
सामना ऑनलाईन,मथुरा
माणसाचा स्वतःवरील विश्वास उडाला की तो बुवा-बाबा, कर्मकांडाच्या नादाला लागतो असे म्हणतात. भाजपवाल्यांचेही बहुधा तसेच झाले असावे. कारण गेल्या चार वर्षांत देशातील वारे बदलले आहेत, लाट ओसरली आहे. ‘अच्छे दिन’ही ‘बुरे’ झाले आहेत आणि 56 इंचाच्या छातीला केव्हाच टाचणी लागली आहे. अशा स्थितीत भाजपने सत्ता मिळविण्यासाठी आता तर चक्क ‘यज्ञ’मार्ग स्वीकारला आहे!
काळ्या पैशांची घरवापसी, दोन कोटी नोकऱ्या आणि बँकेत जमा होणारे 15 लाख या सगळ्या जुमलेबाजीमुळे भाजप अडचणीत सापडला आहे. अच्छे दिनच्या आशेवर असलेल्या जनतेच्या संतापात महागाईने तेल ओतले आहे. म्हणूनच कदाचित भाजपने आता देवाचा धावा सुरू केला असावा. मथुरेत ‘मोदी चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे येत्या 10 ऑक्टोबरपासून यमुना नदीतीरावर दहा दिवसांचा महायज्ञ सोहळा पार पडणार आहे.
दिव्यशक्ती निर्माण करण्यासाठी
दहा दिवसांच्या या यज्ञसोहळ्यामुळे संपूर्ण देशभरात एक दिव्यशक्ती निर्माण होईल आणि भाजप पुन्हा सत्तेत तर येईलच, पण नरेंद्र मोदीही पंतप्रधान होतील असा दावा ट्रस्टचे अध्यक्ष पवन पांडे यांनी केला आहे. या यज्ञसोहळ्याला भाजपशासित राज्यांमधील राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री उपस्थित राहणार असून अखंड होमहवन आणि मंत्रपठण करून देशाचे वातावरण मोदीमय करण्याचा भाजपचा संकल्प आहे.
























































