओटीटी हा एक मार्ग तरी आहे.
सचिन खेडेकर यांनी विविध प्रादेशिक भाषांतील सिनेमांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याबाबत ते म्हणाले, कुठलाही नट स्वयंभू नसतो. त्याला लेखक-दिग्दर्शकांची साथ लागते. समोर आलेल्या कामातून आपण निवड कशाची करतो यावर नटाचे वैविध्य ठरते. एकाच प्रकारची भूमिका आली तर त्यात वेगळा रंग भरता येतोय का, अशा शक्यता पडताळून पाहण्याची आलेली संधी मी सोडली नाही. हल्लीच्या तरुण दिग्दर्शकांवर माझा खूप विश्वास आहे.
ज्ञानाची साथ महत्त्वाची
ज्ञानाची साथ ही यंदाच्या सिजनची थीम आहे. तुमचे पैसे चोरी होऊ शकतात; परंतु तुमचे ज्ञान तुमच्यापासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. कोरोना काळात आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आत्मविश्वासाचा अभाव निर्माण झालाय. त्यावर मात करण्याची ही संधी असल्याचे ते म्हणाले. सध्या शूटिंग करताना अनेक बंधने आहेत. सोशल डिस्टन्सिंगमुळे स्पर्धकांना शाबासकीची थाप किंवा धीर देता येत नाही. परंतु हॉटसीटवर बसण्यापूर्वी स्पर्धकांशी गप्पा मारून त्यांना रिलॅक्स करण्याचा माझा प्रयत्न असतो,असेही त्यांनी सांगितले.


























































