ते पुन्हा येताहेत! सचिन-लारा आमने सामने

781

आपल्या नेत्रदीपक फलंदाजीने कोटय़वधी क्रिकेटप्रेमींच्या डोळय़ांचे पारणे फेडणारे सचिन तेंडुलकर व ब्रायन लारा पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. हे दोन्ही महान फलंदाज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. निमित्त असेल रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी, सुरक्षेबाबत जागरूकता पसरवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱया वर्ल्ड सीरिज या क्रिकेट स्पर्धेचे.

हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडीज व दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये या स्पर्धेत जेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. त्यामुळे माजी दिग्गज खेळाडूंचा खेळ पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना पाहता येईल एवढे मात्र नक्की. 7 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेला सुरुवात होणार असून 22 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर जेतेपदाचा फैसला होईल.

या स्टार खेळाडूंचाही सहभाग
सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांच्यासह या स्पर्धेत वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, युवराज सिंग, शिवनारायण चंद्रपॉल, ब्रेट ली, ब्रॅड हॉज, जॉण्टी ऱहोडस्, हाशीम अमला, मुथय्या मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान, अजंथा मेंडिस हे स्टार खेळाडूही सहभागी होणार आहेत. एकूणच काय तर, क्रिकेटप्रेमींना आपल्या चाहत्या खेळाडूंचा खेळ ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याची संधी पुन्हा एकदा लाभणार आहे.

वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबई अन् पुण्यात लढतींचा धमाका
7 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणाऱया स्पर्धेच्या 11 लढती मुंबईतील वानखेडे व ब्रेबॉर्न, पुण्यातील एमसीए आणि नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहेत. वानखेडे स्टेडियमवर दोन, ब्रेबॉर्न स्टेडियमवर एक, डी. वाय. पाटील स्टेडियमवर चार आणि पुण्यातील स्टेडियमवर चार अशा एकूण 11 लढती होणार आहेत. सर्व लढती सायंकाळी 7 वाजता सुरू होतील.

अवघ्या 50 रुपयांत दिग्गजांचा खेळ पाहता येणार
या स्पर्धेतील तिकिटांच्या विक्रीला 13 फेब्रुवारीपासून बुक माय शोवर सुरुवात होणार आहे. लढतीची कमीत कमी तिकीट 50 रुपये असणार आहे. तसेच क्रिकेटप्रेमींना 500 रुपयांपर्यंत लढतीच्या तिकीट उपलब्ध असतील.

आपली प्रतिक्रिया द्या