Sachin Tendulkar शतकांच्या शतकाला 7 वर्ष पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानचा माजी खेळाडू, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने सात वर्षापूर्वी बरोबर आजच्याच दिवशी क्रिकेट इतिहासामध्ये नवा विक्रम आपल्या नावावर केला होता. ज्या विक्रमाची कधी कोणी कल्पनाही केली नव्हती, तो विक्रम आजच्याच दिवशी सत्यात उतरला होता. तो दिवस होता 16 मार्च 2012. याच दिवशी सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक नोंदवले होते.

आशिया कपमध्ये शेर-ए-बांग्ला मैदानात झालेल्या सामन्यात सचिनने 114 धावांची डोळ्याचे पारणे फेडणारी खेळी करत आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये 100 शतकांची नोंद केली. एक दिवसीय क्रिकेटमधील सचिनचे हे 49 वे शतक होते आणि त्याआधी सचिनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकांची नोंद होती. यासह क्रिकेटच्या इतिहासामध्ये 100 आंतरराष्ट्रीय शतक ठोकणार सचिन पहिला खेळाडू ठरला. आजही हा विक्रम सचिनच्या नावावर कायम आहे.

sachin-tendulkar-100

100 व्या शतकासाठी पाहावी लागली वाट
सचिनने वेगाने 99 शतकांचा टप्पा गाठला. परंतु 100 वे शतक पूर्ण करण्यासाठी तब्बल एका वर्षाची वाट पाहावी लागली. सचिनने आपल्या 24 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये 463 एक दिवसीय सामन्यात 49 शतकांच्या मदतीने 18426 धावा केल्या, कसोटी क्रिकेटमध्ये 200 सामन्यात सचिनने 51 शतकांच्या मदतीने 15921 धावा चोपल्या.

एकून कारकीर्दीमध्ये सचिनने फक्त एक टी-20 सामना खेळला आहे. तसेच 664 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 शतक आणि 164 अर्धशतकांच्या मदतीने सचिनने 34357 धावा चोपल्या आहेत.